कोरोना काळात राज्य सरकारने केलेल्या कामाचे, धारावी पॅटर्नचे देशपातळीवर कौतुक होत असताना विरोधक मात्र भ्रष्टाचार झाल्याचे आरोप करीत आहेत. आरोप जरूर करा, पण एकीकडे कोरोना योद्धय़ांचा फोटोसाठी सत्कार करायचा आणि दुसरीकडे कोरोना योद्धय़ांनी केलेले शौर्य नाकारायचे. ही कोरोना योद्धय़ांची थट्टा असून असा दुतोंडी विरोधी पक्ष महाराष्ट्राने पाहिला नव्हता, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांवर घणाघात केला.
अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला विरोधकांकडून होत असलेल्या आरोपांवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जोरदार आसुड ओढले. मुख्यमंत्री म्हणाले, विरोधकांकडून आरोप होणार हे आरोप मी समजू शकतो, पण त्या आरोपांना किंवा टीकेला अर्थ असायला हवा. कशात काही नाही. आरोप करीत सुटायचे ही आता राजकारणाची एक पद्धत झाली आहे. कोरोनाबद्दल विरोधक बोलले तसे स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयीही बोलले, पण सावरकरांबद्दल बोलताना आधी त्यांची जयंती की पुण्यतिथी याबद्दल अभ्यास करावा. ज्यांना सावरकरांची जयंती, पुण्यतिथी कोणती हे माहीत नाही त्यांनी आरोप करू नयेत.
केंद्रात आणि महाराष्ट्रात तुम्हीच असताना सीमाप्रश्न का सुटला नाही
सीमाप्रश्नाविषयी विरोधकांनी मांडलेल्या मुद्दय़ावर बोलताना केंद्रात आणि कर्नाटकात तुम्हीच आहात. गेली पाच वर्षे केंद्रात आणि महाराष्ट्रातही तुम्हीच होतात, पण त्यावेळी तुम्ही हा प्रश्न का सोडवला नाही, असा सवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला. सीमाप्रश्न सोडविण्यासाठी तुम्ही सोबत येणार असाल तर हा सीमाप्रश्न सुटायला वेळ लागणार नाही. केंद्रात तुमचे सरकार, कर्नाटकात तुमचे सरकार आहे. आघाडी सरकार सीमाप्रश्नासाठी आग्रही आहे. ही त्रिसूत्री एकत्र आली तर सीमावासीयांना आपण न्याय देऊ शकतो, असे सांगतानाच मराठा आरक्षणाबद्दलही जे काही सहकार्य करण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे त्याबद्दल धन्यवाद देतो, अशा शब्दांत विरोधकांचे त्यांनी आभारही मानले.
अविश्वास ठराव आणा, आमदार वाजवून दाखवतो!
सरकारचा आपल्याच आमदारांवर विश्वास नाही. त्यामुळे विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक सरकार घेत नाही. अधिवेशनापासून सरकार पळ काढत असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे याकडे पत्रकारांनी लक्ष वेधले असता उपमुख्यमंत्री अजित पवार तत्काळ उद्गारले, जर त्यांना तसे वाटत असेल तर त्यांनी अविश्वास ठराव दाखल करावा. वाजवून दाखवतो किती आमदार आहेत ते.
केंद्र सरकार सर्व काही ओरबाडतंय
विरोधकांकडून सल्ला तरी फुकट मिळतोय अशी टिप्पणी करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, तुमचं सरकार केंद्रात आहे ते सर्व काही ओरबाडतंय. कररूपाने ओरबाडतंय. घ्यायला हमी आणि द्यायला कमी असे हे सरकार आहे. आम्ही विराट, सचिन, धोनी यांची सेंच्युरी बघितली, पण पेट्रोलची सेंच्युरी पहिल्यांदा पाहिली. राज्याने कर लावले ते कमी करा सांगताय. आता जी भाववाढ केली आहे त्यात राज्याला काही मिळणार नाही, पण केंद्र सरकारच्या तुंबडय़ा भरणार आहेत, अशा शब्दांत मुख्यमंत्री ठाकरे यांनी भाजपवर आसुड ओढले. मागच्या जून-जुलैमधले अतिवृष्टीचे 4 हजार 700 कोटी रुपये अजून केंद्राने दिले नसल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
सौजन्य : दैनिक सामना