१९६३-६४पासून मी ‘मार्मिक’ वाचत आलो आहे. परंतु १९८६ साली प्रत्यक्षात ‘मार्मिक’शी नाते जुळले. १९८६ ते १९९२-९३ सालापर्यंत सातत्याने ‘मार्मिक’मधून लिखाण केले आहे. माझ्या लिखाणाचा श्रीगणेशा मार्मिकमधून झाला याचा मला सार्थ अभिमान आहे. एवढेच नव्हे तर मार्मिकमधील निवडक ६१ अग्रलेखांचा संग्रह असलेले ‘मार्मिक चिरफाड’ हे पुस्तक मा. बाळासाहेबांच्या आशीर्वादाने प्रकाशित करण्याचे भाग्य लाभले. अशा ऐतिहासिक आठवणीसंबंधी दोन शब्द…
१९८५ साली शिवसेनेने मुंबई महानगरपालिकेत घवघवीत यश प्राप्त केले. त्यानंतर लगेचच शिवसेनेच्या महाड येथे पार पडलेल्या दुसर्या राज्यव्यापी अधिवेशनात ‘मुंबई जिंकली… आता घोडदौड महाराष्ट्रात’ अशा घोषणा झाल्या. त्यानुसार महाराष्ट्राच्या जिल्ह्याजिल्ह्यातून शिवसेनेचा प्रचार व प्रसार होण्यासाठी शिवसेना नेत्यांवर जिल्ह्याची जबाबदारी दिली गेली. प्रबोधनचे विश्वस्त, ज्येष्ठ शिवसेना नेते सुभाष देसाई यांच्याकडे जळगाव जिल्ह्याची जबाबदारी दिली गेली. त्या त्या जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिकांनी जिल्हा संपर्कप्रमुखांशी संपर्क साधावा, असे आवाहन ‘मार्मिक’मधून करण्यात आले.
माझा जळगाव जिल्ह्याशी संबंध असल्यामुळे मी व विलास मुकादम (नवाकाळ वार्ताहर) सुभाष देसाई यांना शिवसेना भवनात भेटलो व दौर्यात येण्याची इच्छा प्रगट केली. देसाईंनी लगेच होकार दिला आणि पहिल्या जळगाव जिल्ह्याच्या दौर्यावर गेलो. ४-५ दिवसांचा जळगावचा दौरा आटपून आलो. देसाईंनी विलास मुकादम याला दौर्याचे वार्तापत्र लिहिण्यास सांगितले. परंतु काही इतर कामांमुळे मुकादम लिहू शकला नाही आणि ते जिल्हा दौरा वार्तापत्र मी लिहून देसाईंकडे दिले. त्यांनीही लिहिले होते. माझे वार्तापत्र वाचले आणि दोघांचे एकत्रित करून ते वार्तापत्र ‘मार्मिक’मध्ये छापून आणले. त्यावेळेस आपण लिहिलेले छापून आले त्याचा मला खूप आनंद झाला. अशा रीतीने लेखनाचा श्रीगणेशा ‘मार्मिक’मध्ये झाला.
त्यानंतर जेव्हा जेव्हा देसाईंबरोबर जळगाव-धुळे दौर्यावर गेलो तेव्हा दौर्याचा वृत्तांत लिहण्याची जबाबदारी देसाईंनी माझ्यावर सोपवली. नंतर मी मार्मिकमध्ये राजकीय-सामाजिक घटनांवर लेख लिहू लागलो. त्यावेळी कै. प्रमोद नवलकर, का. संपादक भाऊ तोरसेकर, बाळ धारप, ह. मो. मराठे आणि खुद्द स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे वेळोवेळी मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्यामुळे माझ्या लिखाणाला दिशा मिळाली.
साप्ताहिक विवेक, नवनगर, सामना, तरुण भारत-बेळगाव, मुंबई तरुण भारत, पुण्यनगरी, वृत्तमानस आदी वृत्तपत्रांतून लिखाण सुरू राहिले. शिवसेना चळवळीशी संबंध असल्यामुळे शिवसेना व शिवसेनाप्रमुख… आणि निवडणुकीच्या वेळी काही पुस्तिका व पुस्तके लिहू शकलो. त्याचे सारे श्रेय मार्मिकला जाते.
मार्मिकमधील अग्रलेखांनी मराठी माणसांचे स्फुल्लिंग चेतवले, अन्यायाविरुद्ध लढण्याची ताकद दिली. मराठी भाषा, संस्कृती आणि इतिहास जपण्याचे महतकार्य मार्मिकच्या अग्रलेखांनी केले आणि एक इतिहास घडवला. अशा मार्मिकमधील काही अग्रलेखांचे संग्रहीत पुस्तक काढावे असा विचार मनात घोळू लागला. त्या विचारांना आकार देण्यासाठी मी व मुकादम यांनी मा. बाळासाहेबांची भेट घेण्याचे ठरवले. आम्हाला भेट लगेच मिळाली.
पहिल्याच भेटीत आम्ही मार्मिकमधील निवडक ६१ अग्रलेखांचा संग्रह असणारे पुस्तक काढायचे आहे असे सांगितले. सोबत आणलेली ८० अग्रलेखांची यादी मा. बाळासाहेबांना दाखवली. त्यांनी त्याच्यावर नजर फिरवली आणि टी-पॉयवर ठेवली. त्यांनी उपक्रमाची सविस्तर माहिती घेऊन ६१ अग्रलेख निवडण्याची विनंती केली.
मा. बाळासाहेबांनी बघतो म्हणून पहिल्या भेटीचा ‘जय महाराष्ट्र’ केला. ते ऑक्टोबर-नोव्हेंबर १९८६चे वर्ष होते. मा. बाळासाहेबांच्या वाढदिवशी पुस्तकाचे प्रकाशन व्हावे म्हणून आम्ही पुन्हा भेटलो. मा. बाळासाहेबांनी ६१ अग्रलेख निवडले होते. पुस्तक कसे छापणार, कुठे छापणार, प्रकाशक कोण आदी सर्व चौकशी केली, चर्चा केली. ‘मार्मिकनामा’ किंवा ‘मार्मिकगाथा’ ही पुस्तकासाठी नावे आम्ही सुचवली. ‘नामा, गाथा अशी बुळबुळीत नावे माझ्या पुस्तकाला नको. मी अग्रलेखातून चिरफाडच करतो. ‘मार्मिक चिरफाड’ त्यांच्या मुखातून निघाले आणि पुस्तकाचे नाव ‘मार्मिक चिरफाड’ देण्याचे ठरले. पुस्तकासाठी बाळासाहेबांचा संदेश मागितला. परंतु बाळासाहेबांनी संदेश देण्यास नकार दिला. आमच्या दोघांचे चेहरे रडवेले झाले. काय बोलावे ते सुचेना, हिम्मत होईना. पण मुकादमने बोलण्याचे साहस केले. साहेब, आमचे हे पहिलेच पुस्तक आहे. तेव्हा तुमचे आशीर्वादाचे दोन शब्द लाभले तर आम्हाला उभारी येईल. बाळासाहेबांनी आमच्या हिरमुसल्या चेहर्याकडे बघितले आणि लगेच म्हणाले लिहा… (मा. बाळासाहेबांचा आशीर्वादात्मक संदेश सोबत जोडला आहे). मी आणि मुकादमने वही काढली आणि तो संदेश लिहिला.
‘मार्मिक’मधील निवडक ६१ अग्रलेखांचे संकलन-संपादन केलेल्या ‘मार्मिक चिरफाड’ या आमच्या पहिल्या पुस्तकाचे प्रकाशन मा. बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते २३ जानेवारी १९८७ रोजी षण्मुखानंद हॉल, मुंबई येथे थाटामाटात, हजारो शिवसैनिकांच्या उपस्थितीत संपन्न झाले. ‘मार्मिक’ने संधी दिल्यामुळे लिखाणाची पुढील वाटचाल करू शकलो. त्यामुळे ‘मार्मिक’ आणि ‘मार्मिक’कार बाळासाहेब ठाकरे यांचा मी ऋणी राहीन. कृतज्ञ मी, कृतार्थ मी याच भावना कायम आहेत!