सखाभाऊंना मारण्याचा `मोटिव्ह’ काही पोलिसांना सापडत नव्हता. सखाभाऊंच्या कपड्यांवर आणखी दोन दोन व्यक्तींचं रक्त आढळून आलं होतं. घरच्यांपैकी कुणाच्याही रक्ताशी हा रक्तगट जुळत नव्हता. एवढ्या वयस्कर माणसाला असं वाईट पद्धतीनं कुणी का मारून टाकलं असेल, हा सगळ्यात मोठा प्रश्न होता.
रात्रीची ड्यूटी संपवून इन्स्पेक्टर भालेकर घरी निघण्याच्या तयारीत होते. दुसर्या दिवशीच्या बंदोबस्ताच्या सूचना त्यांनी सहकार्यांना दिल्या आणि ते बाहेर पडणार, एवढ्यात पोलीस स्टेशनमधला फोन खणखणला.
“नमस्कार, रामदासनगर पोलीस स्टेशन, ठाणे अंमलदार शिंदे बोलतोय! आपण कोण बोलताय?” शिंदेंनी त्यांच्या नेहमीच्या खणखणीत आवाजात संवाद साधला.
“साहेब, मी शेवाळेवाडीतनं बोलतोय. इथे माझ्या शेताच्या कडेला एक प्रेत सापडलंय साहेब… म्हातारा माणूस दिसतोय कुणीतरी…!” पलीकडून कुणीतरी घाबर्याघुबर्या आवाजात बोलत होतं. शिंदे लगेच अलर्ट झाले.
शेवाळेवाडी म्हणजे मिश्र वस्ती असलेला मोठा परिसर होता. नेमक्या कुठल्या भागात हे प्रेत सापडलंय, हे भालेकरांनी समजून घेतलं. वस्तीपासून काही अंतरावर असलेल्या एका मळ्यात ते पोहोचले, तेव्हा तिथे आजूबाजूच्या लोकांची बर्यापैकी गर्दी झालेली होती. एका शेताच्या बांधावर झुडपात एका वयस्कर माणसाचा मृतदेह पडलेला होता. आजूबाजूला रक्तही सांडलेलं होतं. अंगावर धारदार शस्त्रानं वार झालेले दिसत होते.
भालेकरांनी आता मृतदेहाची नीट पाहणी केली. साधारण साठीचा माणूस दिसत होता. मृतदेह उलटा पडलेला होता. चेहरा दिसत नव्हता. फोटोग्राफरचे फोटो घेऊन झाल्यावर त्यांनी मृतदेह वळवला आणि एकदम कुणीतरी ओरडलं, “अरे, हे तर सखाभाऊ!”
सखाराम वाकुडकर हे शेवाळेवाडीत सखाभाऊ म्हणून परिचित होते. उमेदीच्या काळात त्यांनी बर्याच नोकर्या केल्या होत्या. कधी ट्रक ड्रायव्हर, कधी कुठल्या छोट्या कारखान्यात मुकादम, कधी काय तर कधी काय. म्हातारा जेवढा खमक्या होता, तेवढाच कटकट्या पण. सगळ्या गोष्टी त्यांना व्यवस्थित लागायच्या. अगदी जाताना कुणी घराकडे वाकडी नजर करून बघितलं, तरी त्याच्याशी भांडायचे. माणसं जोडायची जशी सवय होती, तशीच त्यांनी काही चुकीचं केल्यावर त्यांच्याशी भांडायलाही ते मागेपुढे बघायचे नाहीत.
शेवाळेवाडीच्या जुन्या भागातल्या वस्तीत सखाभाऊ मुलगा, सून आणि नातवासह राहात होते. बैठं घर होतं, संसार बरा चालला होता. त्यांना बाहेरचा कुणी शत्रू असण्याची शक्यता नव्हती. नोकरी सोडूनही काही वर्षं झाली होती आणि तिथे कुणाशी कधी वैर केलं नव्हतं. रागीट बोलण्यामुळे कुण्या शेजार्याशी किंवा गावातल्या कुणाशी वाद झाले, तरी ते तिथेच विसरून दुसर्या दिवशी पुन्हा त्या माणसाशी पहिल्यासारखं बोलायची त्यांची पद्धत होती.
थोडक्यात, सखाभाऊंना मारण्याचा `मोटिव्ह’ काही पोलिसांना सापडत नव्हता.
घटनास्थळापाशी सखाभाऊंचे कपडे, रक्ताचे डाग याशिवाय काही मिळालं नव्हतं. फॉरेन्सिक चाचणीत त्यांच्या कपड्यांवर आणखी दोन व्यक्तींचं रक्त आढळून आलं. पोलिसांनी त्यांच्या नेहमीच्या पद्धतीप्रमाणे आधी घरच्यांचीच चौकशी सुरू केली.
“तुझे वडिलांशी संबंध कसे होते?” इन्स्पेक्टर भालेकरांनी सखाभाऊंचा मुलगा चेतन याला चौकशीसाठी बोलावल्यावर पहिला प्रश्न केला.
“चांगलेच होते साहेब. बाबांना आम्ही सगळे फार जपत होतो. आई गेल्यापास्नं थोडे खचले होते. पण आम्ही त्यांना कधी एकटं वाटू देत नव्हतो.” चेतन सांगायला लागला. चेतन जवळच्याच एमआयडीसीमधल्या एका कंपनीत मशीन खात्यात काम करत होता. दिवसभर बाहेर असायचा. त्याची बायको मंजिरी ब्यूटी पार्लरमध्ये कामाला होती. तीसुद्धा अर्धा दिवस बाहेर असायची. सखाभाऊ घरी असताना नातू रोहनला सांभाळायचे, त्याला फिरायला न्यायचे. एकूणच कुटुंबात आणि निवृत्तीनंतरच्या आयुष्यात रमलेल्या सखाभाऊंचा वैरी कोण असेल, याचा उलगडा होत नव्हता.
रक्ताच्या नमुन्याचे रिपोट्स दुसर्या दिवशी मिळाले. घरातल्या आणि सखाभाऊंच्या ओळखीच्या कुणाच्याच रक्ताशी त्यांच्या कपड्यांवर सापडलेल्या इतर दोघांच्या रक्ताचा गट जुळत नव्हता.
म्हणजे जवळच्या कुणी त्यांचा काटा काढला असण्याची शक्यता कमी होती. एवढ्या वयस्कर व्यक्तीला कोण कशासाठी मारेल, तेसुद्धा अशा हत्यारांनी वार करून?
खुनाला पाच दिवस उलटून गेले होते. काहीच सुगावा लागत नव्हता आणि सहाव्या दिवशी दुपारी रामदासनगर पोलीस स्टेशनचा फोन खणखणला. कुणाला तरी एक अत्यंत महत्त्वाची अशी माहिती द्यायची होती.
“सखाभाऊंच्या घरी आज सकाळी त्यांचा पोरगा आन् सुनेचं कडाक्याचं भांडण झालं!” माहिती देणार्यानं हवालदार शिंदेंना सांगितलं.
“नवरा-बायकोच्या भांडणात नवीन काय? उगाच आमच्या डोक्याला ताप देऊ नकोस!” आधीच कामाने वैतागलेल्या शिंदेंनी त्याला झापलं.
“तसं नाही हवालदार साहेब. तुझ्यापायी माझा बाप गेला, असं काहीतरी बोलत होता चेतन. मी स्वतः ऐकलंय!” माणसानं माहिती दिली आणि शिंदे एकदम सावरून बसले. त्याच्याकडून सगळी माहिती घेऊन त्यांनी भालेकरांच्या कानावर घातली.
ऐकणार्याला संशय वाटण्यासारखं फक्त तेवढंच एक वाक्य ऐकू आलं होतं. बाकी घरातलं नेहमीचंच रामायण होतं. तरीही हा पोलिसांसाठी महत्त्वाचा धागा होता. खुनाबद्दल काही माहिती काढण्यासाठी पोलिसांनी शेवाळेवाडीतल्या त्या वस्तीत काही खबरे पेरले होते, त्याचा आज उपयोग झाला होता. भालेकरांनी चेतन आणि मंजिरीला बोलावून घेतलं. त्यांची पुन्हा नव्याने आणि जरा जास्त तपशिलात खबर घेतली.
“आमच्यापासून काही लपवत असलात, तर आत्ताच सांगा. नंतर महागात पडेल.” भालेकरांनी दम दिला.
“आम्ही खरंच सांगतोय साहेब. माझा बाप देवमाणूस होता. आजपर्यंत कुणाशी वैर नाही केलं. आम्ही त्याची काळजी घेत होतो. तो मरावा, असं आम्हाला का वाटेल?” चेतन रडवेला झाला होता. मंजिरी फारसं बोलत नव्हती, पण तिनंही तेच सांगितलं.
दोघांची परत पाठवणी केल्यावर भालेकर शिंदेंना जवळ बोलावून म्हणाले, “तुमच्या एक लक्षात येतंय का शिंदे? ह्या चेतनची बायको… काय नाव तिचं…”
“मंजिरी!”
“हां… मंजिरी. ती जास्त काही बोलत नव्हती. सारखं नवर्याकडे बघत होती. मध्येच काहीतरी बोलायचा विचार करत होती, परत शब्द मागे घेत होती.”
“होय साहेब.”
“कुठेतरी पाणी मुरतंय. तुम्ही तिच्यावर नजर ठेवा. ती कुठे जाते, काय करते, कुणाला भेटते, सगळी खबर काढा.”
शिंदेंनी पडत्या फळाची आज्ञा मानून लगेच माणसं कामाला लावली. दोन दिवसांत त्यांच्या पाठलागाला यश आलं. ब्यूटी पार्लरला जाणारी मंजिरी काम संपल्यानंतर कुणाला तरी भेटायला जाते, हे खबर्यांच्या लक्षात आलं. थोडा आणखी शोध घेतला असता, हा माणूस तिच्याच वयाचा आहे आणि ब्यूटी पार्लरच्या शेजारीच त्याचं दुकान आहे, हेही समजलं.
`तुझ्यामुळे माझ्या बापाचा जीव गेला,’ असं जे चेतन तिला म्हणत होता, त्याचा या प्रकाराशी काही संबंध असावा का? मंजिरीचं या माणसाशी नेमकं नातं काय? ती घरी कुणाला काही न सांगता त्याला भेटायला का जाते? भालेकरांसमोर अनेक प्रश्न उभे होते.
मंजिरीकडून आधीही काही कळलं नव्हतं. आता भालेकरांनी आपल्या पद्धतीनं सगळी माहिती काढायचं ठरवलं. मंजिरीचं माहेर, लग्नाआधीची तिची वागणूक, सासरी तिचं वागणं, तिचा स्वभाव, हे सगळं खोदकाम करण्यात आलं, पण त्यातून फारसं संशयास्पद काही हाताला लागलं नाही, तेव्हा मात्र पुन्हा तपास त्याच जागी येऊन थांबला.
मंजिरी ज्याला भेटायला जात होती, त्या विजयला आता पोलिसांनी चौकशीसाठी बोलावून घेतलं.
“एक बाई आणि पुरुष यांचं दुसरं काही नातं असू शकत नाही का साहेब? नेहमी संशयच घ्यायला हवा का दुसर्यांनी?” विजय निरागसपणे म्हणाला.
“ए, प्रवचन द्यायला बोलावला नाहीये तुला!” भालेकरांनी दरडावलं, तसा विजय गप्प झाला. भालेकरांनी मग त्याला बोलता केला, पण त्याच्याकडूनही विशेष काही हाती लागलं नाही. मंजिरी ब्यूटी पार्लरमध्ये काम करायची, तेव्हाच शेजारच्या दुकानात असलेल्या विजयशी तिची काहीतरी कामाच्या निमित्तानं ओळख झाली. त्याच्या रूपानं तिला भाऊ मिळाला होता. अर्थात, त्या दोघांच्या मनात वेगळं काही नसलं, तरी बघणार्यांना मात्र त्यावरून कुचाळक्या करायची संधी मिळाली होती. त्यातल्याच एखाद्या कुचाळकीवीरानं मंजिरीच्या घरी चुगली केली होती. त्यावरून घरात रणकंदन झालं होतं.
सखाभाऊंच्या खुनानंतर चेतन आणि मंजिरीचं भांडण झालेलं जसं शेजार्यांनी ऐकलं, तसंच एकदोनदा सखाभाऊंशीही त्या दोघांचं वाजलं होतं आणि तो आवाज आसपासच्या घरांत घुमला होता, असं पोलिसांना आता पुन्हा चौकशी केल्यावर कळलं. या भांडणाचा आणि विजयचा खुनाच्या प्रकरणाशी काही ना काही संबंध असावा, असं भालेकरांना राहून राहून वाटत होतं.
आणखी एक दिवस मध्ये गेला आणि पोलिसांना अशी माहिती मिळाली, ज्यामुळे तपासाची सगळी चक्रं उलटी फिरली. सखाभाऊंच्या ट्रंकेत चेतनला दहा हजार रुपयांची रोकड मिळाली होती. त्यानं लगेच पोलिसांना ही खबर दिली.
“साहेब, आत्ता आठवलं. बाबांच्या गळ्यात सोन्याची चेन होती, ती पण दिसली नाही त्या दिवशी बॉडीवर.” या माहितीने पोलिसांना पुन्हा गोंधळून टाकलं. कुणीतरी त्यांना लुटण्यासाठी खून केला असावा का, असाही विचार सुरू झाला. पण फक्त चेनसाठी कुणी खून करेल, अशी शक्यता कमी होती. सगळ्या सोनारांकडे चौकशी सुरू झाली आणि एक सोनार असा सापडला, ज्यानं सखाभाऊंची ती चेन विकत घेतली होती. दुसर्या तिसर्या कुणाकडून नव्हे, चक्क सखाभाऊंकडून!
“सखाभाऊ त्या दिवशी चेन विकायला आले होते. चिडलेले दिसत होते. किती द्यायचे तेवढे पैसे द्या, पण मला चेन विकायचीच आहे!” असं त्यांनी सोनाराला सांगितलं होतं. भालेकरांना आठवलं, की गावातल्या आणखीही काही लोकांनी सखाभाऊंना पैशाची काहीतरी नड असल्याचं एकदोनदा सांगितलं होतं, पण नंतर तो विषय न वाढल्यामुळे ते लोकही विसरून गेले होते.
त्यांच्या खुनाचा आणि पैशांचा संबंध आणखी घट्ट होत चालला होता. तरीही अजून नेमकं सूत्र सापडायचं बाकी होतं आणि तेही एके दिवशी सापडलं.
सखाभाऊंच्या कंपनीत पूर्वी कामाला असलेला शिवराम हा त्यांचा मित्र पंधरा दिवसांपूर्वीच त्यांना भेटायला आला होता. तेव्हा सखाभाऊ वस्तीच्या बाहेर, एका आडोशाला काही गुंड प्रवृत्तीच्या माणसांशी बोलताना त्यानं पाहिलं होतं. हे गुंड त्यांच्याच कंपनीच्या परिसरात राहणारे होते आणि सखाभाऊ, शिवराम त्यांना ओळखत होते. सखाभाऊ त्यांना काहीतरी समजावून सांगत असल्याचं जाणवत होतं.
भालेकरांनी तुकड्यातुकड्यातून मिळालेल्या संदर्भांवरून जे वर्तुळ जुळवत आणलं होतं, ते जोडण्याची वेळ आता आली होती. शिवरामनं सांगितलेल्या वर्णनावरून पोलिसांनी त्याच्या कंपनीच्या परिसरातल्या वस्त्यांवर छापा घालून काही गुंडांना ताब्यात घेतलं. त्यांनी दिलेल्या माहितीवरून पोलिसांना आणखी मोठा धक्का बसला.
सखाभाऊंच्या मृत्यूला दुसरं तिसरं कुणी नव्हे, ते स्वतःच जबाबदार ठरले होते! मंजिरी आणि विजयचे संबंध आहेत, असा सखाभाऊंना संशय होता. आपली सून बाहेरख्यालीपणा करते, याचा राग त्यांच्या डोक्यात होता. बायको गेल्यापासून ते अधूनमधून सैरभैर होत असत. त्याच अवस्थेत एकदा त्यांनी सुनेच्या अंगावर हात टाकला. `बाहेरच्यांबरोबर जे करतेस, ते माझ्याशी केलंस तर काय झालं?’ असं तिला विचारत त्यांनी तिच्याशी लगट करायचा प्रयत्न केला, तेव्हा तिनं जिवाच्या आकांतानं त्यांच्यापासून सुटका करून घेतली.
आधीच डोकं फिरलेलं, त्यातून सून बाहेर बोभाटा करेल, याची त्यांना भीती वाटत होती. चिडलेल्या मंजिरीनं हे चेतनला सांगितलं, पण त्याचा विश्वासच बसेना. वडिलांवर खोटा आरोप केल्याबद्दल तो उलट मंजिरीवरच चिडला. सखाभाऊंचं त्यामुळे फावलं आणि त्यांनी पुन्हा एकदा मंजिरीशी लगट करायचा प्रयत्न केला. तिनंही तेवढ्याच ताकदीने त्यांना विरोध केला. सून बधत तर नाहीच, पण आपली बदनामी करेल, ही भीती सखाभाऊंच्या मनात बसली आणि त्यांनी तिचा काटा काढायचं ठरवून टाकलं. जुन्या कंपनीच्या परिसरातल्या या गुंडांची मदत घेतली. त्यांना चक्क सुनेच्या खुनाची सुपारी दिली. काम स्वस्तात होईल, असं त्यांना वाटलं होतं. पण गुंडांना ही आयतीच संधी मिळाली होती. त्यांनी खून तर केला नाहीच, पण सखाभाऊंनाच लुबाडायला सुरुवात केली. असंच एकदा त्यांना मळ्यात बोलावून घेतलं असताना पैशांवरून सखाभाऊंचं डोकं फिरलं आणि त्यांनी गुंडांना शिव्या दिल्या. दारू प्यायलेल्या त्या दोन गुंडांनी तिथेच सखाभाऊंचा खेळ खलास करून टाकला.
स्वतःच्या वाईट विचारांनी सखाभाऊंनी आत्मघात करून घेतला. सुनेने मात्र, पोलिसांना त्या वाईट घटनेबद्दल स्वतः काही न सांगता आपल्या सासर्याची बदनामी टाळायचा शेवटपर्यंत प्रयत्न केला होता.