1971 च्या युद्धाला आज 50 वर्ष पूर्ण झाली आहेत. या युद्घात हिंदुस्थानचे अनेक वीर जवान शहीद झाले. या य़ुद्धाच्या वेळी काही जवान बेपत्ता देखील झाले होते. यातीलच एक जवान होते जालंधरचे 27 वर्षीय मंगल सिंह हे गेल्या 50 वर्षांपासून बेपत्ता आहेत. सरकारने त्यावेळी त्यांचा मृत्यू झाल्याचे त्यांची पत्नी सत्या यांना कळवले. मात्र सत्या यांनी आपले पती एक ना एक दिवस परततील अशा आशेवर गेली पन्नास वर्ष काढली. आता जेव्हा आयुष्यातली 50 वर्ष लोटून गेल्यानंतर सत्या यांना सरकारने एक आनंदाची बातमी दिली आहे. मंगल सिंह हे जिवंत असून ते पाकिस्तानातील कोट लखपत तुरुंगात कैद असल्याचे सरकारने त्यांना सांगितले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा पतीला बघता येण्याच्या सत्या यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. ‘आज तक’ने याबाबत वृत्त दिले आहे.
मंगल सिंह हे 1962 साली सैन्य दलात भरती झाले होते. 1971 साली रांची येथे त्यांची पोस्टिंग होती. मात्र पूर्वेकडील सीमेवर युद्धाची परिस्थिती निर्माण झाल्यानंतर त्यांची पोस्टिंग हिंदुस्थान व तत्कालिन पाकिस्तान सीमेवर करण्यात आली. 3 डिसेंबर रोजी हिंदुस्थान व पाकिस्तानमध्ये युद्ध सुरू झाले. त्यानंतर एके दिवशी मंगल सिंह यांची पत्नी सत्या यांना सैन्याकडून एक पत्र मिळाले व त्यात बांगलादेशमध्ये सैनिकांना घेऊन जाणारी एक बोट उलटली असून त्यातील सर्व जवानांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले होते. मंगल सिंह यांचा देखील त्या दुर्घटनेत मृत्यू झाल्याचा लष्कराकडून सांगण्यात आलेले.
मंगल सिंह हे जेव्हा बेपत्ता झाले तेव्हा त्यांना दीड वर्षाचा व तीन वर्षांचा अशी दोन मुलं होती. सत्या यांनी गेल्या 50 वर्षात एकटीने या मुलांना सांभाळले. मंगल सिंह यांचा मृत्यू झाला आहे यावर सत्या सिंह यांनी मात्र विश्वास ठेवला नाही. त्या पतीच्या परतीची वाट पाहात राहिल्या. त्यासाठी त्यांनी अनेकदा केंद्र सरकारला पत्रही लिहले. अखेर 50 वर्षांनी त्यांच्या प्रयत्नांना व विश्वासाला यश आले. गेल्या आठवड्यात परराष्ट्र मंत्रालयाकडून त्यांना एक पत्र मिळाले असून त्यात मंगल सिंह हे जिवंत असून ते पाकिस्तानातील कोट लखपत तुरुंगात कैद असल्याचे सांगितले. तसेच केंद्र सरकार त्यांच्या सुटकेसाठी पाकिस्तानशी चर्चा करत असल्याचे देखील त्या पत्रात नमूद करण्यात आले आहे.