‘एमडीएच’ समुहाचे मालक धर्मपाल गुलाटी यांचे निधन झाले आहे. ते 98 वर्षांचे होते. माता चन्नन देवी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते महाशय या नावाने प्रसिद्ध होते. गेल्या काही दिवसांपासून प्रकृती अस्वास्थामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या निधनाबाबत संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासह अनेक मान्यवरांनी खेद व्यक्त केला आहे.
धर्मपाल यांचा जन्म 27 मार्च 1923 मध्ये सियालकोटमध्ये (आताचे पाकिस्तान) झाला होता. 1933 मध्ये 5 वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केल्यावर त्यांनी शाळा सोडली. वडिलांच्या मदतीने 1937 मध्ये त्यांनी व्यापाराला सुरुवात केली. त्यांनी सुरुवातील साबण, कपडे, हार्डवेअर आणि तांदूळ यांचा व्यवसाय केला. त्यात अपेक्षित यश येत नसल्याने त्यांनी वडिलांसोबतच व्यापाराला सुरुवात केली. त्यांनी वडिलांच्या ‘महेशियां दी हट्टी’ दुकानात काम करण्यास सुरुवात केली. देगी मिर्चवाले या नावाने या दुकानाची ओळख होती.
हिंदुस्थान-पाकिस्तान फाळनीनंतर ते दिल्लीत आले. 27 सप्टेंबर 1947 रोजी त्यांच्याकडे फक्त 1500 रुपये होते. त्यातील 650 रुपयांना त्यांनी टांगा खरेदी केला आणि नवी दिल्ली रेल्वे स्थानक ते कुतुब रोडदरम्यान ते टांगा चालवायचे. त्यानंतर त्यांनी टांगा भावाला दिला आणि करोलबागच्या अजमल खान रोडवर एका छोट्या दुकानात मसालेविक्री सुरू केली. त्यांचा हा व्यवसाय भरभराटीस आला आणि ‘एमडीएच’ मसाल्यांची सुरुवात झाली.
व्यापार चांगल्या चालू लागल्यावर त्यांनी एमडीएच समुहाची स्थापना केली. मसाल्यांच्या उद्योगांसह त्यांनी अनेक सामाजिक कार्यातही पुढाकार घेतला. रुग्णालये, शाळा उभारणीत त्यांचा सक्रीय सहभाग होता. आतापर्यंत त्यांनी 20 पेक्षा जास्त शाळा सुरू केल्या आहेत. त्यांच्या निधनाबाबत सर्व स्तरातून खेद व्यक्त होत आहे.
प्रतिष्ठीत उद्योगपती धर्मपाल गुलाटी यांच्या निधनाने आपल्याला दुःख झाले आहे. छोट्या व्यवसायापासून सुरुवात करून त्यांनी मोठी झेप घेतली. सामाजिक कार्यात ते नेहमी पुढाकार घेत असत. त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात आपण सहभागी आहोत. अशा शब्दांत सरंक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी शोक व्यक्त केला आहे.
सौजन्य- सामना