क्रिकेटमध्ये जसं कसोटीपेक्षा लोकांना ट्वेंटी ट्वेंटी सामने आवडू लागलेत, तसंच चित्रपटांचंही झालंय… तीन तास एकच एक कथानक पाहण्यापेक्षा लोकांना एकाच सिनेमात छोट्या छोट्या तीन-चार कथा पाहायला जास्त आवडतं. नुकत्याच नेटफ्लिक्सवर आलेल्या ‘लुडो’ या सिनेमामुळे ते पुन्हा स्पष्ट झाले आहे.
एकच एक कथा तीन तास किंवा कमी म्हटले तरी अडीच तास पाहात बसायला कोणाला एवढा वेळ आहे? एवढाली मोठी कथा पाहायलाही अलीकडे प्रेक्षकांना कंटाळाच यायला लागला आहे. क्रिकेटमध्येही कसोटी सामन्यांपेक्षा एकदिवसीय… आणि आता तर फक्त ट्वेन्टी ट्वेन्टी ओव्हर्सचे सामने लोकप्रिय होऊ लागलेच आहेत ना… तसंच सिनेमाच्या बाबतीतही झालंय. एकच कथा एवढा वेळ कोण बघत बसणार? झटपट छोट्या छोट्या कथा ऐकायला आताशा लोकांना आवडू लागलंय. म्हणूनच तर एकाच चित्रपटात तीन ते चार वेगवेगळी कथानके दाखवण्याची पद्धत रूढ होऊ लागली आहे. लोकांनाही हा बदल आवडतोय. पण हा प्रकार काही आताच लॉकडाऊनमुळे रूढ होतोय असं नाही. यापूर्वीही एकाच चित्रपटात अनेक कथानके देण्याचे प्रकार झाले होते.
कोरोना व्हायरसच्या संकटामुळे लोक घरातच बसून राहिले. लॉकडाऊनमुळे त्यांना घरात राहावे लागले. त्यामुळे घरातच मनोरंजन देणार्या वेबसिरीज प्रसिद्ध होऊ लागल्या. याच माध्यमात ‘लुडो’ नावाचा एक सिनेमा काहीच आठवड्यांपूर्वी नेटफ्लिक्स या ओटीटी माध्यमावर आला होता. अनुराग बसू यांचं दिग्दर्शन असलेल्या या चित्रपटात अभिषेक बच्चन, पंकज त्रिपाठी, राजकुमार राव, फातिमा सना शेख, सान्या मल्होत्रा, आदित्य रॉय कपूर, रोहित सराफ, पर्ल माने, इनायत वर्मा असे वेगवेगळे अभिनेते वेगवेगळ्या कथानकांमध्ये दिसले. या चित्रपटाची थीमच लुडोच्या चार रंगांप्रमाणे चार कथानके दाखवणारी होती. यात कथा चार वेगवेगळ्या असल्या तरी एका विशिष्ट ठिकाणी या चारही कथा एकमेकांना जोडल्या जातात. म्हणूनच म्हणायला या चार कथा असल्या तरी लुडोप्रमाणे चारही रंग एकत्र म्हणूनच पाहिल्या जातात. हेच या सिनेमाचे खरे वैशिष्ट्य.
नेटफ्लिक्सवरील ‘लुडो’ या चित्रपटात चार अगदी वेगवेगळ्या जॉनरच्या चार कथा पाहायला मिळतात. त्यामुळे मजा येते.
म्हणतात ना, जे काही घडते तो केवळ योगायोग नसतो. त्यामागे काही ना काही ईश्वरी संकेत असतो. एक कारण असते. पण आपल्याला ते ठाऊक नसते. याच आशयावर ‘लुडो’ हा चित्रपट बेतलेला आहे. यातल्या चारही कथा वेगवेगळ्या चालतात, पण एका विशिष्ट वळणावर त्या एकमेकींना धडकतात. पहिली कथा आकाश चौहान (आदित्य रॉय कपूर) याची आहे. त्याच्या प्रेयसी आहनासोबत (सान्या मल्होत्रा) त्याची एक नको त्या अवस्थेतील व्हिडीओ टेप पोर्न साईटवर लीक झालेली दिसते. आहनाचे चारेक दिवसांत लग्न होणार असते. पण या व्हिडीओ टेपच्या लीक होण्याने आकाश आणि सान्याचे खासगी जीवन धोक्यात येते. त्यांना या स्थितीतून सत्तूभैय्या त्रिपाठी (पंकज त्रिपाठी) बाहेर काढतो, असे कथानक आहे.
दुसरी कथा आहे बिट्टू तिवारी (अभिषेक बच्चन) याची. तो एकेकाळी सत्तू त्रिपाठीचा उजवा हात मानला जात असतो. पण आता वैवाहिक जीवनासाठी त्याने गुन्हेगारी विश्वाला रामराम ठोकला आहे. आता त्याचे मोठे कुटुंब आहे. पण आधी केलेले वाईट कर्म आपला पिछा सोडत नाही म्हणतात. तसाच त्याच्या जीवनाचा शेवट होतो.
तिसरी कथा आहे आलोक गुप्ता म्हणजेच आलू (राजकुमार राव) याची… तो पिंकी (फातिमा सना शेख) हिच्यावर मनापासून प्रेम करत असतो. पण या प्रेमप्रकरणात तो चोरी करतोच, पण एका खुनाच्या घटनेतही तो अडकतो. चौथी कहाणी राहुल अवस्थी (रोहीत सराफ) आणि श्रीजा थॉमस (पर्ल माने) यांची आहे. ते दोघेही आपापल्या जीवनाला कंटाळले आहेत. नोकरीचाही त्यांना वैताग आला आहे. पण नशीब एका झटक्यात असा पासा टाकते ज्यामुळे दोघांनाही जीवनात रस वाटू लागतो. या चारही कथा सत्तूभैय्यामुळे जोडल्या गेल्या आहेत. या सत्तूभैय्यामुळेच सगळ्या सोंगट्या आपापल्या घरात जातात.
वेगवेगळी कथानके घेऊन त्यावर एकसंघ चित्रपट बनवायचा हे खरं तर मोठं आव्हानच… कारण प्रेक्षक त्या प्रत्येक वेगवेगळ्या कथेतही गुंतले पाहिजेत आणि तरीही या सर्व कथा एका दोर्यात बांधलेल्या आहेत असेही वाटले पाहिजे ही तारेवरची मोठी कसरत आहे. पण बॉलीवुडमधल्या काही दिग्दर्शकांनी हे शिवधनुष्य चांगलं पेललंय असं म्हणता येईल. आतापर्यंत असे प्रयत्न अनेकदा झाले आहेत. पण त्यात दिग्दर्शकांनी बोल्ड विषय घेणं टाळलेलं आहे. काहीही असले तरी एकाच सिनेमात एकाहून जास्त कथानके हा प्रयोग यशस्वीच झालेला आहे.
दक्षिणेतील प्रसिद्ध दिग्दर्शक मणिरत्नम यांनी बॉलीवूडमध्ये २००४ साली ‘युवा’ हा सिनेमा बनवला तेव्हा त्याची थीमही अशीच होती. त्यात तीन कथा एकमेकींभोवती गुंफल्या होत्या. मायकल, अर्जुन आणि लल्लन या तिघांच्या या कथा होत्या.
मणिरत्नम सिनेमा बनवणार म्हणजे काहीतरी वेगळे नक्की असणार हे प्रेक्षकांनाही माहीत होते. म्हणूनच यात तेव्हाच्या बड्या कलाकारांनीही काम करायला होकार दिला होता. यात अभिषेक बच्चन, करीना कपूर, राणी मुखर्जी, विवेक ओबेरॉय, ईशा देओल आणि अजय देवगण असे दिग्गज कलाकार वेगवेगळ्या कथानकांमध्ये पाहायला मिळाले.
या सिनेमाला समीक्षकांनी भरपूर वाखाणले असले तरी प्रेक्षकांकडून त्याला फारसा रिस्पॉन्स मिळालेला नव्हता. मात्र मणिरत्नम यांचा ‘एक सिनेमा अनेक कथा’ हा प्रयोग यशस्वी झालाच होता असेच नमूद करावे लागेल.
त्यानंतर तीनेक वर्षांनी २००७मध्ये दिग्दर्शक अनुराग बसू यांनी ‘लाईफ इन अ मेट्रो’ हा सिनेमा याच थीमवर बनवला होता. यातही काही व्यक्तिरेखा एकमेकांना भेटतात. या प्रत्येकाचे विचार वेगवेगळे असतात, मते वेगवेगळी असतात. पण त्या सगळ्यांची प्रेमाची भावना एकच असते. याशिवाय ते मुंबई शहराचाच एक भाग असतात. या सिनेमातही कथानके वेगवेगळी असल्यामुळे अभिनेत्यांची फौजच होती. धर्मेंद्र, नफिसा अली, शिल्पा शेट्टी, शायनी आहुजा, के. के. मेनन, कंगना राणौत, शर्मन जोशी, कोंकणा सेन-शर्मा, इरफान खान वगैरे… या सगळ्यांच्याच या सिनेमात प्रमुख भूमिका होत्या असेच म्हणावे लागेल. हा सिनेमा
बॉक्स ऑफिसवर बर्यापैकी यशस्वी झाला होता. यावरूनही ‘एक सिनेमा अनेक कथा’ हा प्रकार लोकांना आवडला होता असे म्हणता येऊ शकते.
अनुराग बसूंचा हा सिनेमा ज्या वर्षी आला त्याच वर्षी २००७ मध्ये ‘सलाम-ए-इश्क’ हा सिनेमा आला होता. निखिल आडवाणी यांचं दिग्दर्शन असलेल्या या सिनेमात सहा वेगवेगळ्या व्यक्तिरेखांवर प्रकाशझोत टाकण्यात आला होता. या सर्वांच्या कथा वेगवेगळ्या होत्या. पण प्रेम आणि लग्न या विषयावर हे सर्वजण एकसारखेच वागत होते असे दाखवण्यात आले आहे. ठिकाण कोणतेही असो, मुंबई असो, दिल्ली असो, आग्रा असो की अगदी दिल्ली… व्यक्तिरेखा कुठल्याही असल्या तरी त्यांच्या कथांमध्ये साम्य दिसून आले. यात जॉन अब्राहम, विद्या बालन, गोविंदा, अनिल कपूर, जुही चावला, अक्षय खन्ना, आयेषा टाकिया, सलमान खान, प्रियंका चोप्रा हे सगळेच प्रमुख भूमिकेत दिसले होते.
पुढे २०११ सालीही एकाच सिनेमात अनेक कथा ही थीम ‘शोर इन दी सिटी’ या सिनेमात पाहायला मिळाली. कृष्णा आणि राज निदीमोरू यांच्या या सिनेमात तीन प्रमुख व्यक्तिरेखा होत्या. त्यांच्या तीन कथा… पण ते तिघेही क्लायमॅक्सला एकत्र आलेले दिसले. या सिनेमात फार मोठे स्टार्स नव्हते, पण तरीही समीक्षकांनी हा सिनेमा वाखाणला होता. २०१३ साली आलेल्या ‘डेव्हिड’ या बिजॉय नांबियार दिग्दर्शित चित्रपटाची संकल्पनाही हीच होती. यातही तीन कथानके वेगवेगळ्या मार्गांवरून जाताना दिसल्या. यातील व्यक्तिरेखा, प्रसंग आणि ठिकाणे वेगवेगळी होती. पण यातील तिघांचीही नावे डेव्हिड हेच होते. नावातील साम्य हेच एक काय ते यात साम्य होते. बाकी तिघांचे स्वभाव व वागणे वेगवेगळेच दिसले. पण या वेगवेगळ्या कथानकांमध्येही प्रेक्षकांना खूप मजा आली होती.