पारो म्हटलं की डोळ्यांपुढे चटकन संजय लीला भन्साळींचा ‘देवदास’ हा सिनेमा उभा राहातो. त्यात ऐश्वर्या राय हिने पारो अक्षरश: जिवंत केली होती. आताही लवकरच ‘पारो’ नावाची वेबसिरीज उल्लू या ओटीटी माध्यमावर येतेय. यात पारो ही मध्यवर्ती भूमिका ‘कुमकुम भाग्य’ मालिकेत चमकलेली अभिनेत्री लीना जुमानी हिने पटकावली आहे. अश्मीत पटेल, राजीव सेन वगैरेंनी गाजवलेल्या ‘पेशावर’ या वेबसिरीजनंतर याच ओटीटी प्लॅटफॉर्मवर आता ‘पारो’ ही वेबसिरीज सुरू होणार आहे.
या वेब मालिकेचे नाव पारो असले तरी ती देवदासची पारो नसून एका गावात राहणारी सर्वसामान्य गरीब व सुंदर मुलगी आहे. फसवून लग्न करून नंतर पतीकडून विकून टाकण्याचा धक्का तिला सहन करावा लागतो. या मुलीचे दुसरे लग्नही लावण्यात येते असे कथानक आहे. मुलांच्या तुलनेत मुलींच्या कमी संख्येमुळे दिल्ली, युपी, हरयाणात गरीब लोकांना आपली मुलगी गाय बकरीसारखी विकण्याची वेळ येते. त्यावर ही वेबसिरीज भाष्य करते. या वेबसिरीजची निर्मिती विभू अग्रवाल यांनी केली आहे. ही भूमिका खूपच संवेदनशील असल्याने आपण ती करायला तयार झाल्याचे लीना जुमानी हिने स्पष्ट केले.