भारतीय माणसांना दोन गोष्टीचे आकर्षण असतं, पहिलं क्रिकेट आणि दुसरं चित्रपट. या दोन्ही गोष्टींचा संगम असलेल्या (पीबीसीएल) पुनीत बालन सेलिब्रिटी लीग या कलाकारांच्या क्रिकेट सामन्याच्या दुसर्या सीजनचा लीलाव १००हून अधिक सेलिब्रिटींच्या उपस्थितीत, मुंबईत ताज हॉटेलमध्ये संपन्न झाला. पीबीसीएलच्या अंतिम विजेत्यांना जो चषक दिला जाणार आहे, त्याचे अनावरण राज्याच्या गृहविभागाचे सहसचिव कैलास गायकवाड, जान्हवी धारीवाल बालन आणि महेश मांजरेकर, शरद केळकर, सिद्धार्थ जाधव, प्रवीण तरडे, सुबोध भावे आणि पुनीत बालन यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनोद सातव यांनी केले. प्रास्ताविक पीबीसीएलचे प्रवर्तक पुनीत बालन यांनी केले आणि राहुल क्षीरसागर यांनी अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात हा लिलाव पार पाडला. ११ ते १५ जानेवारी २०२३ या कालावधीत ही स्पर्धा पुण्यात होणार आहे. या स्पर्धेत ६ संघ सहभागी होणार आहेत. प्रत्येक संघामध्ये १६ नामवंत कलाकारांचा सहभाग असेल. यामध्ये तोरणा लायन्स या संघाचं नेतृत्व पुनीत बालन, रायगड पँथर्स या संघाचे नेतृत्व प्रवीण तरडे, शिवनेरी रॉयल्स या संघाचे नेतृत्व सुबोध भावे, सिंहगड स्ट्रायकर्स या संघाचे नेतृत्व सिद्धार्थ जाधव, प्रतापगड टायगर्स या संघाचे नेतृत्व शरद केळकर आणि पन्हाळा जॅगवार्सचे नेतृत्व महेश मांजरेकर करणार आहेत.