सोनी मनोरंजन वाहिनीवरील ‘इंडियन आयडॉल-13’ या रिअलिटी शोमध्ये या शनिवारी व रविवारी रात्री 8 वाजता ‘भेडिया’ आणि ‘आशिकी’ या चित्रपटांचे कलाकार हजर राहणार आहेत. शनिवारी ‘भेडिया’ चित्रपटाचे कलाकार वरुण धवन आणि कृती सेनन यांच्या उपस्थितीत आईचे ऋण कृतज्ञतेने स्मरत ‘थॅंक यू मां’ हा विशेष भाग सादर करण्यात येणार आहे, तर रविवारी दीपक तिजोरी, अन्नू अग्रवाल आणि राहुल रॉय या सदाबहार कलाकारांच्या उपस्थितीत ‘आशिकी’च्या आठवणींना उजाळा देण्यात येईल! इतकेच नाही, तर, ‘थॅंक यू मां’ विशेष भागासाठी हिमेश रेशमिया आणि विशाल दादलानी या परीक्षकांसोबत मनोज मुंतशिर दिसेल. ‘आशिकी’च्या विशेष भागात प्रसिद्ध गायक कुमार सानू परीक्षकांच्या पॅनलवर हजर असेल. यावेळी तो ‘आशिकी’ सिनेमाच्या पोस्टरविषयीचे रहस्य उकलणार आहे. या चित्रपटाचे कलाकार या चित्रपटाची कल्पना कशी सुचली इथपासून ते त्यांच्या या अत्यंत गाजलेल्या चित्रपटाच्या विविध पैलूंविषयी भरभरून बोलताना दिसतील. त्यांच्या सांगण्याप्रमाणे, या चित्रपटाला इतकी लोकप्रियता मिळेल याची कल्पनाच त्यांनी केली नव्हती. इतकेच नाही, तर रविवारी आपले स्पर्धक या चित्रपटातील गाजलेली गाणी सादर करतील, आणि परीक्षक म्हणून हजर असलेला कुमार सानू देखील मंचावर जाऊन त्यांच्या सुरात सूर मिसळेल आणि ती जादू पुन्हा जिवंत करेल.