त्या वेळेस ‘मार्मिक’ बहुधा २५ पैशाला मिळत असे. त्यातील व्यंगचित्रातून आमच्या मनातील उद्वेग व्यक्त होत असे. मुख्यत: सर्व राजकारण्यांविरुद्ध. बहुतेक तरुणांना कळत नव्हते की, तरीही आपण बेकार का? एकूण महागाई का? आपल्या घरची स्थिती कशी सुधारणार! ‘मार्मिक’मध्ये उत्तरे अशी नव्हती- किंवा जी होती ती अतिशय संभ्रमित करणारी. त्याच काळात मुख्यत: ‘मराठा’मुळे वाचायची (जहाल भाषेची) सवय झाली होती. ‘मार्मिक’ त्याच जहालपणाचा प्रक्षोभक व्यंगचित्र आविष्कार होता.
मी मॅट्रिक (म्हणजे त्या वेळेस अकरावी, शालांत परीक्षा) जरा लवकरच म्हणजे साडेचौदाव्या वर्षीच झालो. शाळा चेंबूर हायस्कूल. चेंबूर तेव्हा म्हणजे मी शाळेत असताना एखाद्या खेड्यासारखे होते. आमची शाळा आणि गावठाणचा परिसर एकच. शाळाच मुळी स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतलेल्या काही मंडळींनी पुढाकार घेऊन उभी केली होती. गावातील लोकांकडून वर्गणी काढून आणि शिक्षकांनी कमी पगार घेऊन. सुरुवातीचे आमचे वर्ग सांडू आयुर्वेदिक कंपनीच्या गोठ्यात भरत असत. ते गोठे सांडूंनी शाळेसाठी दिले होते.
सर्व विद्यार्थी आणि शिक्षक सुट्टीच्या दीड-दोन महिन्यांत श्रमदान करून शाळेच्या बांधकामाला मदत करीत. त्यामुळे मजुरीचा खर्च वाचत असावा. सुमारे तीन वर्षे (सातवी ते दहावी) मे महिन्याची व दिवाळीची सुट्टी श्रमदानासाठी ठरलेली. त्यामुळे सुट्टीला ‘गावी’ जाणे वगैरे नाही. तसे आम्हाला जाण्यासारखे गाव वगैरे नव्हतेच म्हणा!
जन्मापासून सहावीपर्यंत पुण्याला. शाळा भावे स्कूल. शाळेत भरती करताना एकदम दुसरीला, त्यामुळे पहिलीचे वर्ष वाचले. सहावीपर्यंतचे शिक्षण ‘नादारी’त. (‘नादारी’ म्हणजे आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांसाठी मुलांना फी न घेता शिक्षण घेता येणे, परंतु वेळच्या वेळी उत्पन्नाचा दाखला शाळेला न दिल्यास शाळेत प्रवेश नाकारला जाऊ शकतो. असो.)
पुणे सोडून मुंबईला यावे लागले वडिलांच्या मुंबईतील नोकरीमुळे. पुण्यात असताना आई नोकरीला होती. (कॉमन्मेस्थ इन्शुरन्स कंपनीत, जी पुढे एलआयसीत विलीन झाली.) त्या काळी म्हणजे १९५०च्या दशकात हाऊसिंग बोर्डाने बांधलेल्या इमारती होत्या. तेथे जागा मिळण्यासाठीही उत्पन्नाची मर्यादा असे. ती ओलांडली की जागा परत बोर्डाकडे. ती मर्यादा होती ३५० रुपये मासिक उत्पन्नाची. त्याच्या आत कुटुंबप्रमुखाचे उत्पन्न असावे लागे.
चेंबूरमध्ये अशा हाऊसिंग बोर्डाच्या पाच-सहा वसाहती होत्या. मुख्यत: कारखान्यात काम करणार्या कामगार कर्मचार्यांसाठी. या वसाहतींमध्ये सर्व भाषिक लोक राहत असत. आमच्या बिल्डिंगमध्ये एक तामीळ कुटुंब, एक सिंधी, एक मल्याळी आणि एक पंजाबी अशी कुटुंबे होती. एकूण सहा ब्लॉक्समध्ये चार (हल्लीच्या भाषेत परप्रांतीय!) बिगर मराठी.
एकूण कॉलनीत मिळून साधारपणे ५०-५५ टक्के मराठी आणि बाकी बिगर मराठी. या वसाहती ‘इंडस्ट्रियल’ ऊर्फ औद्योगिक क्षेत्रात काम करणार्यांसाठी होत्या. आम्हाला मराठी-बिगर मराठी असा भेद फारसा जाणवत नसे.
चेंबूर हायस्कूल सुमारे तीन-चार किलोमीटर अंतरावर होते. वर म्हटल्याप्रमाणे शाळाच मुळी स्वातंत्र्य चळवळीत असलेल्यांनी उभी केली होती. सर्व शिक्षक जवळपास गावठाण परिसरात राहत असत. त्यांचे जीवनमान गरिबीच्या वर, पण कनिष्ठ मध्यमवर्गीय. त्यांच्या जागाही लहान आणि त्यांचे पगारही तसे कमीच. सर्व शिक्षक कुठल्या ना कुठल्या तरी चळवळीशी संबंधित होते. शाळेच्या संस्थापकांमध्येही काँग्रेस, समाजवादी आणि कम्युनिस्ट पार्श्वभूमी असलेले लोक होते. मी शाळेत आलो १९५६ साली सातवीमध्ये.
तो काळ होता संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा. आमचे जवळजवळ सर्व त्या चळवळीत होते किंवा समर्थक होते. आचार्य अत्र्यांचा ‘मराठा’ हेच वृत्तपत्र परिचयाचे होते. त्या वेळेस ‘महाराष्ट्र टाइम्स’ नव्हता. (तो पुढे १९६२ मध्ये सुरू झाला.)
आचार्य अत्र्यांचे अग्रलेख हा एकूणच चर्चेचा विषय असे. त्याचप्रमाणे त्यांच्या पहिल्या पानावरच्या हेडलाइन्स! स. का. पाटलांना ‘सदोबा’, मोरारजी देसाईंना ‘मोर्या’, अर्थमंत्र्यांना ‘अनर्थमंत्री, अन्नपुरवठा मंत्र्यांना ‘अन्नान्न मंत्री’ अशा शब्दांची संभावना पहिल्या पानावर केली जात असे. बातमी आणि विनोद, शब्दप्रभा आणि शब्दआघात, प्रचार आणि भूमिका, अतिशयोक्ती आणि सत्यता यातील सीमारेषा पुसल्या जात असत.
जवळजवळ दर आठवड्याला एक दोन सार्वत्रिक हरताळ (‘बंद’ संस्कृती उदयाला यायची होती), मोठाले मोर्चे, जंगी सभा. अमर शेख, अण्णाभाऊ साठे, गवाणकर यांचे दणाणून टाकणारे फड आणि त्यांच्या शाहिरींनी सुरू होणारी अत्रे, डांगे, एसेम प्रभृतींची भाषणे, लाठीमार, अश्रुधूर आणि कधी गोळीबार यांनी वातावरण भारावलेले असे. शाळेला ‘अनधिकृत’ सुट्टी किंवा शाळा लवकर सोडून दिली जाणे असेही दोन-तीन महिन्यांतून एक-दोन वेळा होत असे.
तसे आम्ही शाळकरी विद्यार्थी असलो तरी शिवाजी महाराजांच्या जीवनकथा सांगणारे ओजस्वी पोवाडे, महाराष्ट्राच्या थोरवी संबंधीची शाहिरी गाणी, मराठी संस्कृतीची महती सांगणारी भाषणे, मराठी भाषेचे वैभव दाखविणारे लेख, ज्ञानेश्वर-तुकारामांपासून ते गाडगे महाराजांपर्यंत संतपरंपरा, लोकमान्य टिळकांची तेजस्वी, लेखणी, फुले-आंबेडकरांचे आणि आगरकर-कर्व्यांचे स्फूर्तिदायक समाजसुधारणेचे कार्य, स्वातंत्र्य चळवळीतील महाराष्ट्राचे/मराठी माणसाचे बलिदान, साने गुरुजी ते सेनापती बापट यांचा व्यापून राहणारा प्रभाव, मराठी साहित्य संमेलने आणि रंगभूमी अशी सांस्कृतिक नेपथ्यरचना असलेली मुंबई आणि महाराष्ट्राची राजकीय प्रणाली आमच्यावर सातत्याने बिंबवली जात असे. मुंबई हे तेव्हा कामगारवर्गाचे शहर होते. लालबाग-परळचा गिरणगाव आणि त्यावर फडकणारा कॉम्रेड डांगे यांच्या नेतृत्त्वाचा लाल बावटा ही मध्य मुंबईची ओळख होती. शिवाजी पार्क-दादर परिसर असो वा गिरगाव-सर्वत्र अत्रे-डांगे-एसेम आणि ‘मराठा’ दैनिकाचे अधिराज्य असे. साहित्य, कला, रंगभूमीबद्दल आकर्षण वाटणारे आणि बर्याच अंशी सभ्यतेने व्यापलेले राजकारण होते. (अतिरेक, वाह्यातपणा, अर्वाच्चपणा होता- अगदी अत्र्यांच्या ‘मराठा’तही, पण मर्यादेतच).
अखेरीस मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र मिळण्याची घोषणा झाली. वातावरण जल्लोषाने बहरले. बेळगाव-कारवार आणि डांग-उंबरगाव महाराष्ट्रात आले नाही म्हणून पुन्हा संघर्षाच्या तुतार्याही फुंकल्या गेल्या, पण १ मे १९६० रोजी शिवाजी पार्कवर पंडित नेहरूंनी महाराष्ट्राचा कलश यशवंतराव चव्हाण यांच्या हाती सुपूर्द केला आणि मराठी माणसाचा उत्साह गगनाला जाऊन भिडला. यशवंतराव हे ‘मराठा’च्या माध्यमातून प्रखर टीकेचे लक्ष्य झाले होते, पण आता ते महाराष्ट्राचे हिरो (आणि अर्थातच मुख्यमंत्री) झाले. संयुक्त महाराष्ट्र समितीची त्रिमूर्ती अत्रे-डांगे-एसेम आता राजकारणाच्या विंगेत गेली. संयुक्त महाराष्ट्र समिती विसर्जित केली गेली.
मी दहावीतून अकरावीत गेलो. आता वातावरणात चळवळ, मोर्चे, हरताळ नव्हते. महाराष्ट्र प्राप्त झाला होता. त्या चळवळीतले आमचे शिक्षक आता अधिक स्थिरावले होते. आमचा मॅट्रिकचा अभ्यास सुरू झाला. पण याच काळात फारसा गाजावाजा न झालेली, पण आचार्य अत्रेंच्या ‘मराठा’मुळे प्रकाशात आलेली एक घटना होती-
१३ ऑगस्ट १९६० रोजी सुरू झालेले ‘मार्मिक’ हे मराठीतले पहिले व्यंगचित्र साप्ताहिक. तसे इंग्रजीत ‘शंकर्स वीकली’ हे व्यंगचित्र साप्ताहिक होते, पण ‘बाळ ठाकरे’ अशा लफ्फेदार सहीचे ‘मार्मिक’ सुरू झाले आणि मराठी वृत्तपत्रांच्या इतिहासाला एक कलाटणी मिळाली.
‘शिवसेने’चा जन्म त्या ‘मार्मिक’च्या कुशीत झाला. ५ जून १९६६ रोजी अशी संघटना उभी करण्याची घोषणा ‘मार्मिक’मधून प्रसिद्ध झाली. ‘मार्मिक’ची स्थापनाच अत्रेंच्या वाढदिवशी केली होती.
‘मार्मिक’ १९६० मध्ये सुरू झाला असला तरी त्याचा परिसर मुख्यत: वर्तमानपत्रे वाचणार्या वर्गापुरता होतो. व्यंगचित्र साप्ताहिक म्हणून विशेष कुतूहल होते हे खरे. महाराष्ट्राला चलाख टिंगलटवाळी, बिनधास्त टोप्या उडविणे, जिव्हारी आघात करणारा विनोद करणे वगैरे ‘सांस्कृतिक सवयी’ होत्याच. आचार्य अत्रेंनी या शैलीचा आणि वृत्तीचा बेबंद विकास केला होता. त्यामुळे ‘मार्मिक’मधील कुंचल्याची फटकेबाजी मराठी माणसांमध्ये झपाट्याने रुजू लागली. शिवाय साठीच्या दशकात साप्ताहिके, पाक्षिके, मासिके, नियतकालिके आणि अनियतकालिकेही यांनी मराठी साहित्य, कला विश्वाला बहर आला होता. राजकीय व्यंगचित्रांना वाहिलेले साप्ताहिक त्या वातावरणात सहज वावरू लागले. जरी यशवंतराव चव्हाणांनी ‘मार्मिक’चे बारसे केलेले असले तरी यशवंतरावांपासून तत्कालीन तमाम राजकीय पुढार्यांच्या फिरक्या त्यांच्या कुंचल्यामधून घेतल्या जात. माझ्या आठवणीप्रमाणे ‘मार्मिक’ तेव्हा दर गुरुवारी येत असे. द. पां. खांबेटे हे त्या काळातील एक (रहस्य) कथा लेखक त्याच्या संपादनाचं काम करायचे.
मी १९६१ मध्ये मॅट्रिक (अकरावी) झालो. पुढे काय करायचे हा मोठा प्रश्न होता. कॉलेजमध्ये जाऊन चार वर्षे पदवीपर्यंत शिक्षण घेण्याची ऐपत नव्हती. शिवाय माझे मॅट्रिकचे मार्क्स फारसे आश्वासक नव्हते. सामान्य नाही आणि असामान्यही नाही अशा माझ्यासारख्या विद्यार्थ्यांना ‘करीयर’ वगैरे संकल्पनाही माहीत नसत. वर्गातली हुषार मुले ‘सायन्स’ घेऊन इंजिनीअरिंग वगैरेकडे जाण्याचा विचार करीत. त्यांची आर्थिक स्थिती उत्तम नसली तरी तसा विचार परवडण्याइतकी होती. त्यांचा हेवा वगैरे वाटण्याचा प्रश्नच नव्हता. कारण तेवढी तरी अवकात होती की नाही कुणास ठाऊक!
त्या काळी ‘इंडस्ट्रीयल ट्रेनिंग इन्स्टिट्युटस् ऊर्फ ‘आयटीआय’चे सर्टिफिकेट आणि डिप्लोमा कोर्सेस सरकारतर्फे सुरू गेले होते. माझ्या काही वर्गमित्रांनी ते कोर्सेस घ्यायला सुरुवात केली. (हल्ली ‘स्किल इंडिया’ – व्होकेशनल कोर्सेस वगैरेची चर्चा असते – जणू नरेंद्र मोदींनीच ती अभिनव संकल्पना मांडली आणि सुरू केली! ‘आयटीआय’ म्हणजे तसेच कोर्सेस!) मी एक वर्षाचा ‘रेडिओ सर्व्हिसिंग’चा सर्टिफिकेट कोर्स करायचे ठरवले, पण तो कोर्स तेव्हा आयटीआयमध्ये नव्हता. म्हणून तो प्रायव्हेट कोर्स केला. हुषार विद्यार्थी बीएससी आणि नंतर मेडिकल वा इंजिनीअरिंग कोर्सेस करण्यासाठी गेले. कोर्स भले पूर्ण झाला, अगदी पहिल्या वर्गात, पण या सर्टिफिकेट कोर्सनंतर नोकरी-बिकरी? पण आता रेडिओ दुरुस्त करणे, इतकेच काय नुकतेच बाजारात आलेले ट्रान्झिस्टर रेडिओ बनवणे वगैरे (स्किल्स) जमा झाली होती. त्यामुळे लोकांच्या घरी जाऊन रेडिओ दुरुस्त करून ‘सर्व्हिस चार्ज’ लावून पैसे मिळवता येऊ लागले.
पण माझ्या मोठ्या बहिणीच्या (ती शाळेत कायम पहिल्या नंबरात!) आग्रहावरून रुपारेल कॉलेजला आर्टसला प्रवेश घेतला. मॉर्निंग कॉलेज. म्हणजे नोकरीसाठी जाता आले पाहिजे- कॉलेज क्लासेस संपल्यावर! आमचे सर्वांचे वय साधारणपणे १६ ते १९ आणि सर्वांसमोर मुख्य प्रश्न पुढे काय करायचे? नोकरी कोण, कुठे, कसली देणार? आम्हाला २-३ वर्षे सिनिअर असलेले विद्यार्थी पदवी प्राप्त करून बाहेर आले होते, पण त्यांच्यापुढेही तोच प्रश्न. पुढे काय? आम्ही जवळजवळ सर्वजण चाळींमध्ये, लहान जागांमध्ये, हल्लीच्या भाषेत ‘वन बीएच के’ आणि काही अगदी थोडे ‘टू बीचके’मध्ये. कुणाच्याही घरात ‘चार आकडी’ पगार मिळवणारे कुणीही नाहीत. कुणाच्याही कुटुंबात फ्रीज, वॉशिंग मशीन, एसी वगैरे काही नाही. टीव्ही वगैरे नव्हतेच. फोन तर कोणाच्याच घरात नाही. स्कूटर, मोटरबाईक वगैरे कुणाकडेही नाही. चार-दोन मुलांच्या घरात सायकल होती. रेडिओ बहुतेकांकडे होता, पण ‘सोफा कम बेड’ शैली रुजलेली नव्हती. कुणालाही उदरनिर्वाहाची समस्या नव्हती, पण कुणाकडेच फारसे पैसे, बचत वगैरे नसे. बहुतेक जणांचे ‘सेव्हिंग’ पोस्टात केले जात असे. जी कुटुंबे कोकणातून आली होती त्यांना ‘गावी’ दरमहा मनिऑर्डर करावी लागे. (आज कोकणातून मुंबईला पैसे येऊ शकतात इतकी सुबत्ता तिकडे आली आहे. कोकणात स्कूटर्स, कार्स, घरात फ्रीज, कलर टीव्ही, इंटिरिअरही येऊ लागले आहे.)
मुंबईतील कामगार म्हणजे गिरणी कामगार. एकूणच कामगारवर्ग हा सातारा-कराड वा कोकण पट्ट्यातून आलेला. मुंबईचा विदर्भ-मराठवाड्याशी तसा फारसा जैवसंबंध नव्हता. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या काळात विदर्भ-मराठवाड्याचा संदर्भ येई इतकेच.
आमच्यासारख्या ‘नव-बेकार’ ‘नवस्कील शिक्षित’ तरुणांना वाटत असे की, आपल्याला नोकरी कुठे दिसतही नाही. आपली कौटुंबिक स्थिती आपण शाळेत जायला लागल्यापासून ते शालांत परीक्षेपर्यंत साधारण तशीच आहे. ज्यांचे वडील गिरणी वा अन्य कारखान्यात नोकरीला होते त्या ठिकाणी संप झाला की थेट दारिद्र्याच्या कड्यावर.
मला त्या वेळचा प्रीमियर ऑटोमोबाईल कंपनीत झालेला एक संप पाच-सहा महिने चालू असल्याचे स्पष्ट आठवते. त्या कंपनीत कामाला असणारे काही जण आमच्या ‘इंडस्ट्रियल हाऊसिंग बोर्डाचा कॉलनीत’ राहत असत. त्यांची अवस्था आजही आठवते. असो.
त्या वेळेस ‘मार्मिक’ बहुधा २५ पैशाला मिळत असे. त्यातील व्यंगचित्रातून आमच्या मनातील उद्वेग व्यक्त होत असे. मुख्यत: सर्व राजकारण्यांविरुद्ध. शिवसेना १९६६मध्ये स्थापन झाल्यावर ‘मार्मिक’चा खप वाढला. ‘वाचा आणि थंड बसा’ अशा उपहासगर्भ आवाहनानंतर ‘वाचा आणि उठा’ अशा आदेशापर्यंत मार्मिक गेला होता, पण ‘उठा’ कुणाविरुद्ध? ते ‘शत्रू’ म्हणजे राजकारणी आणि पुढे ‘लुंगीवाले’ ऊर्फ मद्रासी.
शिवसेना स्थापन झाली ‘मुंबईसह’ महाराष्ट्र निर्माण झाल्यानंतर सहा वर्षांनी. बहुतेक तरुणांना कळत नव्हते की, तरीही आपण बेकार का? एकूण महागाई का? आपल्या घरची स्थिती कशी सुधारणार! ‘मार्मिक’मध्ये उत्तरे अशी नव्हती- किंवा जी होती ती अतिशय संभ्रमित करणारी. त्याच काळात मुख्यत: ‘मराठा’मुळे वाचायची (जहाल भाषेची) सवय झाली होती. ‘मार्मिक’ त्याच जहालपणाचा प्रक्षोभक व्यंगचित्र आविष्कार होता. साधारण त्याच सुमाराला ‘माणूस’ सुरू झाले होते. १९६१ साली. प्रथम द्विसाप्ताहिक आणि नंतर साप्ताहिक. त्यातूनही प्रक्षोभक आवाहने नसली तरी अस्वस्थतेला वाट करून देणारे लेखन असे. ‘सोबत’ हे ग. वा. बेहरे यांचे साप्ताहिकही त्याच काळातले.
त्याच दशकात म्हणजे १९६५ च्या सुमाराला ‘नव-नाट्य’ चळवळ छबिलदास शाळेतून सुरू झाली. त्या ‘प्रायोगिक’ नाटकांचा आशयही अस्वस्थतेचा- असंतोषाचा.
विजय तेंडुलकरांची नाटके, ‘माणूस’मध्ये येणार्या अनिल बर्वे, अरुण साधू यांच्या लेखमाला वि. ग. कानिटकरांची ‘भस्मासुराचा उदयास्त’ हे हिटलरच्या जर्मनीचे विदारक चित्र रंगवणारी लेखमाला. असे बौद्धिक संचित जमत असतानाच गिरणी कामगारांचे संप, कॉम्रेड डांगेंच्या जंगी सभा, जॉर्ज फर्नांडिसचे आक्रमक कामगार संघर्ष हे सर्व १९६० ते १९६७ काळात आणि याच वातावरणात १९६७ मध्ये काँग्रेसचा देशातील आठ राज्यांत पराभव झाला. राम मनोहर लोहियांचा ‘काँग्रेस विरोधी’ आघाड्यांचा सिद्धांत हा त्या पराभवाचा वैचारिक पाया होता.
पण त्या पराभवातून काँग्रेसला पुन्हा उभारी देण्यासाठी इंदिरा गांधींनी पक्षात संघर्ष सुरू केला. पक्ष फुटला, पण वर उल्लेखिलेली अस्वस्थता आणि असंतोष इंदिरा गांधींनी त्यांच्या शिडात घेतला. १९६०पासून सुरू झालेले हे अस्वस्थ दशक १९७० मध्ये लोकसभा विसर्जित होऊन संपले.
१९७१च्या ‘गरिबी हटाओ’ या इंदिरा गांधींच्या घोषणेने आणि पुनरुज्जीवित झालेल्या काँग्रेसच्या प्रचंड विजयाने त्या दशकाची सांगता केली. बाकी इतिहास गेल्या ५० वर्षांत आपण पाहिला आहे.
आमच्या पिढीला भावनिक आविष्कार १९६० नंतर ‘मार्मिक’ने दिला. आकारहीन अस्वस्थता आणि विचारहीन चळवळ यातून पुढे देशातले नवे राजकारण सुरू झाले!