‘नागीन’ या मालिकेची फ्रँचायजी असलेली ‘कुछ तो है’ ही नवी मालिका नुकतीच कलर्स वाहिनीवर सुरू झाली आहे. या मालिकेत रेहान (हर्ष राजपूत) आणि प्रिया (कृष्णा मुखर्जी) यांचा प्रवास दाखवण्यात येणार आहे. याच मालिकेत मानिनी डे, रेशम टिपणीस आणि वैशाली ठक्कर या तीन प्रसिद्ध अभिनेत्री सामील होणार आहेत. रागेश्वरीचे पात्र साकारणारी रेशम टिपणीस म्हणाली, फण्टॅसी फिक्शन मालिकेत मी प्रथमच अभिनय करत आहे. म्हणून मी त्यासाठी खूप उत्सुक आहे. मी यात प्रियाच्या आईची भूमिका करतेय. ही भूमिका अतिशय सुंदर लिहिलेली आहे. ती तिच्या मुलीशी एकनिष्ठ आहे, पण त्याचवेळी तिच्या मनात गुप्त दुःख लपलेले आहे. ही रागेश्वरी प्रेक्षकांना नक्की आवडेल, असेही ती सांगते.
प्रियाच्या शाळेच्या वॉर्डनचे पात्र वैशाली ठक्कर साकारत आहे. ती म्हणाली, नागीन सिरीजचा भाग बनणे हे प्रत्येकाचे स्वप्न आहे. म्हणून मी थरारून गेले आहे. ही वॉर्डन वरून कठोर आहे, पण आतून काळजी करणारी व संरक्षक आहे, असे ती म्हणते. रेहानची आई पंपोश ही व्यक्तिरेखा मानिनी डे करत आहेत. त्या म्हणाल्या, मी या मालिकेत एका अत्यंत रंजक स्त्रीची भूमिका साकारत आहे. ती प्रत्येक पार्टीची जान आहे. विनोदी स्पर्श असणारी ही भूमिका साकारण्यासाठी मी उत्सुक आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.