अभिनेत्री कृती खरबंदा हिने आपल्या ‘14 फेरे’ या आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणाला आज सुरूवात केली. यात ती विक्रांत मॅसी याच्यासोबत दिसणार आहे. कृतीच्या ‘तैश’ या सिनेमाला नुकतेच चांगले यश मिळाल्यानंतर तिने आपल्या पुढच्या प्रोजेक्टला सुरूवात केली आहे.
बेजॉय नांबियार यांचे दिग्दर्शन असलेल्या ‘तैश’ या सिनेमामुळे कृतीला प्रेक्षकांचे प्रेम तर भरपूर मिळालेच, पण समीक्षकांनीही तिच्या अभिनयाची प्रशंसा केली. हा सिनेमा तिच्या आतापर्यंतच्या कारकीर्दीतला सर्वात लक्षणीय चित्रपट ठरला आहे. दिग्दर्शक नांबियार आपल्या सिनेमातील अचूक पात्रनिवडीसाठीच ओळखले जातात. ‘तैश’मधील भूमिकेसाठी कृती खरबंदा हिची निवडही त्यांनीच केली होती.
या सिनेमानंतर कृतीने आता झी स्टुडिओजच्या ‘14 फेरे’ या सिनेमाचे शूटिंग आज शनिवारपासून सुरू केले आहे. यात विक्रांत मॅसी तिचा नायक आहे. या सिनेमाचे कथानक सामाजिक अंगाने जाणारे असून प्रत्येक भारतीयाला ते आपलेसे वाटेल असा कृतीला विश्वास आहे. हा सिनेमा देवांशू सिंह दिग्दर्शित करणार आहेत. या सिनेमाचे शेड्युलही जाहीर करण्यात आले आहे. यात ती मुंबईत 10 दिवसांचे शूट करेल. त्यानंतर लखनौमध्ये 25 दिवस शूट होईल आणि अखेरीस जयपूरमध्ये 20 दिवसांचे शूट ठेवण्यात आले आहे.