काळभैरव यांना हिंदू धर्मात खूप मानाचे स्थान आहे. शैव धर्मातही त्यांना एक उग्र रूप म्हणून मान्यता आहे. आपल्या हिंदू धर्मात काळभैरव यांना ‘दंडपाणी’ असेही बोलले जाते. (कारण त्यांच्या हातात पाप्यांना दंड देण्यासाठी एक छडी किंवा दंडुका असतो) आणि स्वस्वा म्हणजेच ‘ज्याचे वाहन कुत्रा आहे’ असा असेही मानले जाते. काळभैरव यांचा जन्म ज्या दिवशी झाला त्या दिवशी ‘काळभैरव जयंती’ साजरी केली जाते. यंदा ही जयंती येत्या सोमवारी ७ डिसेंबरला आली आहे.
अशी झाली काळभैरवांची उत्त्पत्ती
पौराणिक कथांनुसार भगवान काळभैरव हे महादेव शंकराच्या क्रोधामुळे उत्पन्न झाले होते. एकदा ब्रह्मा, विष्णू आणि महेश्वर यांच्यात मोठी चर्चा सुरू होती. आपल्या तिघांमध्ये सर्वात श्रेष्ठ कोण? असे त्या चर्चेचे स्वरुप होते. तेव्हा बोलता बोलता ब्रह्माजींनी भगवान शंकराची निंदा केली. यामुळे शंकर क्रोधित झाले आणि त्यांनी रौद्ररूप धारण केले. या रौद्ररूपामुळे काळभैरवाची उत्त्पत्ती झाली.
संतापात कापले ब्रह्माजींचे शीर
काळभैरव हे भगवान विश्वनाथाचे रूप मानले जातात. ब्रह्माजींनी जेव्हा महादेव शंकराची निंदा केली तेव्हा संतापाच्या भरात काळभैरवाने ब्रह्माजींचे शीर तेथेच कलम केले. पण यामुळे त्यांना ब्रह्महत्येचे पाप लागले. पण त्यापासून वाचण्यासाठी भगवान शंकर यांनी त्यांना एक उपाय सुचवला. त्यांनी काळभैरव यांना पृथ्वीवर पाठवले आणि म्हटले की, ज्या ठिकाणी हे शीर स्वत:हून तुझ्या हातातून खाली पडेल तेथेच तुझे पाप संपुष्टात येईल. काळभैरव पृथ्वीवर आले. येथील एका ठिकाणी त्यांच्या हातातून ब्रह्माजींचे शीर पडले. ती जागा होती काशी… म्हणूनच काशीला जाणारा प्रत्येक भाविक काशी विश्वनाथासोबतच काळभैरवाचेही दर्शन अवश्य करतो. त्यानंतरच तीर्थाटन पूर्ण होते म्हणतात.