थोरामोठ्यांना ज्ञानवृक्षाखाली सत्याचा शोध लागतो तसा मला या सत्याचा शोध लागला. मग काय? चँग-कै-शेकच्या दुसर्या बायकोचा पाय लंगडा आहे यापासून थेट दिल्लीजवळ शेतात दुर्योधनाचं मोडलेलं मांडीचं हाड सापडलं यापर्यंत काहीही मी बेडरपणे सांगू लागलो. माझा हा प्रचंड व्यासंग पाहून बागी दिपला असावा. कारण तो पुन्हा कधी माझ्या वाटेला गेला नाही. पण माझं अज्ञानातलं सुख तिथंच संपलं.
इग्नोरन्स इज ब्लिस! – कुणीतरी.
हे वाक्य नक्की कोण म्हणालंय हे शोधून काढणं तसं अजिबात अवघड नाही. नुसतं हे गुगलवर टाकलं तरी अॅरिस्टॉटलपासून डोनाल्ड ट्रंपपर्यंत अनेकांची नावं येतील. पण हे करताना अर्थ न कळण्याचा मूळ गर्भ हरवेल. नेमकं हे अज्ञानातलं सुख हल्ली आपल्यापासून हिरावून घेतलं जातंय.
पूर्वी असं नव्हतं. एखादी गोष्ट एकतर आपल्याला सरळसरळ माहित असायची किंवा नसायची. आपल्या अज्ञानाबद्दल सम्यक ज्ञान असणं तेव्हा सर्वमान्य होतं. माझं याउलट असावं. आपल्या ज्ञानाच्या खोलीबद्दल माझं अज्ञान प्रचंड होतं. उदाहरणार्थ, लहानपणी मला गरज नसलेल्या अनेक गोष्टी मुद्दामहून डोक्यात साठवायची आवड होती. मॉरिटेनियाची राजधानी नौकाचोट आहे यापासून एक जपानी येन म्हणजे भारतीय पंचवीस पैसे (तेव्हा होते, लगेच गुगलून बघू नका. आता एक्सचेंज रेट बघणं सोडलंय) इथपर्यंत सगळी निरर्थक माहिती!
ती डोक्यात असायची. अॅझटेक राजाच्या दगडी सिंहासनाला इकिपाली म्हणतात, कुठल्यातरी क्रिकेट मॅचमध्ये कुणीतरी एका बॉलवर २८६ धावा काढल्या होत्या, ब्रुगेल थोरला यानं म्हणी आणि वाक्प्रचारांचं पेंटिंग काढलं होतं अशा अनेक तद्दन निरूपयोगी गोष्टी मला माहित असायच्या. अर्थात, माझ्या इवल्याश्या मेंदूत यापेक्षा जास्त जागा नसल्यानं अभ्यासाबद्दलची माहिती तिथं कोंबणं मला काय, ब्रह्मदेवालाही शक्य नव्हतं. आणि या अशा मेंदूचा मला त्याकाळी सार्थ अभिमान होता.
त्या काळी (म्हणजे मी नववीला होतो तेव्हा) अशी माहिती साठवून ठेवणार्यांना `जनरल नॉलेज आहे’ असं समजलं जाई. प्रत्येकजण एखाद्या विषयात तज्ज्ञ असायचा. कुणाच्या डोक्यात फुटबॉलचा इतिहास होता, तर कुणी रणजीचा इतिहास घडाघडा सांगू शकायचं, कुणी जुने सिनेमे या विषयांत पीएचडी केलेली असायची तर कुणी इतिहासतज्ज्ञ असायचा. कुणी वाचनवेडा सतत वाचलेल्या कादंबर्यांची नाव सांगत असायचा.
आपल्या प्रांतात कुणी आपल्यापेक्षा जास्त माहिती मिळवून घुसखोरी करू नये म्हणून प्रत्येकाला सतत अपडेट राहावं लागायचं. सर्वसंचारी भुतांप्रमाणे सगळ्या विषयांवर बोलू शकणारे मोजके लोक असायचे. मी त्यातला एक. हे असं भूत व्हायचं तर सतत नाकाला पुस्तक लावून ते डोक्यात उतरवत बसावं लागे. आणि नुसतं जनरल नॉलेज असून चालायचं नाही, बुद्धिमान समजलं जावं यासाठी कथाकादंबर्या वगैरे वाङ्मयही वाचावं लागे.
तेव्हा घरात पुस्तक बाळगून असणारे लोक कमी असायचे (आजही कमीच आहेत म्हणा.) त्यामुळं, लायब्ररीची मेंबरशिप हाच एक वाचनाचा मार्ग होता. आमच्या दोन मेंबरशिप असल्यानं त्यातल्यात्यात श्रीमंत असल्यासारखं वाटायचं. या लायब्ररीच्या जोरावरच, आपण भरपूर वाचन करतो अशी सगळ्यांची सोयीस्कर समजूत करून देणं मला तोवर जमलं होतं. लायब्ररीतून कोलारकरांचं सर्वोत्कृष्ट मराठी कथा वगैरे पुस्तकं आणून मी मराठी वाङ्मयावर घाऊक टिप्पणी करू शकायचो. दळवींचं सारे प्रवासी घडीचे वाचून मला कोकणावर अस्खलित बोलता आलं. आठवीनंतर दरवर्षी मी सुट्टीत टॉलस्टॉयचं वॉर अँड पीस घेऊन यायचो आणि पंधरा दिवसांनी पात्ररचना वाचून डोकं गरगरू लागलं की परत नेऊन द्यायचो. हे इतकं सवयीचं झालं होतं की मी वॉर अँड पीस मागितलं की लायब्ररीयनही `काय ब्रह्मे, सुट्टी लागली वाटतं?’ असं विचारायचा. पण त्या जोरावर, मी टॉलस्टॉयच्या अॅना कॅरेनिनाबद्दल `काही असलं तरी वॉर अँड पीसची सर याला नाही’ असं नम्र आणि प्रांजळ मत देऊ शकायचो. खांडेकरांचं ययाति कधी वाचलं नाही, पण कुठल्याश्या पुस्तकावर असलेली खांडेकरांची प्रदीर्घ प्रस्तावना नेटानं वाचून काढली. तेव्हापासून खांडेकरपण माझ्या ज्ञानाच्या पोतडीत जमा झाले. चारपाच इंग्लिश सिनेमे पाहिल्यावर चॅप्लिन ते अँथनी हॉपकिन्स हा प्रवास टप्प्यात आला.
फुटबॉल विश्वचषकाचे सामने पाहिल्यावर `ह्या! यापेक्षा तुला सांगतो, १९७४ साली…’ असं सांगायची धमक आली. एकेकाला गोळा करत माझी झोळी समृद्ध होत चालली होती.
ज्ञान-हायवेतून भरधाव चाललेल्या माझ्या गाडीसमोर `काम चालू रस्ता बंद’ ही पाटी आली बागीच्या रूपात. मी दहावीला ज्या क्लासला जायचो तिथं बागी माझ्या शेजारी बसायचा. बागीची महाज्ञानी माणूस अशी आधीपासून ख्याती असावी. मला तर हा भुरटा थापाड्या वाटत होता. पण, बागीला आधीपासून ओळखणारे सगळे एखाद्या वृद्ध तपस्वी साधूशी अडाणी गावकर्यानं अदबीनं बोलावं तसं हळुवार आवाजात त्याला शंका विचारायचे. बागीही `ह्या! तुला इतकं साधं कसं माहित नाही?’ असा चेहरा करून त्यांच्या शंकांचं निराकरण करायचा.
`तुला गॅब्रियल क्लार्क माहित आहे का रे?’ मला शिष्य करून घ्यायची बागीला एक दिवस अनिवार इच्छा झाली असावी. त्यानं मला पहिला बॉल टाकला.
`कोण? इंग्लंडचा क्रिकेटर?’ मी नावावरून अंदाजे बॉल टोलावला.
`नाही रे.’ गोल्डन इगल ऑफ नामूर’मधला हिरो. प्रसिद्ध नट होता तो.’
`नाही, काय झालं त्याला?’ मी कोण हा क्लार्क आहे त्याची अजिबात पर्वा नसल्यासारखं बोललो. माझं उत्तर ऐकून बागीनं विजयी मुद्रेनं आजूबाजूला पाहिलं. सगळेजण एखादं भिजलेलं कुत्रं पाहावं तसं माझ्याकडं पाहात होते. कुणीतरी पुढच्या दोन रांगातही मला गॅब्रियल क्लार्क माहित नाही ही बातमी पुरवली. दोघाचौघांनी माझ्याकडं वळून मला नीट बघून घेतलं. सगळ्यांच्या चेहर्यावर हा क्लार्क जणू काही त्यांच्या बापाच्या ऑफिसात हेडक्लार्क असल्यासारखे भाव होते. मी धुमसत क्लास संपायची वाट पाहात राहिलो. पुढचा बॉल बागीनं टाकलाच नाही. क्लास संपल्यावर सगळ्यांनी मलाच घेरून `गॅब्रियल क्लार्क कसा माहित नाही बुवा तुला?’ असा प्रश्न अचंब्यानं विचारून जेरीस आणलं. तीनचार मुलीही मला चोरून पाहात होत्या. एकूणात मला शरम वाटू लागली.
मी पुढचे दोन दिवस क्लासला गेलोच नाही. लायब्ररीत जाऊन तिथं क्लार्कबद्दलची माहिती शोधली. सगळे कोश, एनसायक्लोपिडीया, सिनेमाची मासिकं – जे काही दिसेल ते पालथं घातलं. क्लार्कबद्दल एक अवाक्षरही लिहिलेलं मिळालं नाही. बागीनं आपल्याला मूर्ख बनवलंय हे तेव्हा लक्षात आलं. दोन दिवसांनी क्लासला गेलो.
बागी माझ्या प्रतिप्रश्नाची वाटच बघत होता हे मला पहिल्या प्रश्नानंतर लक्षात आलं.
“बाग्या, कोण रे तो तुझा गॅब्रियल क्लार्क? कुठल्याच पुस्तकात ज्याबद्दल एक शब्द छापून येत नाही असला कसला तुझा प्रसिद्ध नट?”
“कोण ब रं गॅब्रियल क्लार्क?’ बागी साळसूद चेहर्यानं म्हणाला. “अरे हो! मी तुला क्लार्क गेबलबद्दल विचारलं होतं तू नावही विसरलास का एवढ्यात?’
माझ्या डोळ्यासमोर मी पुढचे दोन दिवस पुन्हा लायब्ररीत बसून विश्वकोश धुंडाळतोय हे चित्र उभं राहिलं. मी तडकलो. `बाग्या, माझी मेमरी इतकी वाईट नाही. तू नक्कीच गॅब्रियल क्लार्क म्हणाला होतास.’
`बरं, तो मुद्दा नाही. तुला क्लार्क गेबल माहित आहे का?’
मला मी स्वयंचीत होण्याचा धोका दिसू लागला. पण मी सावरलो.
`मला तीन क्लार्क गेबल माहित आहेत. त्यातला तुझा नक्की कुठला?’
`सिनेमातला. बाकीचे आणखी कोण तुला माहित आहेत?’ बागीनं चुकून नो बॉल टाकला.
`एक लेखक होता आणि दुसरा इंग्लंडचा उमराव होता.’ मी हवेत बॅट घुमवली.
आता सगळ्यांच्या नजरा बागीकडं वळल्या.
`तू म्हणतोस तो आर्थर सी क्लार्क. तो वेगळा.’ बागीनं बाऊंडरी लाईन दूर नेली.
`आर्थर सी क्लार्क मला माहिताय रे’ निरंजन घाटेंच्या कुठल्यातरी पुस्तकात क्लार्कचं नाव वाचलेलं मला आठवलं. ‘तो आर्थर सी क्लार्क म्हणजे विज्ञानकथावाला.’ घाटेबाबा की जय!
`मग असतील बुवा तीनतीन क्लार्क गेबल.’ सव्वीस चालीनंतर विश्वनाथन आनंद आणि क्रॅमनिक बरोबरी मान्य करतात तशी बागीनं तडजोड काढली.
बागी आणि माझ्यात बरोबरी झाली ही बातमी सगळ्या क्लासमध्ये पसरली. अर्थात, एका म्यानात दोन तलवारी राहणार नाहीत हे आम्हां दोघांनाही माहित होतं. पहिली संधी मिळेल तेव्हा बागी खिंडीत गाठून माझा काटा काढणार हे नक्की होतं. मी पुन्हा दोन दिवस क्लासला गेलो नाही. लायब्ररीतले नवल, विचित्र विश्व, रिप्लेच्या नवलकथा वगैरे सगळं सगळं पिसाटासारखं वाचून काढलं. त्या काळात हे सगळं वाचून लक्षात ठेवावं लागायचं. आजच्यासारखं सरळ गुगलवर टाकायची सोय नसल्यानं मेंदूरूपी छोट्या संगणकावर सगळी भिस्त असायची.
ही असली पुस्तकं मी जितकी वाचत गेलो तितकं `जे काही घडलं’ त्यापेक्षा `जे काही घडलं असेल असं समजून लिहिणं’ किती सोपं आहे याची मला जाणीव होत गेली. सत्यासत्यतेच्या पडताळणीच्या एक पाऊल पुढं जाऊन पाहिलं की ती गोष्ट सत्य आहे इतकी मनाची ठाम धारणा असणं किती महत्त्वाचं आहे हे मला कळलं. थोरामोठ्यांना ज्ञानवृक्षाखाली सत्याचा शोध लागतो तसा मला या सत्याचा शोध लागला. मग काय? चँग-कै-शेकच्या दुसर्या बायकोचा पाय लंगडा आहे यापासून थेट दिल्लीजवळ शेतात दुर्योधनाचं मोडलेलं मांडीचं हाड सापडलं यापर्यंत काहीही मी बेडरपणे सांगू लागलो.
माझा हा प्रचंड व्यासंग पाहून बागी दिपला असावा. कारण तो पुन्हा कधी माझ्या वाटेला गेला नाही. पण माझं अज्ञानातलं सुख तिथंच संपलं. आपल्याला सर्वकाही माहित आहे आणि नसलं तरी आपण ते घडवू शकतो हा फोकस तिथून आला.
पुढं काही वर्षांनी इंटरनेट आलं. गुगल आलं, मग विकीपिडीया आला. लोकांना सगळी माहिती एका क्लिकवर मिळू लागली. क्षणोक्षणी अपडेट होत असलेल्या माहितीच्या पुरात एन्सायक्लोपिडीया ब्रिटानिकासारखे प्रतिष्ठितही वाहून गेले. माहितीचा खजिना सर्वांसाठी खुला झालाय असं लोक म्हणू लागले. हे असं काही ऐकलं की मला एक अनामिक भीती वाटायची. आपल्याला हव्या त्या घटना घडवण्याचा हक्क आपल्याकडून हिसकावून घेतला जातोय असं वाटायचं.
आणि मग, व्हॉट्सअॅप आलं.
लंकेत रावणाचा राजवाडा सापडला यापासून आमटेंच्या लिंबाच्या सुरस कहाण्यांपर्यंत कशावरही मेसेज येऊ लागले. लोक त्यांवर विश्वास ठेवून भक्तिभावानं ते पुढं पाठवू लागले. आणि थोडक्यात, माहितीच्या प्रलयात नोहाची नाव पुन्हा तरंगू लागली.