खरगपूर आयआयटीने आज ‘जेईई अॅडव्हान्स्ड – 2021’ परीक्षेचा अभ्यासक्रम जाहीर केला. आयआयटी संस्थांमध्ये प्रवेशासाठी ही परीक्षा घेण्यात येते. je&erdved.aced.in या अधिपृत वेबसाईटवर हा अभ्यासक्रम विषयनिहाय जाहीर करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे परीक्षेच्या सरावासाठी जेईई अॅडव्हान्स्डच्या वेबसाईटवर मॉक टेस्टही उपलब्ध करून देण्यात आली आहे.
येत्या 3 जुलै रोजी ही परीक्षा दोन सत्रांमध्ये घेण्यात येणार आहे. जेईई अॅडव्हान्स्डला बसण्यासाठी विद्यार्थ्यांना आधी जेईई-मेन परीक्षा उत्तीर्ण व्हावी लागणार आहे. जेईई-मेन परीक्षेतील टॉप करणारे अडीच लाख विद्यार्थी जेईई अॅडव्हान्ससाठी पात्र ठरणार आहेत. आयआयटी प्रवेशासाठी बारावीमध्ये 75 टक्के गुणांची अट यंदा रद्द करण्यात आली आहे. केवळ बारावी उत्तीर्ण इतकाच निकष ठेवण्यात आला आहे. जेईई अॅडव्हान्स्ड परीक्षेसाठी नोंदणी दिनांक, हॉल तिकीटची उपलब्धता आणि इतर तारखा नंतर जाहीर केल्या जाणार आहेत. जेईई अॅडव्हान्स्ड परीक्षेत उत्तीर्ण होणारे विद्यार्थी देशातील 23 आयआयटी संस्थांमध्ये प्रवेशासाठी पात्र ठरणार आहेत.