130 कोटी लोकसंख्या असलेल्या हिंदुस्थानात लोक गुण्या गोविंदाने नांदतात, हे आपल्या देशाचे सौंदर्य आहे त्यामुळे ही राष्ट्रीय एकात्मता कायम टिकवण्यासाठी आंतरजातीय, आंतरधर्मीय विवाहांना प्रोत्साहन द्यायला हवे असे स्पष्ट करत मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी आंतरधर्मीय लग्न करणाऱ्या नव दाम्पत्याला दिलासा दिला.
कल्याण येथे राहणाऱ्या एका 19 वर्षीय मुस्लिम तरुणीचे घरापासून 15 मिनिटांच्या अंतरावर राहणाऱ्या एका हिंदू मुलावर प्रेम जडले. 30 डिसेंबर 2020 रोजी दोघांनी पळून जाऊन लग्न केले. याप्रकरणी मुलीच्या वडिलांनी खडकपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी धाव घेतली मात्र तक्रार दाखल करून घेण्यास पोलिसांनी नकार दिला. 25 दिवस उलटूनही आपल्या मुलीचा छडा लागत नसल्याने तिच्या वडिलांनी हायकोर्टात हेबिस कॉर्पस दाखल केला. या याचिकेवर आज न्यायमूर्ती एस.एस. शिंदे आणि न्यायमूर्ती मनीष पितळे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात आली. सुनावणीवेळी न्यायमूर्तींनी मुलीच्या उपस्थित पालकांची समजूत काढली. ती तुमचीच मुलगी आहे, बालपणापासून तुम्ही तिला लहानाची मोठी केली आहे. त्यामुळे तुम्ही झालं गेलं विसरून त्या दोघांच्या नात्याचा आदर करावा. असे सांगत मुलीचा ताबा मिळावा यासाठी मुलीच्या वडिलांनी केलेली हबियस कॉर्पस याचिका न्यायमूर्ती एस.एस. शिंदे यांनी फेटाळून लावली.
हायकोर्टाचे निरीक्षण
हिंदुस्तानात 3 हजारांपेक्षा जास्त जाती, धर्म असून दर 25 किलोमीटर अंतरावर बोली भाषा बदलते. नंदूरबार येथील आदिवासी पाडा असलेल्या ठिकाणी भाषेच्या ज्ञानाअभावी दुभाषकाचा वापर करावा लागतो आपल्या देशात वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक गुण्यागोविंदाने राहतात हे आपल्या देशाचे एक वैशिष्टय आहे.