इंडियन प्रीमियर लीग, म्हणजेच ‘आयपीएल’मध्ये धडाकेबाज कामगिरी झाल्यानंतर टीम इंडियाच्या शिलेदारांनी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत सपाटून मार खाल्ला. सलामीच्या दोन्ही सामन्यांमध्ये चारी मुंड्या चीत होत त्यांनी एकदिवसीय मालिका गमावली.
आयपीएलमध्ये दणाणलेला भारतीय क्रिकेटपटूंचा हा धमाका ऑस्ट्रेलियात अचानक फुसका बार का झाला असावा?
वास्तविक, आयपीएलकडे संपूर्ण क्रिकेटविश्वाच्या नजरा असतात. भारतीय क्रिकेटपटूंबरोबरच इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, साऊथ आफ्रिका आदी देशांमधील क्रिकेटपटूंचा ओढा आयपीएलकडे असतो. त्याचे कारणदेखील स्पष्ट आहे. या स्पर्धेतून त्यांना गलेलठ्ठ कमाई होते. भारतीय क्रिकेटपटूंच्या तुलनेत आम्ही अधिक मेहनत घेतो. आम्ही अधिक तंदुरूस्त आहोत. आमच्या देशातील क्रीडासंस्कृतीमध्ये अधिक स्पर्धात्मक वातावरण आहे. तरीही, क्रिकेटच्या मार्केटमध्ये भारतीय खेळाडूंची अधिक चलती आहे, असे उघड मत ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंनी व्यक्त केले होते. तसेच, त्यापाठोपाठ स्वतंत्र बिझनेस एजंट नेमून रीतसरपणे भारतीय क्रीडा जाहिरात क्षेत्रामध्ये त्यांनी चौकार-षटकारांची आतषबाजी केली होती. आयपीएलच्या माध्यमातून जगभरातील क्रिकेटपटू (म्हणजे काय, तर इन मिन आठ-दहा देशांमधील!) आपला बँक बॅलन्स बक्कळ करून घेतात.
कोरोना संसर्गाच्या परिस्थितीमुळे भारतामध्ये खेळविण्यात येणारी आयपीएल स्पर्धा रद्द करण्यात आली. पण, त्यामुळे पुरस्कर्त्यांचे मोठे नुकसान होणार होते. सर्वसाधारणपणे कोणत्याही व्यावसायिक क्रीडा स्पर्धेला तब्बल ६० टक्के उत्पन्न हे प्रक्षेपण, म्हणजेच टीव्ही-इंटरनेट ब्रॉडकास्ट हक्कांमधून मिळत असते. त्यामुळेच, कोणत्याही भूमीवर आयपीएल खेळविली गेली, तरी त्यांना फरक तो काय पडणार! त्याचे प्रक्षेपण झाले, आणि जाहिरातीचा पैसा त्यांच्या पदरी पडला, की त्यांचा हिशेब चुकता झाला. त्यातही, संयुक्त अरब अमिराती क्रिकेट संघटनेने मदतीचा हात पुढे केला आणि यंदाचा आयपीएल हंगाम मोठ्या थाटामाटात झाला.
हे आयपीएल पुराण उगाळण्याचे कारण म्हणजे, भारतीय क्रिकेट संघाने ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेत सपाटून खाल्लेला मार.
सलामीच्या दोन्ही सामन्यांमध्ये पराभूत होत टीम इंडियाने एकदिवसीय सामन्यांची मालिका गमावली. गोलंदाजी, फलंदाजी, क्षेत्ररक्षण अशा सर्वंच आघाड्यांवर त्यांनी सपशेल निराशा केली. सलग दोन सामन्यांमध्ये कांगारूंनी जवळपास ४०० पर्यंत धावांचा डोंगर रचला. आघाडीच्या फलंदाजांनी भक्कम कामगिरी केली. स्टिव्ह स्मिथ याने तर भारताविरुद्ध शतकी खेळी करण्याची जणू सुपारीच घेतली होती! टीव्हीच्या जाहिरातींमध्ये झळकणारे बूम बूम बुमरा, हार्दिक पांड्या, शिखर धवन, सर जडेजा, के. एल. राहुल आणि दस्तुरखुद्द कर्णधार विराट कोहली हे सर्वच फिके पडले. ऑस्ट्रेलियामधील खेळपट्ट्या वेगवान व उसळत्या असतात, तेथील मैदाने मोठी असतात वगैरे वगैरे… प्रत्येक मालिकेच्या पूर्वी अशा प्रकारच्या होमवर्कचे धडे भारतीय क्रिकेटपटूंना दिले जातात. पण, प्रत्यक्षात घोडा मैदानात त्यांच्या कामगिरीचे भुईनळे उडणे दूरच, ते अक्षरशः भुईसपाट होतात. यंदाचा दौरादेखील त्याला अपवाद नव्हता. याउलट प्रचंड मेहनती असलेल्या कांगारूंच्या शिलेदारांनी नेमक्या मोक्याच्या क्षणी आपला खेळ उंचावला आणि हा एकतर्फी विजय साकार केला. उथळ पाण्याला खळखळाट फार, असे म्हणतात. तसेच काहीसे भारतीय क्रिकेटपटूंचे होत आहे. माध्यमांचे अवाजवी एक्स्पोजर, कष्ट-मेहनत आणि गुणवत्तेऐवजी बाजारू प्रवृत्तींचा शिरकाव आणि विजिगिशू वृत्तीचा अभाव, अशा कारणांची जंत्री या पराभवानंतर पुढे करता येईल. कदाचित, मालिकेतील अखेरचा सामना जिंकून भारतीय संघ काहीशी लाज राखेलही. पण, पुन्हा एकदा मूळ मुद्दा कायम राहतो. तो म्हणजे ऐन परीक्षेच्या वेळी अवसानघात का केला जातो. कठीण सामन्याच्या वेळी आपला खेळ उंचावून विजयश्री प्राप्त करतो, तोच खरा व्यावसायिक खेळाडू. मग, टीम इंडियाचे शिलेदार हे खरोखरीच व्यावसायिक आहेत का? की, केवळ आयपीएलच्या झगमगाटामध्ये उजळून निघालेले मुखवटे आहेत? भारताचे प्रतिनिधित्व करणारे इतर खेळांचे अनेक आंतरराष्ट्रीय प्राथमिक सुविधांपासून वंचित राहतात. आणि केवळ क्रिकेटच्या अतिप्रेमाच्या अट्टहासापायी आपण क्रिकेटपटूंचे विनाकारण लाड करतो आहोत का? हा सापत्नभाव कुठे तरी थांबणे गरजेचे नाही का? आणि गरजेचे असेल, तर मांजराच्या गळ्यात घंटा बांधणार कोण आणि कधी? आयपीएलच्या हे फुसके बार आणि त्यांच्या समर्थकांना वठणीवर आणणार कोण आणि कधी?