लग्नाला अवघा एक महिना झालेला असताना एका तरुणाने त्याच्या पत्नीला ट्रेनमधून ढकलून दिल्याची धक्कादायक घटना मुंबईतील गोवंडी परिसरात घडली आहे. या घटनेत त्या महिलेचा मृत्यू झाला आहे. हा सर्व प्रकार सहप्रवाशी महिलेने पाहिल्याने तिने मानखुर्द स्थानकातील पोलिसांना याबाबत सांगितले. त्यानंतर पोलिसांनी त्या नराधम पतीला पोलिसांनी अटक केली.
अन्वर अली शेख असे त्या तरुणाचे नाव असून त्याचे महिनाभरापूर्वीच पूनम चव्हाण या महिलेसोबत लग्न झाले होते. पूनमला तिच्या पहिल्या लग्नापासून तीन वर्षांची मुलगी देखील आहे. पूनमने दुसरं लग्न केल्यानंतर ती शेखसोबत मानखुर्दमधील चाळीत राहू लगाली. शेख व पूनम दोघेही बेरोजगार होते व छोटी छोटी कामं करून पैसे कमवायचे.
सोमवारी दुपारी तीनच्या सुमारास पूनम व शेख हे लोकलने प्रवास करत होते. त्यावेळी शेखने पूनमला ट्रेनमधून ढकलून दिले. यावेळी त्यांच्यासोबत प्रवास करणाऱ्या संगीता भालेराव यांनी हा सर्व प्रकार बघितला. त्यानंतर त्यांनी तत्काळ हा प्रकार मानखुर्द स्थानकातील पोलिसाला सांगितला. त्यानंतर पोलिसांनी पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या शेखला अटक केली.
‘ते दोघे पतीपत्नी एकत्र प्रवास करत होते. पत्नी दरवाज्याजवळच्या दांड्याला लटकत होती. काही वेळाने पती तिच्या जवळ आला व त्याने तिला मागून मिठी मारल्यासारखे पकडले. त्यामुळे त्याच्या भरोशावर तील ट्रेनच्या बाहेर लटकत होती. मात्र काही वेळातच त्या नराधमाने त्याची मिठी सोडली. त्यामुळे ती महिला ट्रेनमधून खाली पडली. पत्नी पडल्यानंतरही त्या व्यक्तीच्या तोंडावर काहीच हावभाव नव्हते’, असे या प्रकरणाच्या साक्षीदार संगीता भालेराव यांनी पोलिसांना सांगितले.
सौजन्य : दैनिक सामना