अल्पावधीत रसिकांना सुमधूर अल्बम देणाऱ्या पिकल म्युझिकने भाद्रपद प्रतिपदेचा मुहूर्त साधत ‘गणपती अंगणात नाचतो…’ हे नवे कोरे गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आणले आहे. समीर दीक्षित आणि ह्रषिकेश भिरंगी यांच्या पिकल म्युझिकची प्रस्तुती असलेल्या या गाण्याची निर्मिती निर्मात्या राखी सुरेश गावडा यांच्या एस. आर. एन्टरटेन्मेंटच्या बॅनरखाली करण्यात आली आहे. या गाण्याच्या व्हिडीओमध्ये गणरायाची भव्य मूर्ती पहायला मिळते. संचित चौधरी आणि शीतल अहिरराव या नव्या जोडीवर हे गाणे चित्रीत करण्यात आलेय. गुलालाची उधळण, गणरायाचा जयघोष, ढोल, ताशे, लेझीम, पखवाज, तुताऱ्यांच्या निनादात श्रीगणेशाचे आगमन होते आणि त्यानंतर प्रगटणारे भक्तांच्या मनातील भाव या गाण्यात व्यक्त करण्यात आले आहेत. गोरक्षनाथ वाघमारे यांनी हे गाणे लिहिले असून, व्हिडीओचे दिग्दर्शन राज सहाणे यांनी केले आहे. संगीतकार पी. शंकरम यांनी राधा खुडेसोबत हे गीत गायले आहे.
अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये झळकलेली शीतल अहिरराव या गाण्याच्या निमित्ताने एका वेगळ्याच रूपात दिसतेय. तिच्या जोडीला संचित चौधरीही लक्ष वेधून घेणार आहे. या गाण्याबाबत शीतल म्हणाली की, ‘गणपती अंगणात नाचतो…’ या अल्बमच्या निमित्तानं गणरायाची ऑनस्क्रीन भक्ती करण्याची संधी मिळाली. नावाप्रमाणे विघ्नहर्ता असलेल्या या देवाची आपण भक्त असल्याचेही शीतल म्हणाली. संचित म्हणाला, पिकल म्युझिकची प्रस्तुती असलेल्या या गाण्याच्या माध्यमातून गणपतीची सेवा करण्याची एक वेगळी संधी मिळाल्याचं समाधान आहे. शीतलच्या साथीने हे गाणे रसिकांसमोर सादर करताना खूप आनंद होत असल्याचेही त्याने स्पष्ट केले.