सिनेमात मधुर गाणी असतील तर ती कथा लोकांना आनंद देते. ३९९ पुरस्कार पटकावत विश्वविक्रम करणाऱ्या ‘काळी माती’ या आगामी मराठी चित्रपटात एका शेतकऱ्याची कथा पहायला मिळणार आहे. त्यातही असाच प्रयोग करण्यात आला आहे. दिग्दर्शक हेमंतकुमार महाले यांनी या चित्रपटात ज्ञानेश्वर बोडके या राष्ट्रीय पारितोषिक विजेत्या प्रगतशील शेतकऱ्याची यशोगाथा सादर केली आहे. शेतकरी आणि बैलांचं नातं अतूट असतं. हाच धागा पकडून हेमंतकुमार यांनी या चित्रपटात बैल पोळ्याचे गाणे घेतले आहे. आजवर कोणत्याही मराठी चित्रपटात बैल पोळ्यावर आधारित गाणे पहायला मिळाले नसल्याने या चित्रपटाचे हे एक नावीन्यच ठरणार आहे.
या चित्रपटामध्ये ओमप्रकाश शिंदे, एतशा संझगिरी, दीक्षा भोर, भगवान पाचोरे, पूनम पाटील, पी. के. वाघमारे यांच्या भूमिका आहेत. कल्याण उगळे यांनी बैल पोळा गीत लिहिले असून अविनाश व विश्वजीत या संगीतकार जोडीने त्यावर स्वरसाज चढवला आहे. डॉ. गौरी कवी आणि प्रियांका मित्रा यांनी हे गाणं गायले आहे. पुण्याजवळ असलेल्या खेडमध्ये हे गाणं शूट करण्यात आलं आहे. ‘सण आला बैल पोळ्याचा…’ हे या गाण्याचे बोल आहेत, तर लॉलीपॉप यांनी या गाण्याचे नृत्य दिग्दर्शन केले आहे. या गाण्याबाबत हेमंतकुमार म्हणाले की, बैल पोळा या एकाच सणाला बळीराजा बैलाची पूजा करतो. जो बैल वर्षभर काम करतो, त्याला एक दिवस विश्रांती दिली जाते. त्याला सजवलं जातं, त्याचा सन्मान केला जातो, पूजा केली जाते. या चित्रपटाचा गाभा शेतकरी असल्याने बैल पोळ्याचा प्रसंग डोळ्यांसमोर ठेवून हे गाणे तयार करण्यात आलेय असेही त्यांनी पुढे सांगितले.