एकीकडे महाराष्ट्राने देशात महिला शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणार्या सावित्रीबाई फुले यांची जयंती जोशात साजरी केलेली असताना दुसरीकडे महात्मा जोतिबा आणि सावित्रीबाई यांच्या कार्यावर आधारित ‘सावित्रीजोती’ ही मालिका पुरेशा प्रेक्षकसंख्येअभावी बंद करावी लागते आहे, असं एक उफराटं चित्र महाराष्ट्राने गेल्या काही दिवसांत पाहिलं. फुले दाम्पत्याच्या कामगिरीबाबत त्यांची जन्मभूमी आणि कर्मभूमी असलेल्या महाराष्ट्रातल्या जनतेत अशी उदासीनता दिसत असताना कर्नाटकाने मात्र सावित्रीबाईंच्या कार्याचा केवढा गौरव केला आहे, हे पाहिले की छाती अभिमानाने भरून येते… आणि मन विषादाने!
आधुनिक महाराष्ट्राची ओळख सांगताना आपण शाहू-फुले-आंबेडकरांचा महाराष्ट्र असं म्हणतो. आधुनिक महाराष्ट्राची वैचारिक घडण करणारी आणि जातिभेदमुक्त महाराष्ट्राची पायाभरणी करणारी ही त्रिमूर्ती सगळ्या महाराष्ट्राला वंदनीय आहे. त्यांनी केलेल्या कार्यामुळे ज्यांची धार्मिक दुकानदारी धोक्यात आली अशा वर्गाकडून क्वचित ‘हाच का तो शाफुआंचा महाराष्ट्र?’ अशी कुत्सित विचारणा होते. मात्र, ‘शाफुआ’ या लघुरूपातूनही त्यांना शाहू-फुले-आंबेडकरांचा उल्लेख करावाच लागतो.
आधुनिक महाराष्ट्राला दिशा देणार्या या त्रिमूर्तीबद्दल समाजात नितांत आदर आहे. पण, त्यांच्यापैकी महात्मा जोतिबा फुले आणि त्यांच्या पत्नी, महिला शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणार्या सावित्रीबाई फुले यांच्या कार्यावर आधारित ‘सावित्रीजोती’ ही मालिका पुरेशा प्रेक्षकसंख्येअभावी बंद करावी लागते आहे, असं एक उफराटं चित्र महाराष्ट्राने गेल्या काही दिवसांत पाहिलं. भारतात चित्रपटसृष्टीची मुहूर्तमेढ रोवून भारताच्या अभिरुचीला वळण लावणार्या महाराष्ट्राला आज हिंदी मालिकांच्या प्रभावातून सतत एकमेकांविरोधात कारस्थानं करणारी कुटुंबं, झकपक साड्या नेसून घरात वावरणार्या बायका, दोन चमचे आशयात चार ग्लास पाणी ओतून लांबवलेले एपिसोड अशा निकस मनोरंजनाची सवय लागलेली आहे.
‘सावित्रीजोती’ मालिकेत असले काही नसल्यामुळे या मालिकेला प्रेक्षक लाभले नसावेत का? सावित्रीबाई आणि जोतिबांचे कार्य आता मराठी माणसांना जुनाट आणि कालबाह्य वाटू लागले आहे का? महाराष्ट्रातलीच नव्हे, तर भारतातली कोणतीही मुलगी शिक्षण घेऊन आयुष्यात पुढे जाण्याची, पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून उभे राहण्याची संधी मिळते आहे तीच सावित्रीबाईंमुळे. महाराष्ट्रातल्या शिक्षित स्त्रियांना, मुलींना सावित्रीबाईंच्या या उपकारांचा विसर पडला आहे की काय?
विषण्ण करणार्या या प्रश्नांच्या भोवर्यात डोके गरगरत असताना शेजारच्या कर्नाटकातून एकाच वेळी आनंद आणि खेद या दोन्ही भावना निर्माण करणारी बातमी आली आहे. साहित्यिक, कलावंत, कार्यकर्त्यांच्या एका व्हॉट्सअॅप ग्रूपवर सावित्रीजोती मालिकेवर चर्चा सुरू असताना मराठीतील अनेक कलाकृती, दलित साहित्य कन्नडमध्ये नेणारे बेळगावातले ज्येष्ठ पत्रकार आणि कन्नड भाषेतले सुप्रसिद्ध, लोकप्रिय साहित्यिक डॉ. सरजू काटकर यांनी दिलेली माहिती विलक्षण आनंद देणारी आणि चक्रावून टाकणारीही आहे.
फुले दाम्पत्याच्या कामगिरीबाबत त्यांची जन्मभूमी आणि कर्मभूमी असलेल्या महाराष्ट्रातल्या जनतेत अशी उदासीनता दिसत असताना कर्नाटकाने मात्र सावित्रीबाईंच्या कार्याचा केवढा गौरव केला आहे, हे पाहिले की छाती अभिमानाने भरून येते.
झाले असे की, २०१६ साली सरजू काटकर यांनी सावित्रीबाईंवर एक कादंबरी लिहिली. काटकर यांच्या अन्य पुस्तकांप्रमाणेच या कादंबरीलाही तुफान प्रतिसाद मिळाला. २०१८ साली या पुस्तकाची दुसरी आवृत्ती प्रकाशित झाल्यानंतर काही महिन्यांतच बसवराज भुताळी या निर्मात्याने त्यावर चित्रपट बनवण्याची इच्छा जाहीर केली. काटकरांच्याच कथांवर दोन गाजलेले कन्नड चित्रपट बनवणार्या आणि त्यांसाठी पुरस्कार जिंकणार्या विशाल राज या दिग्दर्शकाने या चित्रपटाचीही धुरा उचलली आणि सुचेता प्रसाद यांना सावित्रीबाईंच्या भूमिकेसाठी निवडले गेले. २०१८ सालीच प्रदर्शित झालेला हा सिनेमा चित्रपटगृहांमध्ये उत्तम चालला आणि कर्नाटक राज्य पुरस्कारांमध्ये त्याने सर्वोत्तम कथा, सर्वोत्तम संवाद, सर्वोत्तम दिग्दर्शन या पुरस्कारांसह सामाजिक जाणीवजागृती करणार्या चित्रपटाचा पुरस्कारही जिंकला. बंगळुरू आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातही तो सर्वोत्तम ठरला.
कर्नाटक सरकारने हा सिनेमा राज्यातल्या सगळ्या शाळांमध्ये दाखवण्याचा निर्णय केला. तो आजवर दीड लाख विद्यार्थ्यांनी पाहिला आहे. हा सिनेमा दाखवल्याबद्दल प्रत्येक शाळेने १५ हजार रुपये निर्मात्याला दिले आहेत. त्याच वेळी निर्मात्याने प्रत्येक शाळेला डॉ. सरजू काटकरलिखित चरित्रग्रंथाच्या पाच ते दहा प्रती भेट दिल्या आहेत. या आवृत्तीत सिनेमात सावित्रीबाई साकारणार्या सुचेता प्रसाद यांची छबी मुखपृष्ठावर झळकत आहे. अशा ३५ हजार पुस्तकांचं वाटप आजवर झालं आहे.
हे सगळे कमी होते म्हणून की काय, कर्नाटकाचे शिक्षणमंत्री सुरेश कुमार यांनी हा चित्रपट पाहिल्यावर ३ जानेवारी हा सावित्रीबाईंचा जन्मदिवस राज्यात शिक्षक दिन (शिक्षकियार दिनचरणे) म्हणून साजरा करण्याचा आदेश दिला.
हे सगळे वाचताना मन भरून येते आणि प्रश्न पडतो, महाराष्ट्रात आजवर शाहू महाराजांवर सिनेमा का तयार झाला नाही? महात्मा फुले आणि सावित्रीबाईंच्या कार्यावर चित्रपट बनवावा, असं आचार्य अत्र्यांनंतर कुणालाच का वाटलं नाही? ज्या कर्नाटकाशी आपला सीमाप्रश्नावर आणि नद्यांच्या, धरणांच्या पाणीवाटपावरून उभा दावा आहे, त्या कर्नाटकाने महाराष्ट्राच्या कर्तबगार लेकीचा एवढा मोठा गौरव करावा हा त्या राज्याचा केवढा मोठेपणा आहे. विचार करा, आपण आपल्याकडच्या महापुरुषांच्या बाबतीत इतके उदासीन आहोत, तर आपण कधी कर्नाटकातल्या बसवेश्वरांसारख्या महान विभूतीवर, अक्क महादेवीसारख्या कवयित्रीवर मराठीत सिनेमा काढू, तो लोक भरभरून रांगा लावून पाहतील आणि तो अनेक पुरस्कारांनी सन्मानित होईल, अशी कल्पना तरी करता येते का?
आपल्या राज्याच्या ओळखीशी संलग्न झालेल्या महापुरुषांविषयी आपल्याला ममत्व नसेल, त्यांच्या कार्याची जाणीव नसेल, त्यांचा विचार करताना आधी जातपातीची समीकरणं डोक्यात येत असेल, तर मग त्यांच्यावर फुले का पडती शेजारी म्हणून खंतावण्यात काय अर्थ? कुठेतरी त्यांच्या कार्याचा यथोचित गौरव होतो आहे, कुणाला तरी त्यांच्या मोठेपणाची जाणीव आहे, कुणीतरी त्यांच्याविषयी कृतज्ञ आहे, या भावनेने सुखावून जाणेच अधिक इष्ट.
-संपादकीय