दहावी, बारावी परीक्षांचे अंतिम वेळापत्रक महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने जाहीर केले आहे. या वेळापत्रकानुसार दहावीच्या लेखी परीक्षा 29 एप्रिल ते 20 मेदरम्यान तर बारावीची परीक्षा 23 एप्रिल ते 21 मेदरम्यान होणार आहे.
या वेळापत्रकात कोणताही बदल होणार नाही. त्यामुळे पालक आणि विद्यार्थ्यांनी या वेळापत्रकाची नोंद घ्यावी, असे आवाहन राज्य शिक्षण मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी केले आहे.
राज्य शिक्षण मंडळाने दोन आठवडय़ांपूर्वी दहावी बारावीच्या परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर केले होते. या वेळापत्रकाची माहिती मंडळाच्या वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात आली होती. यावर पालक, विद्यार्थी, शिक्षक आणि शाळांच्या काही सूचना मागविण्यात आल्या होत्या. त्यानंतर आज हे वेळापत्रक अंतिम करण्यात आले असून यामध्ये कोणताही बदल होणार नाही, अशी माहिती डॉ. भोसले यांनी दिली. तसेच व्हॉट्सअॅप किंवा अन्य माध्यमातून व्हायरल होणारे वेळापत्रक ग्राह्य धरू नये, असे आवाहनही पाटील यांनी केले.
दरम्यान, दहावी आणि बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षा, श्रेणी, तोंडी परीक्षा व अन्य विषयांचे वेळापत्रक स्वतंत्रपणे जाहीर केले जाणार आहे. परीक्षेपूर्वी राज्य शिक्षण मंडळाकडून राज्यातील सर्व शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांना याची माहिती सविस्तरपणे दिली जाईल असेही मंडळाकडून सांगण्यात आले. शिक्षण मंडळाकडून आज जाहीर करण्यात आलेले दहावी बारावीचे वेळापत्रक हे मंडळाच्या अधिपृत www.mahahsscboard.in वेबसाईटवर जाहीर करण्यात आले आहे.
सौजन्य : दैनिक सामना