सरकारकडून रस्त्यांवरच काय, गरीबांच्या भाकरीवरही खिळे ठोकले जातील. कितीही तटबंदी करा, बॅरिकेड्स लावा मात्र, शेतकऱयांचे आंदोलन थांबणार नाही. गरीबांची रोजीरोटी बंद होऊ नये त्यासाठी हे आंदोलन सुरू आहे. तीन कृषी कायदे मागे घेतले नाहीत तर शेतकरी तुमचे सिंहासन परत घेईल, असा खणखणीत इशारा भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांनी आज मोदी सरकारला दिला. टिकैत यांच्या उपस्थितीत हरयाणातील जिंद येथे महापंचायत झाली. यावेळी हजारो शेतकरी, महिला हजर होते.
शेतकरी आंदोलनाला 70 दिवस झाले. हे आंदोलन रोखण्यासाठी मोदी सरकार आणि उत्तरप्रदेश, हरियाणातील भाजप सरकारांकडून सिंघु, टिकरी आणि गाझीपूर सीमांकडे जाणारे महामार्ग जेसीबीने खोदले. रस्त्यांवर खिळे ठोकले. सिमेंट ब्लॉक्सच्या भिंती उभारून तारेचे कुंपन आणि बॅरिकेट्स लावले. परंतु शेतकरी या दडपशाहीला घाबरलेला नाही. उलट शेतकऱयांच्या आंदोलनाला आणखी पाठिंबा वाढला आहे.
उत्तरप्रदेश, हरियाणा, राजस्थानमध्ये प्रचंड महापंचायती होत आहेत. बुधवारी जिंदजवळील कांडेला गावात महापंचायत आयोजित केली होती. राकेश टिकेत यांच्या नेतृत्वाखालील या महापंचायतीला बलबीरसिंग राधेवाल, गुरनामसिंग छदुनी या नेत्यांसह हजारो शेतकरी उपस्थितीत होते. महिलांची संख्या लक्षणीय होती. यावेळी मोदी सरकारविरूद्ध मोठय़ा प्रमाणात संताप व्यक्त करण्यात आला.
पाच ठराव मंजूर
जिंद येथील महापंचायतमध्ये शेतकऱयांच्या साक्षीने पाच ठराव मंजूर करण्यात आले. यामध्ये तीन कृषी कायदे रद्द करा, किमान आधारभूत किंमतीचा (एमएसपी) कायदा करा, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी लागू कराव्यात, शेतकऱयांची कर्जमाफी आणि 26 जानेवारीच्या हिंसाचारानंतर अटक केलेल्या शेतकऱयांची सुटका करा असे हे पाच ठराव मंजूर केले.
लालकिल्ल्यावर गेलेले शेतकरी नव्हतेच
गेली 35 वर्षे शेतकऱयांच्या हितासाठी आंदोलन करीत आहे. संसदेला घेराव घालण्याचा इशारा दिला असेल परंतु लाल किल्ल्यावर जाण्याची भाषा आजवर कधीही केलेली नाही. 26 जानेवारीला जे लोक लालकिल्ल्यावर गेले ते शेतकरी नव्हतेच. जे गेले ते सरकारच्या कटकारस्थानाचा हिस्सा होते. त्यांना लालकिल्ल्यावर जाण्यापासून रोखले का नाही? असा सवाल करीत राकेश टिकेत यांनी घणाघात केला.
राजा घाबरला की गढी सुरक्षित करतो
यावेळी राकेश टिकैत यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. राजा जेव्हा घाबरतो तेव्हा तो आपली गढी सुरक्षित करतो. सध्या तेच सुरू आहे. त्यामुळेच रस्त्यावर खिळे ठोकले जात आहेत. उद्या भाकरीवरही खिळे ठोकले जातील, पण या खिळय़ांना शेतकरी घाबरणार नाही. रस्त्यांवरील खिळय़ांवर पाय ठेवून आम्ही पुढे जाऊ असे टिकैत यांनी सांगितले. ही लढाई शेतकरी जिंकणार आहे. हे आंदोलन शांततेत सुरूच राहिल. जोपर्यंत कायदे रद्द होत नाहीत तोपर्यंत माघार नाही.
कानून वापसी नाही केली तर गद्दी वापसी होईल. शेतकरी सरकारचे सिंहासन परत घेतील असा इशारा त्यांनी दिला. कृषी कायदे रद्द करण्याच्या मुद्दय़ावर सरकारने शेतकऱयांबरोबर चर्चा पुन्हा सुरू करावी असे आवाहनही त्यांनी केले.
40 लाख ट्रक्टर घेऊन रस्त्यावर उतरू
कृषी कायदे रद्द केलेच पाहिजेत. ऑक्टोबरपर्यंत आंदोलन करण्याची आमची तयारी आहे; परंतु सरकारने जर शेतकऱयांचे ऐकलेच नाही तर 40 लाख ट्रक्टर घेऊन देशभरात रॅली काढू. एका राज्यातून दुसऱया राज्यात ही रॅली जाईल, असा इशारा राकेश टिकैत यांनी ‘एएनआय’शी बोलताना दिला आहे.