केंद्र सरकार जोपर्यंत तीनही कृषी विधेयके मागे घेत नाही तोपर्यंत येथून हटणार नाही, असा एल्गार शेतकऱ्यांनी दिल्लीच्या सीमेवर केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ‘मन की बात’ आम्ही ऐकली, आता आमची ‘मन की बात’ त्यांनी ऐकावी असे खडे बोलही शेतकरी संघटनांनी सुनावले. मुँह में राम, बगल में छुरी असे दुटप्पी धोरण आम्हाला मंजूर नाही. अटीशर्तीवर आम्ही सरकारशी चर्चा करणार नाही अशी भीमगर्जनाच शेतकऱयांनी केल्याने आंदोलनाची कोंडी कशी फोडावी या विवंचनेत मोदी सरकार सापडले आहे.
केंद्र सरकारने तीनही कृषि विधेयके मागे घ्यावीत यासाठी पंजाब व हरियाणातील 30 शेतकरी संघटनांनी एकत्रित दिल्लीकडे पूच केले आहे. हरियाणातील भाजपच्या खट्टर सरकारने शेतकऱयांची वाट अडवण्याचा प्रयत्न केला, परंतु तो शेतकऱयांनी हाणून पाडला. शेतकरी आता दिल्लीच्या उंबरठय़ावर ठाण मांडून आहेत. शेतकऱयांनी दिल्लीत यावे, नंतर चर्चा करू अशी अट घालून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी चर्चेचा प्रस्ताव ठेवला. मात्र दिल्लीत बोलावून शेतकऱयांना जेलात डांबण्याचा मनसुबा असल्याचा हल्लाबोल करत शेतकरी संघटनांनी हा प्रस्ताव ठोकरला. शेतकरी नेते बलदेवसिंह सिरसा यांनी सोनिपत, रोहतककडून येणारा बहत्तर गढ, जयपूरहून येणारा हायवे तसेच मथुरा-आग्रा हायवे, गाझियाबाद हायवे हे पाचही रस्ते शेतकरी जाम करणार असल्याचे सांगितले.
विधेयके मागे घ्या, नाहीतर ‘एनडीए’तून बाहेर पडू
भीषण थंडी आणि कोरोना काळात देशातील शेतकरी आंदोलन करत असून हे सरकारसाठी शोभनीय नाही. कृषी विधेयकांचा मोदी सरकारने पुनर्विचार करावा अन्यथा राष्ट्रीय लोकतांत्रिक पार्टीला एनडीएतून बाहेर पडण्याचा विचार करावा लागेल, असा स्पष्ट इशारा पार्टीचे खासदार हनुमान बेनिवाल यांनी दिला आहे. बेनिवाल यांनी यासंदर्भात पेंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहिले आहे. स्वामीनाथन आयोगाच्या पूर्ण शिफारशी लागू कराव्यात अशी मागणीही त्यांनी केली आहे.
मोदींचा ‘काशी’तून समजूत काढण्याचा प्रयत्न
दिल्लीच्या वेशीवर शेतकरी आंदोलन पेटलेले असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ‘काशी’ येथून त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. सव्वीस मिनिटे ते फक्त कृषी कायद्यावरच बोलले. मोदी म्हणाले, कृषी कायद्याबद्दल अफवा पसरवल्या जात आहेत. ज्यांनी आतापर्यंत शेतकऱयांचा छळ केला ते आता शेतकऱयांच्या मनात संभ्रम निर्माण करीत आहेत.
शेतकरी कायद्याआड अब्जाधीश मित्रांचा फायदा
नाव शेतकरी कायदा, मात्र फायदा अब्जाधीश मित्रांचा, असे म्हणत काँग्रेस महासचिव प्रियंका गांधी यांनी मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. सरकारला शेतकऱयांचे म्हणणे ऐकावेच लागेल असे म्हणत प्रियंका गांधी यांनी दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दर्शविला आहे.
सौजन्य- सामना