केंद्र सरकारने पारित केलेले तीन नवे कृषी कायदे शेतकऱ्यांच्या विरोधात असल्याने शेतकऱ्यांनी दिल्लीच्या सीमेवर ठाण मांडले आहे. शेतकरी आंदोलक आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. विविध राजकीय पक्षांनी या आंदोलनास पाठिंबा दिला आहे. त्यासोबतच 8 डिसेंबर रोजी होणाऱ्या ‘हिंदुस्थान बंद’ला पाठिंबा देत काँग्रेस कार्यकर्त्यांनी देखील आंदोलन यशस्वी करावे असे आवाहन सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी केले आहे.
केंद्र सरकारने पारित केलेले तीन नवे कृषी कायदे शेतकऱ्यांच्या विरोधात असून, हे कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या आंदोलनाला संपूर्ण देशाचा पाठिंबा आहे. शेतकऱ्यांच्या मागणीसंदर्भात केंद्र सरकारने झोपेचे सोंग घेतले असून, त्यांना जागे करण्यासाठी 8 डिसेंबरचा ‘हिंदुस्थान बंद’ महत्वाचा आहे. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी नागरिकांच्या सहकार्याने हे आंदोलन यशस्वी करून शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करण्यासंदर्भात केंद्रावरील दबाव वाढवावा, ही विनंती आहे, असे आवाहन अशोक चव्हाण यांनी केले आहे.
सौजन्य- सामना