शेतकऱयांच्या आंदोलनाबाबत पसरवण्यात येत असलेल्या अफवांचे शेतकरी संघटनांच्या नेत्यांनी रविवारी खंडन केले. आम्ही प्रजासत्ताक दिनी ट्रक्टर रॅली काढणारच. यासाठी हजारो ट्रक्टर तयार केले जात आहेत. सर्व ट्रक्टरवर तिरंगा फडकवला जाईल, असा निर्धार शेतकरी नेते योगेंद्र यादव यांनी व्यक्त केला. या आंदोलनाचा राजपथावरील संचलन सोहळ्यात मात्र कुठलाही अडथळा आणणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
शेतकरी आंदोलनात सक्रीय सहभाग घेतलेल्या स्वराज्य इंडियाचे योगेंद्र यादव यांनी पत्रकार परिषदेत ही भूमिका मांडली. दिल्लीच्या आऊटर रिंग रोडवरून ट्रक्टर रॅली काढली जाईल. रॅलीत कुठल्याही राजकीय पक्षाचा झेंडा झळकवला जाणार नाही, असे ते म्हणाले. यावेळी क्रांतिकारी किसान युनियनचे प्रमुख दर्शन पाल सिंह यांनी केंद्र सरकारकडून आंदोलकांची छळवणूक केली जात असल्याचा आरोप केला.
जे शेतकरी आंदोलनात सहभागी झाले आहेत आणि जे लोक आंदोलनाला पाठिंबा देत आहेत, अशा लोकांवर राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) गुन्हा दाखल करीत आहे. या छळवणुकीचा सर्व शेतकरी संघटना निषेध करीत आहेत. आम्ही शक्य त्या सर्व मार्गांनी याविरोधात लढा देऊ, अशी सडेतोड भूमिका सिंह यांनी मांडली.
सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी
शेतकऱयांनी याआधीच 26 जानेवारीला राजधानी दिल्लीत ट्रक्टर रॅली काढणार असल्याचा इशारा दिला आहे. याबाबत सोमवारी सर्वोच्च न्यायालय काय निर्णय देतेय, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आंदोलक शेतकऱयांना दिल्लीत प्रवेश करण्यापासून रोखण्याबाबत आदेश द्या, अशी विनंती केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाला केली आहे.
रामलीला मैदानासाठी पोलिसांना पत्र
जाचक कृषी कायद्यांविरोधात मागील 50 दिवसांपासून शेतकऱयांचे आंदोलन सुरू आहे. आपल्या मागण्यांसाठी विविध शेतकरी संघटना आक्रमक झाल्या आहेत. येत्या 19 जानेवारीला शेतकरी संघटनांची सरकारसोबत पुन्हा बैठक होणार आहे. याचदरम्यान भारतीय किसान युनियनने (लोकशक्ती) रामलीला मैदानावर आंदोलन करण्यासाठी दिल्ली पोलिसांकडे एका पत्राद्वारे परवानगी मागितली आहे.
सौजन्य : दैनिक सामना