कृषी कायद्याविरोधात मागील अडीच महिन्यांपासून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. अशातच आज शेतकरी संघटनांकडून देशभरात चक्का जामची घोषणा करण्यात आली आहे. या चक्का जामला देशभरातून चांगला प्रतिसाद मिळाला.
आज तीन तासांच्या या चक्का जामनंतर संयुक्त किसान मोर्च्याचे प्रवक्ते राकेश टिकैत म्हणाले की, ‘केंद्र सरकारने नवीन कृषी कायदे मागे घ्यावेत आणि हमी भावाचा कायदा (एमएसपी) करावा. असे न केल्यास आम्ही आंदोलन सुरूच ठेवू. आम्ही संपूर्ण देशभर प्रवास करू आणि देशभर आंदोलन केले जाईल.’
टिकैत म्हणाले, ‘आम्ही कायदे रद्द करण्यासाठी केंद्र सरकारला 2 ऑक्टोबरपर्यंत मुदत दिली आहे. यानंतर आम्ही पुढील नियोजन करू. सरकारच्या दबावाखाली आम्ही यावर चर्चा करणार नाही.
सरकार शेतकऱ्यांना नोटीस पाठवून धमकावत असल्याचा आरोप टिकैत यांनी केला आहे. मात्र आम्ही शेतकरी घाबरणार नाही. शेतकऱ्यांच्या जमीनींवर जवानांचा पहारा आहे. यामुळे व्यापारी आमच्या जमीनींवर डोळा ठेवू शकत नाही. सरकारने चर्चेसाठी बोलावल्यास आम्ही तयार आहोत, असे टिकैत म्हणाले आहेत.