कोरोना काळातील लॉकडाऊनमुळे जगभरात वर्क फ्रॉम होमला चांगलीच चालना मिळाली असून हिंदुस्थानातही ही पद्धत प्रचलित झाली आहे. त्यामुळे केंद्र सरकारने वर्क फ्रॉम होमबाबतचा ड्राफ्ट तयार केला असून त्यावर लवकरच मोठा निर्णय घेणार आहे. त्यामुळे कर्मचाऱयांना वर्क फ्रॉम होमचा पर्याय निवडता येणार आहे.
केंद्र सरकारने वर्क फ्रॉम होमबाबत तयार केलेल्या कायद्याच्या ड्राफ्टमध्ये खाणकाम, उत्पादन आणि सेवा क्षेत्रातील कर्मचाऱयांना समाविष्ट करण्यात येणार आहे. तसेच या ड्राफ्टमुळे आयटी सेक्टरला अनेक सवलती मिळू शकणार आहेत.
कर्मचाऱयांचे कामाचे तास आणि त्यांच्या संरक्षणासाठीचासुद्धा यामध्ये समावेश करण्यात आल्याचे वृत्त एका वृत्तवाहिनेने दिले आहे. त्याचबरोबर सर्व श्रमिकांसाठी रेल्वे प्रवासाच्या सुविधेचाही समावेश करण्यात आला आहे. याआधी रेल्वे प्रवासाची सुविधा केवळ खाण क्षेत्रातील श्रमिकांपुरती मर्यादित होती. दरम्यान, एखाद्या अस्थापनेने नियमाचे उल्लंघन केल्यास शिक्षेची तरतूद यामध्ये करण्यात आली आहे.
नव्या ड्राफ्टबाबत मागवल्या सामान्यांकडून सूचना
केंद्र सरकारच्या कामगार मंत्रालयाने नव्या ड्राफ्टबाबत सामान्य नागरिकांकडून त्यांच्या सूचना मागवल्या आहेत. तसेच याबाबत काही सल्ले असल्यास ते 30 दिवसांच्या आत कामगार मंत्रालयाकडे पाठवू शकता असेही स्पष्ट केले आहे.
सौजन्य- सामना