नेहरूंच्या चिरतारुण्याचे रहस्य मुख्यत्वे त्यांच्या रसिकतेत आहे. ही रसिकता सौंदर्याच्या एखाद्या क्षेत्रापुरती मर्यादित नव्हती. रंग, रूप, गंध, स्पर्श, स्वाद, ध्वनी, शब्द, विचार, भावना, अशा विविध प्रकारच्या सौंदर्यांचा आस्वाद घेण्याची उत्कट आसक्ती नेहरूंमध्ये होती. या आसक्तीमध्ये विषयलंपटता नव्हती. खरोखरची रसिकता होती. वडिलार्जित संपत्तीतून सर्व प्रकारचे सुख सुलभपणे नेहरूंना उपभोगता आले असते; पण देशासाठी अन् जनतेसाठी अशा सुखासीनतेचा त्यांनी स्वेच्छेने त्याग केला… मनोविकास प्रकाशित ‘शोध : नेहरू-गांधी पर्वाचा’ या ग्रंथातील पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या व्यक्तिमत्त्वाचे आगळे पैलू उलगडणारा अंश…
—-
सामान्य बुद्धिमत्ता, भूतकाळात डोकावताना भविष्याचा वेध घेण्याची कल्पकता, तरल मनातली सप्तरंगी स्वप्ने वास्तवात आणण्याची पराकाष्ठा, अशा विविध गुणांचा समुच्चय एकाच व्यक्तिमत्त्वात असावा, हा दैवदुर्लभ योगच म्हणावा लागेल. भारताच्या पाच हजार वर्षांच्या समृद्ध इतिहासात फारच थोड्या व्यक्ती अशा आढळतात की, मानवी ऊर्जेच्या विलोभनीय छटा त्या एकाच व्यक्तीमध्ये सामावलेल्या आहेत. भारताच्या स्वातंत्र्यासाठी ९ वर्षांचा तुरुंगवास भोगणार्या पंडित जवाहरलाल नेहरूंनी स्वातंत्र्योत्तर काळात सलग १७ वर्षे भारताचे पंतप्रधानपद भूषवले. ७५ वर्षांच्या आयुष्यात कधी अपरिमित दु:खाचे कढ सोसले, तर कधी आनंदाचे गुलाबपाणी शिंपडणारे अनेक प्रसंगही नेहरूंनी अनुभवले. सभोवती जयजयकाराचा जल्लोश अन् टाळ्यांच्या कडकडाट सुरू असताना, लक्षावधी लोकांना सुहास्य वदनाने नेहरू सामोरे गेले. विनम्रतेने त्यांना अभिवादन केले. निसर्गाच्या सान्निध्यात हरखून जाताना त्याच्या उदात्त भव्यतेत स्वत:ला त्यांनी विलीन केले. साहित्यनिर्मितीसाठी अतिशय प्रतिकूल अशा तुरुंग कोठड्यांमध्ये नेहरूंनी अलौकिक ग्रंथसंपदा निर्माण केली. जागतिक इतिहासातल्या महत्त्वाच्या घटनांची वर्तमानाशी सांगड घातली. अलिप्त राष्ट्रांमध्ये विश्वबंधुत्व प्रस्थापित करण्याचा विलक्षण आवाका त्यांनी दाखवला. नेहरूंच्या मनात अपरंपार करुणा होती. आजारी कुत्र्याच्या शुश्रूषेसाठी तुरुंगवासातही ते मध्यरात्री उठायचे. धार्मिक दंगलीत लूटालूट, अत्याचार करणार्या समाजकंटकांना थोपवताना, त्यांच्या हातांतली शस्त्रे हिसकावून घेण्याचे धाडसही ते दाखवायचे. फॅसिझम आणि नाझिझम यांविषयी त्यांच्या मनात तिटकारा होता. हिटलर आणि मुसोलिनींची भेट म्हणूनच नेहरूंनी कटाक्षाने टाळली होती. राजकीय नेत्यांमध्ये अभावानेच आढळतात अशा कितीतरी गोष्टी पंडित नेहरूंच्या व्यक्तिमत्त्वात होत्या. नेहरूंचे प्रशंसक म्हणतात, विसाव्या शतकातले ते महामानव होते; पण मखरात बसवून देवत्व बहाल करण्याचा हा प्रयोग, खुद्द पंडितजींनाही आवडला नसता. ते प्रतिभावंत भारतीय होते. भगवान बुद्ध, महात्मा गांधी आणि आल्बर्ट आइन्स्टाइन यांच्यासारख्या महान वैज्ञानिकांचे अलौकिक मिश्रण त्यांच्या स्वभावात होते. आयुष्यात सामोर्या आलेल्या प्राणघातक संकटांच्या प्रसंगी नेहरूंनी दाखवलेला धीरोदात्तपणा, मनाच्या दुबळेपणावर पांघरूण घालताना त्यांनी व्यक्त केलेला संताप, दिलखुलास अन् मिष्कील पद्धतीने बहुतांश प्रसंगी त्यांनी साधलेला संवाद, अशा बहुरंगी छटा त्यांच्या स्वभावात होत्या. नेहरूंच्या व्यक्तिमत्त्वातले दोष जर टेकडीएवढे असतील, तर गुणवत्तेची बेरीज एव्हेरस्टपेक्षा अधिक उत्तुंग होती.
जीवनशैलीतला साधेपणा स्वातंत्र्य चळवळीच्या काळापासूनच त्यांच्या जीवनक्रमाचा अविभाज्य भाग बनला. पंतप्रधान झाल्यावर दौर्यावर निघताना एक बॅग, एक छोटी ब्रीफकेस आणि व्यक्तिगत मदतीसाठी एखादा नोकर, इतकेच त्यांच्यासोबत असे. चपराशी, आचारी अथवा वाढपी अशा कोणालाही ते बरोबर नेत नसत. दौर्यातले सारे त्रास अत्यंत सहजतेने स्वीकारायची त्यांना सवय होती. दुपारचे तपमान ४७ अंश सेल्सियस असले, तरी नेहमीच्या दिनक्रमाप्रमाणे ते लोकांना भेटायचे. कामांची पाहणी करायचे. धुळीच्या त्रासाने त्यांचा घसा धरायचा म्हणून सहसा ते धूळ टाळायचे. त्यांची न्याहारीदेखील मर्यादित असे. उत्तम बनवलेला पाव, लोणी, अंडे, गरम कॉफी आणि मार्मालेड इतके असले, की त्यांना ते पुरेसे असायचे. नेहरूंना अगदी साधे अन्न आवडायचे. ते गरम असावे आणि झटपट वाढले जावे, इतकाच त्यांचा आग्रह असे. तेलकट, तुपकट आणि मसालेदार पदार्थ त्यांना रुचत नसत. परदेशी पाहुणे आले की, राष्ट्रपती भवनात मेजवान्या झडायच्या. तेलकट, तुपकट पदार्थांची त्यात भरमार असायची. अशा औपचारिक मेजवान्यांचा त्यांना कंटाळा यायचा. ‘तुमच्यातल्या अफाट ऊर्जेचे रहस्य काय? हा प्रश्न अनेकांनी त्यांना विचारला. तेव्हा, ‘मी जास्त खात नाही त्यामुळे माझी पचनशक्ती चांगली आहे. खूप दमलो की झोपायला जातो. मला छान झोप लागते’ असे ते म्हणायचे. स्वत:च्या प्रकृतीविषयी नेहरू विशेष काळजी घ्यायचे. तुरुंगात आणि तुरुंगाबाहेर ते नियमित व्यायाम करायचे. घोड्यावर बसून रपेट मारणे, पोहणे त्यांना आवडायचे. क्रिकेटवरही नेहरूंचे विलक्षण प्रेम होते. १९५१ साली वयाच्या ६२ व्या वर्षी एका महोत्सवी सामन्यात, पायाला पॅड बांधून ते मैदानात उतरले. त्या वयात फलंदाजी करताना त्यांचे चापल्य पाहून सगळेच थक्क झाले. भारत विरुद्ध इंग्लंड क्रिकेट सामना पाहण्यासाठी एकदा (प्रकृती बरी नसतानाही) दिल्लीत अनेक तास ते स्टेडियममध्ये बसून होते. त्यांच्यासारखे वेगाने चालत बोलणे अनेक सहकार्यांना जमत नसे. वयाच्या ६७व्या वर्षापर्यंत, त्यांची तब्येत धडधाकट होती. दौर्यात, प्रवासात जे अधिकारी आणि कर्मचारी त्यांच्यासोबत असायचे, त्या सर्वांच्या भोजनाची आणि सोयींची पुरेपूर काळजी पंडित नेहरू आणि इंदिरा दोघेही घेत असत. सर्वांना अन्न पुरले पाहिजे यासाठी अनेकदा ते कमी जेवायचे. कोणतीही गोष्ट वाया घालवणे त्यांना आवडत नसे; मग ते अन्न असो की पाणी. जेवताना उष्टे टाकणार्यांचा त्यांना खूप राग यायचा. वाटेत एखादा वाहता नळ दिसला तर ते गाडी थांबवायचे. कोणाला तरी तो बंद करायला पाठवायचे. अथवा स्वत:च धावत जायचे.
नेहरूंच्या चिरतारुण्याचे रहस्य मुख्यत्वे त्यांच्या रसिकतेत आहे. ही रसिकता सौंदर्याच्या एखाद्या क्षेत्रापुरती मर्यादित नव्हती. रंग, रूप, गंध, स्पर्श, स्वाद, ध्वनी, शब्द, विचार, भावना, अशा विविध प्रकारच्या सौंदर्यांचा आस्वाद घेण्याची उत्कट आसक्ती नेहरूंमध्ये होती. या आसक्तीमध्ये विषयलंपटता नव्हती. खरोखरची रसिकता होती. वडिलार्जित संपत्तीतून सर्व प्रकारचे सुख सुलभपणे नेहरूंना उपभोगता आले असते; पण देशासाठी अन् जनतेसाठी अशा सुखासीनतेचा त्यांनी स्वेच्छेने त्याग केला. नेहरूंचा पोशाख साधाच असे. चुडीदार सुरवार, शक्यतो सफेद अथवा फिक्या रंगाची शेरवानी, डोक्यावर पांढरी स्वच्छ गांधी टोपी, बटन होलमध्ये लावलेला लाल गुलाब आणि पायांत काळे सँडल्स अथवा चपला, हा त्यांचा नेहमीचा पोशाख होता. मुळात देखणे आणि सडसडीत बांध्याचे नेहरू, अशा पेहरावात स्वच्छ आणि प्रसन्न दिसायचे. टोपीमुळे डोक्यावरचे टक्कल झाकले जायचे. डोक्यावर टोपी नसती आणि शेरवानीऐवजी त्यांनी शर्ट घातला असता, तर भारतात अनेक लोकांनी त्यांना ओळखलेच नसते. एका दौर्यात नेहरूंचा नोकर हरी त्यांच्या फाटक्या मोज्यांना रफू करताना दिसला. त्यांच्या काटकसरीचा हा छोटासा पुरावा. सँडल्स अथवा बुटांचा एकच जोड अनेक वर्षे ते वापरायचे. दैनंदिन जीवनात इतक्या गैरसोयी सहन करणारा, क्वचितच एखादा राष्ट्रप्रमुख असावा. सिगरेट ओढायची नेहरूंना सवय होती. स्टेट एक्सप्रेस ५५५ ही त्या काळची प्रसिद्ध सिगरेट त्यांना पसंत होती. धूम्रपानाचे त्यांचे प्रमाण काही वर्षे अधिक होते. दिवसाकाठी ते २० पर्यंत सिगारेट्स ओढायचे. कालांतराने हे धुम्रपान त्यांनी पाच सिगारेट्सपर्यंत खाली आणले. दारूचा मात्र नेहरूंना तिटकारा होता. खासगीत अथवा मेजवान्यांमध्ये कधीही त्यांनी मद्यप्राशन केले नाही.
राजकारणाच्या धकाधकीत थोडीशी उसंत अथवा संधी मिळाली तरी त्यांच्या अंत:करणातली रसिकता उंचबळून येत असे. ते काश्मीरला जायचे तेव्हा तिथल्या अलौकिक निसर्गसौंदर्याने त्यांचे भान हरपत असे. बर्फाच्छादित गिरिशिखरे, हिरव्यागार दर्या, उंच चिनार वृक्ष, खळाळत वाहणार्या नद्या यांची वर्णने नेहरूंनी आपल्या लेखनात केली आहेत, ललित वाङ्मयातले ते अप्रतिम काव्यच आहे. युरोपमध्ये आल्प्स आणि भारतातल्या हिमालय पर्वताच्या उतरंडीवर बर्फातून घसरत नेणार्या खेळांचा नेहरूंना शौक होता. एक-दोनदा हा खेळ त्यांच्या जिवावरही बेतला होता. साहसी वृत्तीच्या नेहरूंना मात्र त्याची कधीच फिकीर वाटली नाही. दीर्घ पल्ल्याचे प्रवास रस्तामार्गे करायला नेहरूंना आवडायचे. लाखो मैलांचा प्रवास मोटरकार अथवा जीपनेच त्यांनी केला. अनेक इंग्रजी आणि उर्दू कविता नेहरूंना तोंडपाठ होत्या. प्रवासात काही कविता ते आनंदाने गुणगुणायचे. संगीताचेही ते शौकीन होते. एकदा एका मित्राने त्यांना विचारले, ‘राजकारणाच्या गडबडीत अनेक वर्षांत तुला सतार ऐकायला मिळालीच नसेल, नाही का?’ त्याचा प्रश्न ऐकताना नेहरूंनाही त्याची जाणीव झाली. प्रवासात एखाद्या आवडत्या पुस्तकाविषयी नेहरू बोलायचे. लेखक, साहित्यिकांच्या आठवणी सांगायचे. नेहरूंनी प्रवास केलेल्या देशांची यादी तशी बरीच मोठी होती. तरी एकदा ते म्हणाले, ‘मी फारसे जग पाहिलेले नाही.’ त्या तुलनेत जगभर फिरलेली व्यक्ती म्हणजे लेडी माउंटबॅटन. बर्याच ठिकाणी त्या गेल्या. काही प्रवास तर अगदी धाडसी पद्धतीने त्यांनी केले, असे प्रवासात इंदिरेला ते सांगायचे. डोंगराळ भागांत रस्त्याने जाताना, वाटेत उंच वृक्षराजी, बहरलेल्या पानाफुलांचा निसर्ग आणि कष्टाचे आयुष्य शांततेत व्यतीत करणारे ग्रामीण स्त्री-पुरुष पाहिले की त्यांचे मन प्रसन्न व्हायचे. मग मध्येच त्यांना वृत्तपत्रे आठवायची. इंदिरेशी बोलताना ते म्हणायचे, ‘जगाचे किती विचित्र रूप वृत्तपत्रे रेखाटतात. त्यातली बहुतांश माहिती कटकटी, खून आणि विध्वंसाचीच असते. वाचताना धडकीच भरते. ग्रामीण भागांत लाखो स्त्री-पुरुष कसे शांततेत जीवन जगत असतात. ही वृत्तपत्रे त्यांच्याविषयी कधीच का काही लिहीत नाहीत?’ प्रवासात कधी खास शैलीतले विनोदही नेहरू सहकारी अधिकार्यांना ऐकवायचे. नेहरूंच्या स्वागतासाठी मद्रासच्या मीनम्बक्कम विमानतळावर, राज्यपाल श्रीप्रकाश समोरून येताना दिसले. ऑर्डर्लीने त्यांच्या डोक्यावर पांढरी छत्री धरली होती. विमानातून खाली उतरताना त्याच्याकडे पाहत मिष्कीलपणे नेहरू म्हणाले, ‘हे श्रीप्रकाश रात्रीच्या चांदण्यात जरी फिरायला गेले, तरी त्यांच्या डोक्यावर ही छत्री हमखास असेल.’ लोकांच्या मनातले विचार चटकन समजावून घेण्याची अफाट शक्ती नेहरूंमध्ये होती. आपल्या वागण्यामुळे अथवा बोलण्यातून समजा कोणी दुखावले, तर त्यावर लगेच फुंकर घालून ते त्यांना आपलेसे करायचे. चारचौघांसमोर सामान्य माणसाशी चांगले वागले तर त्याला जिंकता येते, याची हातोटी त्यांच्यापाशी होती. नवे मित्र जोडण्यासाठी, शत्रूंना जिंकण्यासाठी या वृत्तीचा अतिशय कौशल्याने ते वापर करायचे.
व्यंगचित्रकार शंकर (केशव शंकर पिल्ले) आणि पंडित नेहरू यांच्यात अतिशय सौहार्दाचे नाते होते. दोघांची पहिली भेट १९३९ साली जिनिव्हाला झाली. दोघांच्या मैत्रीचा प्रारंभही तिथेच झाला. एकमेकांना दोघे असंख्य वेळा भेटले होते. मुंबईच्या ‘फ्री प्रेस जर्नल’मध्ये शंकर यांची काही व्यंगचित्रे प्रसिद्ध झाली. त्यानंतर ‘हिंदुस्तान टाइम्स’मध्ये पूर्णवेळ व्यंगचित्रकार म्हणून शंकर दिल्लीला आले. भारतात राजकीय व्यंगचित्र कलेचे महापर्व तेव्हापासूनच सुरू झाले. शंकर भारतातल्या राजकीय व्यंगचित्रांचे पितामह मानले जातात. सुरुवातीच्या काळात गांधीजींपासून माउंटबॅटनपर्यंत सर्वांची व्यंगचित्रे शंकर यांनी काढली. त्यांच्यावर मनसोक्त टीकाटिप्पणीही केली. नेहरू आणि शंकर या दोघांना परस्परांच्या कामाविषयी नितांत आदर होता. दोघांमधला एक महत्त्वाचा गुण म्हणजे स्वत:वर केलेल्या विनोदावर दोघेही खळखळून हसायचे. एकमेकांना दाद द्यायचे. मुख्य म्हणजे आपला सुसंस्कृतपणा आणि मर्यादा, दोघांनी कधीच ओलांडल्या नाहीत. ‘शंकर्स वीक्लि’ हे व्यंगचित्रांना वाहिलेले पहिले साप्ताहिक २३ मे १९४८ रोजी शंकर यांनी सुरू केले. त्याच्या उद्घाटनाला स्वत: पंडित नेहरू उपस्थित होते. त्या सोहळ्यात शंकर यांना नेहरू म्हणाले, ‘डोन्ट स्पेअर मी, शंकर. अजिबात न घाबरता, माझ्यावर हवी तेवढी व्यंगचित्रे खुशाल काढ.’ पुढची अनेक वर्षे शंकर नेहरूंवर व्यंगचित्रे काढत राहिले. या कालखंडातल्या काही निवडक व्यंगचित्रांचा ४०० पानी संग्रह, ‘चिल्ड्रन्स बुक ट्रस्ट’ने कालांतराने प्रकाशित केला. त्या संग्रहाचे नाव आहे ‘डोन्ट स्पेअर मी, शंकर.’ पुस्तकाच्या प्रस्तावनेत, नेहरू कसे आहेत, याविषयी शंकर यांनी आपल्या भावना मनापासून शब्दबद्ध केल्या आहेत. शंकर म्हणतात, ‘पंडित नेहरूंच्या स्वभावात एक निरागस लहान मूल दडलेले असे. लहान मुलाला जसे सर्व गोष्टींविषयी कुतूहल वाटते, लहानसहान गोष्टींबद्दल आश्चर्य वाटते, त्यात जो ताजेपणा असतो, तसेच सारे निरागस गुण नेहरूंच्या व्यक्तिमत्त्वात आहेत. बंदुका, विमान, वगैरे त्यांना खेळणी वाटतात. भल्यामोठ्या कारखान्यांचे प्रकल्प म्हणजे एखादे चित्रमय कोडे आहे, असे नेहरूंना वाटते. गर्दी बघितली की त्यांना उत्साह येतो. मोठी चित्रप्रदर्शने त्यांच्या दृष्टीने वंडरलँड आहेत. प्रवास म्हणजे एक शोध आणि आपले सहकारी म्हणजे त्यातले खेळाडू आहेत, असे त्यांना वाटते. लोकांचे नेतृत्व करताना ते एखाद्या सेनानायकासारखे असतात. आयुष्यात अनेक भल्याबुर्या प्रसंगांना त्यांनी तोंड दिले. त्यानंतरही ते कधी ‘सिनिक’ झाले नाहीत. नेहरू भारताचेच नव्हे, तर सार्या आशिया खंडाचे नेते आहेत. सार्या जगातले ते एक महान मुत्सद्दी आहेत.’
नेहरूंसारखा स्वच्छ विचार करणारी माणसे जगात दुर्मिळच होती. मनात सुचलेला विचार मोकळेपणाने ते लोकांना सांगायचे. जाहीर सभेतले त्यांचे भाषणदेखील मोठ्याने म्हटलेल्या स्वगतासारखेच असे. त्यांच्या विचारांमध्ये कुठेही कोणाची टिंगल उडवणारा छद्मीपणा अथवा फसवणूक नसे. आपल्या बोलण्यातून सहसा ते कोणाला दुखवत नसत. सभोवतालचे जग सुधारावे अशी त्यांची इच्छा होती. अधिक चांगले जगण्यासाठी ते सुरक्षित असले पाहिजे, असे त्यांना वाटे. जगभरातले बरेचसे राज्यकर्ते स्वत:ला सतत असुरक्षित मानायचे. कारस्थाने करून आपल्या सहकार्यांना नमवायचे, त्यांना जरबेत ठेवण्यासाठी विविध क्लृप्त्या योजायचे, शस्त्रबळावर दहशत पसरवायचे. नवा मार्ग स्वीकारण्याचे धाडस त्यांच्यात नसायचे. विरोधकांना तुरुंगात टाकून, हरतर्हेने बेजार करून, आपले राज्यशकट ते कसेबसे चालवायचे. त्या तुलनेत नेहरूंचे अंत:करण खूपच खुले होते. सामान्यजनांविषयी त्यांच्या मनात सहानुभूती अन् करुणा होती. मुक्त लोकशाहीसाठी समानतेच्या तत्त्वानुसार जी प्रगती आवश्यक आहे, तिच्याविषयी नि:संकोचपणे ते बोलायचे. ‘इतिहासाच्या अडगळीत कधीतरी माझाही समावेश होणारच आहे. तेव्हा, जोपर्यंत अंगात ऊर्जा आहे, देशाच्या प्रगतीसाठी त्या ऊर्जेतला प्रत्येक कण मला वेचायचा आहे’ असे ते म्हणायचे.
जगातल्या सर्व धर्मांविषयी नेहरूंना आदर होता. अंधश्रद्धेचा मात्र त्यांना तिटकारा होता. कोणत्याही जुनाट धार्मिक रूढींचे नेहरूंनी कधीही पालन केले नाही. धार्मिक उपवास करणे, भविष्य समजावून घेण्यासाठी ज्योतिषांचे सल्ले घेणे, कधीही त्यांना आवडले नाही. एके काळी नेहरू गळ्यात जानवे घालायचे. एकदा त्यांना वाटले की, लोकांच्या डोळ्यांत धूळफेक करणारी ही परंपरा आपण कशासाठी पाळायची? मग गळ्यात जानवे घालणे त्यांनी सोडून दिले. लोकांमध्ये मानसिक अंतर निर्माण करणार्या संकटांचे खरे कारण कालबाह्य रूढी आणि परंपराच आहेत, अशी त्यांची धारणा होती. भेटायला येणार्या लाखो लोकांना ते ‘प्रणाम’ म्हणायचे.
भूतकाळ आणि वर्तमानकाळाला जोडणारे सम्यक ज्ञान नेहरूंच्या व्यक्तिमत्त्वात होते. अफाट बुद्धिमत्ता असलेले ते व्यासंगी होते. कोणत्याही गोष्टीतले मर्म त्यांना चटकन समजत असे. कोणत्याही चर्चेत अवघ्या काही मििनटांत मूळ प्रश्नाच्या गाभ्याला त्यांनी हात घातलेला असे. सोप्या पद्धतीने सरळ विचार मांडण्याची, वस्तुस्थितीला धैर्याने तोंड देण्याची सवय त्यांनी मनाला लावून घेतली होती. त्यांच्या मनात कधीही कपट, फसवणूक अथवा खोडसाळपणा नव्हता. भारतीय संस्कृतीची ओळख म्हणून सांगितली जाणारी (सध्याच्या चर्चेत असलेली) हिंदू राष्ट्राची संकुचित संकल्पना, त्यांना कधीच मान्य नव्हती. नेहरूंच्या व्यक्तिमत्त्वात शुद्ध आणि उत्तम स्वरूपात आढळणारी अभिव्यक्ती हीच खरी भारतीय संस्कृती होती. सुखासीनतेपासून अनेक योजने ती दूर होती. त्यात संवेदनशीलता अन् करुणा होती. सर्वसामान्यांना त्यातली भावना सहज समजायची. एकदा
डॉ. राधाकृष्णन म्हणाले, ‘हिंदुत्वाच्या खर्या आदर्शांनुसार, माणसाचे मन स्वतंत्र आणि निर्भय असते. कोणताही पराभव अथवा अडथळा त्याला विचलित करू शकत नाही. त्यात परतफेडीची अपेक्षा नसते. ते भरभरून उधळलेले प्रेम असते.’ त्यांच्या या व्याख्येचा विचार केला, तर सहिष्णुता, अनुकंपा, मानवतेवर श्रद्धा, असे सर्व सद्गुण नेहरूंच्या व्यक्तिमत्त्वात सामावलेले होते.
बुद्धिनिष्ठ पद्धतीने केलेला विरोध पंडित नेहरूंना आवडायचा. अशा विरोधाच्या परिणामकारकतेवरही त्यांचा दृढविश्वास होता. संसदीय कामकाजात दीर्घकाळ ते उपस्थित राहायचे. विरोधी नेत्यांचे विचार काळजीपूर्वक ऐकायचे. त्यांतले मुद्दे वैचारिकदृष्ट्या पटोत ना पटोत, विरोधी वत्तäयांची मुक्तकंठाने तारीफ करण्याचा उमदेपणाही त्यांच्या स्वभावात होता. विरोधकांकडून होणारी टीकाही मग ते स्थितप्रज्ञतेने आणि शांतपणे सहन करत; पण काही लोक मूर्खासारखा विरोध करायचे, ते त्यांना आवडत नसे. त्यांचा विरोध खपतही नसे. संसदेत हिंदू महासभेचे एक सदस्य बोलायला उभे राहिले की, नेहरूंचा चेहरा दुर्मुखलेला असे. गुंतागुंतीच्या प्रश्नांवर मार्गदर्शन करायला त्यांना आवडायचे. लोकसभेत काही प्रसंगी ते मध्येच उठून बोलायचे. अडचणीत सापडलेल्या सहकारी मंत्र्याच्या प्रश्नांची उत्तरे ते स्वत: द्यायचे. कारण अशावेळी त्यांना चैन पडत नसे.
लहान मुलांच्या आकर्षणाचा नेहरू केंद्रबिंदू होते. त्यांच्या लोकप्रियतेचा हा विशेष पैलू होता. पंतप्रधानांना ‘चाचा नेहरू’ संबोधले जायचे. सध्या साठीच्या पलीकडे ज्यांची वये आहेत, त्यांना हे नक्कीच आठवत असेल. लहान मुलांशी खेळायला नेहरूंना खूप आवडत असावे, असा समज त्याकाळी लोकांच्या मनावर बिंबला होता. उघड्या जीपमधून लोकांचे अभिवादन स्वीकारीत, नेहरू सभास्थानाकडे जायचे. वाटेत ६ ते १२ वर्षे वयाच्या, एखाद्या गोबर्या गालाच्या मुलाची अथवा टपोर्या डोळ्यांच्या चुणचुणीत मुलीची ते निवड करायचे. हातातली फुलांची माळ त्याच्या/तिच्या गळ्यात घालायचे. कधी अचानक जमावात शिरायचे. एखादी छोटी लाजाळू मुलगी कडेवर उचलून आणायचे. नियतीवर असलेली आपली श्रद्धा या मुलांपर्यंत पोहोचली पाहिजे. उद्याचे नेते अशा संस्कारातूनच तयार होतील, असा विचार त्यावेळी त्यांच्या मनात असायचा.
घोड्यावर बसून रपेट मारायला, तलावात पोहायला, नियमितपणे व्यायाम करायला नेहरूंना आवडायचे. चालता-चालताही ते उत्साहाने बोलायचे. निसर्गाइतकेच मुक्या प्राण्यांवरही नेहरूंचे प्रेम होते. कुत्रे, घोडे, हिमालयातले पांडा, त्यांना आवडायचे. घरात रिट्रायव्हर जातीचे सोनेरी केसांचे कुत्रे आणि घराच्या अंगणात पिंजर्यात ठेवलेले पांडा, यांना ते स्वत: खाऊ घालायचे.
नेहरूंच्या चारित्र्याचे अनेक पैलू आहेत. उपजत धाडसी वृत्ती हा त्यांतला सर्वांत विशेष गुण. मृत्यू समोर दिसत असला, तरी अजिबात विचलित न होता, शांतचित्ताने अशा प्रसंगाला ते सामोरे जायचे. मरण अथवा निंदेला ते कधीही घाबरले नाहीत. प्रसंग धोकादायक असला, तर ते स्वत:च्या कोशात जायचे. आसपास जे कोणी असतील, त्यांना धीरोदात्तपणे मानसिक बळ द्यायचे. ते नेहमी सांगायचे – ‘गांधीजींनी आम्हाला निर्भय बनायला शिकवले. अंत जवळ आलाच असेल, तर त्याला धैर्याने तोंड द्यायला हवे. त्यांच्या शिकवणीचे हेच सार होते.’ नेहरूंच्या धाडसी स्वभावाचा साक्षात्कार घडवणार्या अनेक प्रसंगांच्या नोंदी, त्यांचे मुख्य सुरक्षा अधिकारी के. एफ. रुस्तमजी यांनी आपल्या रोजनिशीत लिहिल्या आहेत.
ऑक्टोबर १९५२ मध्ये पंतप्रधान नेहरू नेफा (नॉर्थ इस्ट फ्रंटियर एजन्सी, म्हणजे सध्याचा अरुणाचल प्रदेश)च्या दौर्यावर होते. इंडो- तिबेट सीमेवरील ‘तवांग’ आणि तेथून पुढे ‘झिरो’ येथे जाण्यासाठी, सलोनी विमानतळावरून ते निघाले. दोन्ही बाजूंच्या उंच पर्वतराजीत विमान शिरले. हा प्रवास धोकादायक आहे, असे तेव्हाच सर्वांना जाणवले होते. उत्तुंग गिरिशिखरांमधल्या दर्याखोर्यांतून वैमानिक मार्ग काढत होता. पर्वतावरचे वृक्ष थेट विमानाला खेटतील, इतक्या जवळ होते. विमान एका बाजूला जरासे झुकले तर भेलकांडतच जाईल, अशी भीती सोबतच्या अधिकार्यांना वाटत होती. हवाईमार्ग दाखवणारे नकाशे अतिशय जुने आणि निरुपयोगी होते. त्या भागाची नीट ओळख असणारे वैमानिकही त्या दिवशी आले नव्हते. विमानातले कर्मचारी नवखे होते. मग सहवैमानिकाच्या जागेवर पंतप्रधान नेहरू स्वत: बसले. खाली ‘तवांग’ कुठे आहे, ते शोधण्याचा प्रयत्न करू लागले. तवांग सापडत नाही असे लक्षात येताच, अर्ध्या तासाच्या अंतरावर असलेल्या झिरोलाच जाण्याचा निर्णय अधिकार्यांनी घेतला. अर्धा तास गेला, एक तास गेला, दीड तासही उलटून गेला, तरी ‘झिरो’ सापडत नव्हते. बहुधा पर्वतराजीत विमान भरकटले असावे. ‘नियतीने मरण तर नशिबात वाढून ठेवले नाही?’ हे समजत नव्हते. एव्हाना उपलब्ध नकाशात नेहरूंनी लक्ष घातले. कन्या इंदिरेशी शांत चित्ताने ते बोलत होते. आपण संकटात सापडलो आहोत, अशा चिंतेचा लवलेशही त्यांच्या चेहर्यावर नव्हता. तब्बल तीन तासांनी विमान ‘झिरो’ला पोहोचले. दुसर्या दिवशी सीमेवरच्या ‘वालोंग’ शहराला भेट देण्याचे नेहरूंनी ठरवले. कालसारखा धोका पुन्हा नको म्हणून सुरक्षा अधिकार्यांनी, शक्यतो ही भेट रद्द करा, असा आग्रह करून पाहिला. नेहरू ऐकायला तयार नव्हते. ‘प्रवास का नको? आज सहज मार्ग सापडेल’ असा धीर देत नेहरू म्हणाले, ‘फार तर आपण तासभर लवकर निघू.’ नेहरूंनी ‘झिरो’ला भेट दिल्यानंतर दोनच दिवसांनी हवाई दलाचे एक विमान तिथे दरीत कोसळल्याची बातमी आली. सर्वांना त्यावेळी जाणवले की, केवळ नशिबानेच नेहरूंचा विमान प्रवास सुखरूप झाला होता.
गुजरातच्या ‘कच्छ’ भागातल्या ‘अंजार’ परिसरात भूकंपामुळे हाहाकार उडाला होता. नेहरू २१ जुलै १९५६ रोजी भूकंपग्रस्त भागाच्या दौर्यावर होते. अंजार, आदिपूर या गावांना भेट दिल्यानंतर कांडला बंदराच्या दिशेने नेहरूंना जायचे होते. भरगच्च कार्यक्रमांमुळे अगोदरच उशीर झाला होता. रतनाल खेडे गेल्यावर एका जीपमध्ये नेहरू बसले. ज्या भूकंपग्रस्त गावाला ते भेट देणार होते, ते जवळपास २० मैल आत होते. वेळ वाचवण्यासाठी कच्छचे आयुक्त घाडगे स्वत:च जीप चालवायला बसले. लालबहाद्दूर शास्त्री त्यांच्या बाजूला, त्यांच्या शेजारी नेहरू एका कडेला बसले होते. मागच्या सीटवर सुरक्षा अधिकारी रुस्तमजी आणि त्यांच्याशेजारी स्थानिक खासदार खेमजी होते. खडकाळ पठारावरून जीप धावत होती. नेहरू म्हणाले, ‘इथे रस्ता शोधायला अगदी बारीक नजर हवी.’ ते बोलत असतानाच वाळूच्या निसरड्या रस्त्यावर जीपने वळण घेतले. घसरत गेलेली जीप वाळूच्या एका ढिगार्यावर आपटली. एका कुशीवर वळून वाकडी झाली. पंतप्रधान आणि सुरक्षा अधिकारी ज्या बाजूला बसले होते, त्याच बाजूला जोरात आपटलेली जीप कलंडली होती. जीपखाली दोघेही एकमेकांशेजारी जमिनीवर पडले. काहीशा बधिरावस्थेत लालबहाद्दूर शास्त्री पंतप्रधानांच्या अंगावर, पण थोडे पुढे जाऊन पडले. सुरक्षा अधिकार्यांच्या अंगावर खासदार खेमजी पडले. पाण्याच्या दोन मोठ्या चरव्या, रेनकोट आणि जीपमधील दुरुस्तीची हत्यारे खाली पडल्यामुळे मोठा आवाज झाला. तेवढ्यात एस्कॉर्ट गाडीतले लोक पाठीमागून धावत आले. सुरक्षा अधिकारी जोरात ओरडले, ‘अगोदर अर्धवट कलंडलेली जीप पकडा.’ नेहरू म्हणाले, ‘ओरडू नका. मी व्यवस्थित आहे. मला काही लागलेले नाही.’ जीपखालून सर्वप्रथम नेहरूंना, त्यानंतर इतरांना बाहेर काढले गेले. सुदैवाने मोठी दुखापत कोणाला झाली नाही. नेहरूंच्या आणि शास्त्रींच्या हाताला थोडेफार खरचटले. मग नेहरू रस्त्यावरच्या एका उंचवठ्यावर जाऊन उभे राहिले. थरथरत्या हातांनी त्यांनी एक सिगारेट शिलगावली. हसत हसत ते म्हणाले, ‘कच्छमध्ये भूकंपग्रस्ताना बघायला आलो; पण प्रत्यक्षात एक छोटा भूकंप तर आपणच अनुभवला. लालबहाद्दूर शास्त्रींचे हलके फुलकेवजन अंगावर पडले, त्यामुळे मी नशिबवानच ठरलो.’ नेहरूंसह सर्वांनी कलंडलेली जीप उचलली. चार चाकांवर नीट उभी केली. दुसर्या वाहनाने मग सारे जण पुढच्या प्रवासाला निघाले.
‘असे आणखी काही धोकादायक प्रसंग तुमच्या आयुष्यात आले आहेत?’ सुरक्षा अधिकारी के. एफ. रुस्तमजी यांनी नेहरूंना विचारले. तेव्हा नेहरू म्हणाले, ‘मला ठार मारण्याचा सर्वांत गंभीर प्रयत्न श्रीनगरला १९४६ साली झाला. शहरातल्या अरुंद गल्लीतून उघड्या जीपमधूून मी आणि शेख अब्दुल्ला जात होतो. तेवढ्यात वरच्या खिडकीतून कोणीतरी आमच्या अंगावर काहीतरी फेकले. सुदैवाने जीपच्या मागच्या ते भागात पडले. त्याचा स्फोट झाला. स्फोटाचा धूर इतका भीषण होता की, माझ्या शेजारी बसलेल्या शेख अब्दुल्लांच्या डोळ्यांना इजा झाली. गंभीर दुखापतीमुळे बरेच दिवस त्यांना रुग्णालयात काढावे लागले. नंतर गुप्तहेर खात्याने शोधून काढले की, तो एक गावठी हातबॉम्ब होता.’
मेघदूत हे इल्युशियन विमान, सोव्हिएत रशियाचे पंतप्रधान बुल्गानिन यांनी भारताच्या पंतप्रधानांना भेट दिले होते. त्याच्या पहिल्या कंपार्टमेंटमध्ये फक्त दोनच आसने होती. सहसा पंतप्रधानांसोबतची माणसे त्या जागांवर बसायची. २६ फेब्रुवारी १९५७… त्या दिवशी नेहरूंबरोबर सुरक्षा अधिकारी रुस्तमजी एकटेच होते. ते पहिल्या कंपार्टमेंटमधल्या आसनावर बसले. लवकरच त्यांना झोप लागली. नेहरू मागच्या कंपार्टमेंटमध्ये होते. अचानक कसलासा आवाज झाला. रुस्तमजींना जाग आली. इंजिनाच्या घरघरीचा सूर बदलला होता. बाहेर पोर्ट इंजिनमधून धूर आणि ज्वाळा निघत होत्या. रुस्तमजी कॉकपिटच्या दिशेने धावले. विमानाचे कॅप्टन स्कॉड्रन लीडर रूफस याला म्हणाले, ‘इंजिनाला आग लागली आहे.’ कॅप्टनचा चेहरा चिंताग्रस्त होता. तो म्हणाला, ‘हो, ते आमच्या लक्षात आले आहे. आग विझवायचे मशीन लगेच आम्ही वापरले आहे.’ वॉरंट ऑफिसर पॅडिंग्टन म्हणाले, ‘आग विझली आहे. पोर्ट इंजिन बंद करून ठेवले आहे.’
कॅप्टन रूफस म्हणाला, ‘लवकरच हैदराबादला आपल्याला लँडिंग करावे लागेल.’ परिस्थिती चिंताजनक होती. रुस्तमजींना वाटले, जर हा घातपात अथवा कारस्थान असेल, तर दुसरे इंजिनही निकामी होईल. अशा वेळी पंतप्रधानांना सावधगिरीचा इशारा द्यायलाच हवा. मग मागच्या कंपार्टमेंटमध्ये बसलेल्या नेहरूंकडे ते गेले. त्या वेळी नेहरू कृष्णमेनन यांनी युनोत दिलेले लांबलचक भाषण वाचत होते. रुस्तमजी पंतप्रधानांना म्हणाले, ‘विमानाच्या एका इंजिनाने त्रास दिला आहे. त्याला आग लागली होती. आता ती विझवली आहे. आपल्या विमानाचे एकच इंजिन आता चालू आहे. दौर्यात बहुधा व्यत्यय येऊ शकतो. खाली उतरल्यावर लगेच दुसरे विमान मिळेल की नाही, याची कल्पना नाही.’ पंतप्रधान नेहरू हसले. त्यांनी विचारले की, ‘आता आपण कुठे आहोत?’ रुस्तमजी म्हणाले, ‘वैमानिक सांगतो त्यानुसार बहुधा हैदराबादच्या जवळपास आहोत.’ मग शांतचित्ताने नेहरू पुन्हा भाषण वाचू लागले. ते अगदी निर्धास्त वाटत होते. संकटाच्या क्षणी इतरांना धीर देण्यासाठी शांत राहणे नेहरूंना जमत असे. रुस्तमजी धावतच स्कीपर अन् नॅव्हिगेटरपाशी गेले आणि त्यांनी स्कीपर व नॅविगेटर यांना विचारले, ‘आपण नक्की कुठं आहोत?’ दोघांनी सांगितले, ‘रायचूरपासून साधारणत: वीस मैलांवर आपण आहोत.’ ‘मग आपण रायचूरलाच का उतरत नाही? जेवढ्या लवकर खाली उतरू, तितके चांगले नाही का?’ त्यावर नॅव्हिगेटर जय म्हणाला, ‘नकाशाप्रमाणे रायचूरला धावपट्टी आहे, पण ती कशा अवस्थेत असेल त्याची कल्पना नाही.’ कॅप्टन रूफस त्यावर म्हणाला, ‘धावपट्टी जर सोयीची नसेल, तर खाली उतरणे आणि तिथून पुन्हा उड्डाण करणे फारच धोक्याचे आणि असुरक्षित आहे. आपल्याकडे सध्या एकच इंजिन आहे.’ मग शेवटी असे ठरले की, आकाशातून धावपट्टी बघायची. ती जर चांगल्या स्थितीत आढळली, तरच खाली उतरायचे. सहकार्यांच्या मदतीने कॅप्टन रूफस इमर्जन्सी लँडिंगची तयारी करू लागला. रुस्तमजी मागे आले. केबिनमधला सोफा हलवण्यात आला. विमान खाली उतरल्यावर लगेच बाहेर पडता यावे, यासाठी एक कर्मचारी दारापाशी तैनात करण्यात आला. पंतप्रधानांना त्याची कल्पना देण्यात आली. आता रायचूरला आपण खाली उतरत आहोत, हा संदेश कॅप्टनने पाठवला. सर्वांनी सीटबेल्ट बांधले. परराष्ट्र खात्याचे उपसचिव जगत मेहता त्या अवस्थेतही इकडेतिकडे हिंडत, फोटो काढण्यात मग्न होते. पीटीआयचे बातमीदार वत्स भराभर काही टिपणे नोंदवत होते. बहुधा त्यांच्या जीवनातली ती सर्वांत मोठी बातमी होती. जराशीही चूक झाली अथवा नशिबाने दगा दिला, तर साक्षात मृत्यूच दृष्टिपथात होता. विमानात सारेच जण भांबावले होते. त्या क्षणी सर्वांनी सावध राहण्याची गरज होती. रुस्तमजी मनाशी विचार करत होते, ‘जर हा घातपात असेल तर दुसरे इंजिनही निकामी होईल. विमान गिरक्या घेत खाली कोसळू लागेल. आग जर पूर्णपणे विझली नसेल, तर ती इंधनाच्या टाकीपर्यंत जाईल. विमानाचा स्फोट होऊ शकतो. अशा वेळी नेमके काय करायचे, याचा विचार आधीच केलेला बरा.’ पत्नी व मुलीच्या विचारांनी रुस्तमजी काही क्षण स्तब्ध झाले. पत्नीला उद्देशून त्यांनी झटपट एक निर्वाणीची चिठ्ठी लिहिली. शर्टाच्या खिशात ठेवून दिली. पंतप्रधान मात्र शांत होते. घबराट उडाल्याचे जरासेही चिन्ह त्यांच्या चेहर्यावर नव्हते. पत्रकार वत्स यांच्याबरोबर ते मजेत गप्पा मारत होते. दुसर्या एका विमानात बिघाड झाल्यानंतर त्याचे टायर कसे फुटले, याचा किस्सा त्यांना ते सांगत होते. विमान रायचूरच्या धावपट्टीभोवती घिरट्या घालत होते. खाली कोणीतरी गुराढोरांना हाकलत होते. विमान खाली उतरताना सर्वांनीच श्वास रोखून धरला. विमानाची चाके अजूनही बाहेर आली नव्हती. धावपट्टीवर विमान लँड होण्याआधी एक हादरा बसला. विमान एका बाजूला वळले. सर्वांनी नेटाने आपली आसने धरून ठेवली. तेवढ्यात विमानाची चाके बाहेर आली. खालची जमीन जोरात पळते आहे, असे दृश्य खिडकीतून दिसले. तेव्हा रुस्तमजी मोठ्याने ओरडले, ‘हेऽऽ.. आपण सुरक्षित आहोत.’ वातावरणातला ताण नाहीसा झाला. मग सारेच हसू लागले.
एरव्ही पंतप्रधानांच्या दौर्यात राज्यपाल, मुख्यमंत्री आणि प्रशंसकांचा घोळका विमानाच्या दारापर्यंत यायचा. त्यांना हार घालायचा. रायचूरला यांपैकी कोणीच नव्हते. फक्त एक जण गंभीर चेहरा करून तिथे उभा होता. तोच दारापाशी आला. रुस्तमजींनी विचारले, ‘कौन हो तुम?’ त्याने उत्तर दिले, ‘मी इथला चौकीदार आहे.’ मग त्याचीच सायकल घेऊन रुस्तमजी अधिकार्यांना माहिती द्यायला येरामरास रेल्वे स्थानकात गेले. नेहरू आल्याची बातमी तोपर्यंत वार्यासारखी गावात पसरली. गावकरी गोळा झाले. स्वागतासाठी नेहरूंना ते एका शाळेत घेऊन गेले. बोलण्याच्या ओघात अगदी सहजपणे नेहरूंनी विमान नादुरुस्त झाल्याचा उल्लेख केला. दरम्यान नेहरूंना तेथून नेण्यासाठी हैदराबादहून दोन डाकोटा विमाने पाठवण्यात आली. पंतप्रधानांचा पुढला प्रवास सुरू झाला. नेमके काय घडले याचा अंदाज रायचूरमध्ये कोणालाच आला नव्हता. जबलपूरच्या एका धडाडीच्या वृत्तपत्राने मात्र खास आवृत्ती काढून सर्वांपर्यंत ही बातमी पोहोचवली. अपघाताची कारणे शोधण्यासाठी खास चौकशी पथक नेमण्यात आले. खरे सांगायचे, तर कोणत्याही पथकाला सापडणार नाही, अशा अज्ञात शक्तीनेच पंतप्रधानांसह सर्वांना वाचवले होते.