मंडईतला गप्पांचा कट्टा म्हणजे काही टीकाटिपणी, हेवेदावे, वैर, असूया, मत्सर यांची लक्तरं धुवायला घाट नव्हता. अशा गोष्टींना या गप्पाष्टकांत स्थान नव्हतं. इथं चर्चा होत त्या रचनात्मक कामांच्या, गरुजूंना मदत देण्याच्या, कुणा असंघटित घटकाला न्याय मिळवून देण्यासाठी करायच्या प्रयत्नांच्या. राजकारणातही एक विशिष्ट आब राखणार्या या गप्पांना नर्मविनोदाची फोडणी असे; पण त्यातून कधी कुणाविषयीचा विखार पसरविला गेला नाही. कुणाला संपविण्याची भाषा कधी झाली नाही. या कारणांमुळे मंडईचा हा कट्टा सगळ्यांचा होता.
—-
रात्रीचे दहा वाजत आले आहेत. `महात्मा फुले मंडई’च्या गाळ्यांमधले दिवे एक-एक करीत डोळे मिटू लागले आहेत. सगळीकडं दुथडी भरून वाहणारे वरच्या पट्टीतले संमिश्र आवाज हळूहळू मंदावत चालले आहेत. मंडईच्या परिसरातल्या इतर दुकानांतही आवाराआवरीची धांदल उडाली आहे. तळणांच्या खमंग वासाचं मायाजाल फेकून गिर्हाइकांना खेचून घेणार्या. खाद्यपदार्थांच्या गाड्यांवरचे पलिते विझू लागले आहेत. आत्ता आत्तापर्यंत गर्दीनं भरून गेलेले रस्ते विरळ होत चालले आहेत. गाळ्यांवरले घाऊक विक्रेते आणि पथार्या अंथरून किरकोळीनं भाजीपाला विकणारे हातावर पोट असलेले कष्टकरी चांगला धंदा झाल्याच्या समाधानानं परतू लागले आहेत. खरेदीनं जडावलेल्या पिशव्या सावरीत गिर्हाइकंही घराच्या वाटांना लागली आहेत.
मंडईतला बहर ओसरल्यासारखा वाटत असतानाच, तिथं एक वेगळंही दृश्य आकार घेऊ लागलं आहे. काही मंडळी घाईत असल्याच्या गतीनं मंडईत दाखल होऊ लागली आहेत. मंडईत येऊन मिळणार्या सगळ्याच रस्त्यांवरून ही ओढ एकाच दिशेनं वाहते आहे. `मार्केट उपाहारगृहा’बाहेर मांडलेले बाक भरून जाऊ लागले आहेत. ती जागा संपून गेल्यावर मंडळी बाजूच्या कट्ट्यावर टेकत आहेत. आणखी येणार्यांसाठी हॉटेलातल्या खुर्च्या एकमेकांच्या हातांच्या साखळीतून तिथंच आजूबाजूनं मांडल्या जात आहेत. बघता बघता त्याही भरून जाऊ लागल्या आहेत. रात्र पुढं पुढं सरकत चालली आहे. सगळे बाक, कट्टे आणि खुर्च्या यांच्या गप्पांना रंग भरू लागला आहे. एकातून दुसरा, दुसर्यातून तिसरा असे विषय निघत आहेत. मध्येच एखादा नवाच विषय गप्पांच्या रिंगणात उडी घेतो आहे.
इथल्या गप्पांना कुठलाच विषय वर्ज्य नव्हता; मात्र त्याची एक अलिखित आचारसंहिता आपोआपच तयार झालेली होती. इथं प्रामुख्यानं राजकारण, समाजकारण, कुठं तरी सुरू असलेला एखादा चांगला-समाजोपयोगी उपक्रम यांची चर्चा होई. या गप्पा बहुतेक वेळा साभिनय असतं. त्या कलेत सगळेच अगदी `कसलेले’ होते. आपापला विषय रंगरंगवून सांगण्याची खुबी त्यापैकी प्रत्येकाकडं होती. इथं दाखल झालेल्यांकडं वेगवेगळ्या भागातल्या बातम्या असत, त्याही साध्या नव्हे; तर अगदी खास. प्रथमच कानांवर येणार्यांत वृत्तपत्रांच्या रकान्यात प्रसिद्ध होणार्या `एक्स्लुझिव्ह’ बातम्यांच्याही पलीकडल्या. अशा चटपटीत, खुसखुशीत, कुरकुरीत, ताजेपणाच्या वाफाळ वर्तुळांनी वेढलेल्या आणि जिभेवर हळुवार चव पसरत जाणार्या बातम्या त्यांचे धागेदोरे, त्यामागचं कार्यकारण, संबंधित व्यक्ती, अडाखे-अंदाज हे सगळं `बिटविन द लाईन्स’सह सांगितलं जाई. इथले काही कलाकार एवढे `मुरब्बी आणि खारावलेले’ असत, की असल्या बातम्या सांगणार्यांनी काही उच्चारण्याआधीच त्यांच्या मुद्रेवरील रेषांवरून आणि हातवार्यांच्या आवेशावरून मंडळी त्यांच्या `पोटातल्या’ बातम्यांचा माग अगदी अचूक काढीत. नाना फडणीस सज्ज्यात येरझारा घालताहेत; आणि खाली सदरेवर कुणी मुनीम काही लिहितो आहे; अशावेळी लेखणीच्या वरच्या टोकाच्या हालचालींवरून त्यानं काय लिहिलं आहे, ते नाना ओळखीत, असं सांगितलं जाई. आतल्या खबरांचा माग काढणार्याकडं नाना फडणीसांचा हाच धूर्तपणा होता. दोन्ही भुवया वक्राकार होऊन वर उचलल्या गेल्या आहेत, कधी तरी एखाद्याच भुवईचा वक्राकार संकेत काही सांगू पाहतो आहे, मधूनच डोळे एकदम मिचकावले जात आहेत; तर कधी बोलण्याआधीच ओठ घट्ट दाबून धरले आहेत, काही सांगताना स्वत:च्याच तळव्यावर टाळी पडते आहे किंवा टाळी देण्यासाठी समोर बसलेल्यापुढं तळवा सरकवला जातो आहे, अशा एकेकाच्या लकबी जणू ठरूनच गेल्या आहेत. तिथं रोज हजेरी लावणार्या सगळ्यांनाच या लकबी चांगल्या परिचयाच्या झाल्या आहेत; मात्र तरीही या पट्टीच्या गप्पिष्टांकडून येणार्या बित्तबातम्यांसंबंधीची उत्सुकता कधीही मावळून जात नसे.
तेव्हा पुणं आजच्याएवढं पसरलेलं नव्हतं. पूर्व आणि पश्चिम असे शहराचे दोनच भाग होते. आजच्या शिवाजी रस्त्यानं ते विभागलेले होते. दोन्ही भागांतलं लोकजीवन वेगळं, गरजा वेगळ्या. राहणार्याच्या कल्पना अगदीच भिन्न. मंडई या भागांना जोडणारा एक सांस्कृतिक पूल होता. सणवार, व्रतवैकल्य, मुंज, लग्न असले कौटुंबिक सोहळे यांच्यासाठी लागणारं सगळं साहित्य मंडईतच मिळायचं. महिलांचा `जीव की प्राण’ असलेली `तुळशीबाग’ मंडईला लागूनच. मंडईची बहीणच जणू! कापडचोपड, सोनंचांदी हे सगळं लक्ष्मी रस्त्यावर आणि पलीकडचं रविवार पेठेत. ताज्या आणि चविष्ट भाज्यांचं हुकमी ठिकाण तर मंडईच. त्यामुळं सांस्कृतिक अंतर असूनही पूर्व-पश्चिम पुण्यातली माणसं मंडईकडचं येतं. माणसामाणसांमधल्या निर्मळ संबंधाची वीण मंडईतच विणली जात असे. विशेष म्हणजे पिढ्यान् पिढ्या ती जपली जात असे. अनेक कुटुंबांचं मंडई परिसराशी अगदी जिव्हाळ्याचं नातं निर्माण झालं होतं. आजही ही नाती कायम आहेत.
तो काळ देशभरात काँग्रेसच्या एकछत्री प्रभावाचा होता. साहजिकच मंडईवरही याच विचारांचा पगडा होता. न. वि. ऊर्फ काकासाहेब गाडगीळ तेव्हा पुण्याचे खासदार होते. केंद्रातलं मंत्रिपदही त्यांच्याकडं होतं. सर्वसामान्यांविषयी त्यांच्या मनात कणव होती. सर्वधर्मीयांसाठी काकासाहेबांना कमालीची आस्था होती. मंडईच्या परिसरात अशाच माणसांचा राबता असे. या माणसांचे सारेच जीवनव्यवहार मंडईत सुरू होत आणि तिथंच संपत. या सगळ्यांच्या सुखदु:खांशी हा परिसर पूर्ण मिसळून गेलेला होता. काकासाहेबांनी एकदा मंडईचा उल्लेख `मंडई विद्यापीठ’ असा केला. तेव्हापासून या परिसराला वेगळीच झळाळी आली. शहराला लागून असलेल्या गावांतून, जिल्ह्याच्या ग्रामीण भागांतून भाजीपाला, फळं घेऊन शेतकरी यायचे. ट्रकमध्ये माल टाकायचा, चटणी-भाकरीचं गाठोडं घ्यायचं; आणि त्याच ट्रकमधून मंडईत यायचं. दिवसभर मालाची विक्री करायची. आलेल्या पैशातून संसाराला लागणारं वाणसामान, इतर चीजवस्तू भांडीकुंडी अशी खरेदी करायची. तलफ भागविणारी तंबाखू, विडीकाडी, तपकीर हेही मंडईत मिळायचं. पोराबाळांसाठी भेळभत्ता घेऊन जाण्यासाठी भडभुंजांच्या भट्ट्याही तिथंच पलीकडच्या चौकात. विड्याची तजेलदार पानं, सुपार्या, कात, अडकित्ते असं सारं काही तिथं हाताजवळ असे. मंडईच्या परिसरात गाड्यांवर भज्यांचे घाणे तळले जात असत. हॉटेलात मोठ्या कढयांत जिलेबीच्या गरमागरम वाफा दिसत असत. तळहाताएवढ्या पेंढ्यांच्या पराती भरलेल्या असत. सगळ्या खरेदीनंतर गावकरी मंडळी यांपैकी कुठं कुठं बसून एकेका पदार्थाची थाटात ऑर्डर देत. पदार्थांनी भरलेल्या बशा पाहता पाहता. रिकाम्या होत शेतकऱ्यांची ही मोठी चैन होती. करमणुकीसाठी `आर्यन’ आणि `मिनर्व्हा’ ही टॉकिज होती. लोकनाट्यांची पंढरी असलेलं. `आर्यभूषण थिएटर’ थोडं पलीकडचं होतं. शेती अवजारं, बी-बियाणी आणि चप्पल-बुटांचे जोडही याच परिसरात मिळत. मंडई ही मुळातच अशा सगळ्यांना सामावून घेणारी होती. आधार देणारी होती. सुखासमाधानाच्या दोनचार क्षणांचं दान देणारी होती.
`अखिल मंडई मंडळा’च्या सार्वजनिक गणेशोत्सवानं `मंडई विद्यापीठा’ला आकार दिला; आणि त्याची भक्कम बांधणीही केली. मंडईचा गणेशोत्सव मोठा दिमाखदार. सार्या राज्यभर त्याचा लौकिक पसरलेला. मंडळी या गणपतीला नवस बोलायची आणि तो फेडायलाही यायची. `मंडई’नं यंदा गणपतीची सजावट कशी केली आहे, ते पाहायची उत्सुकता अनेकांना असे. मंडईतल्या रुबाबदार गणेशोत्सवाच्या निमित्तानं कितीतरी कार्यकर्ते त्याच्याशी जोडले गेले. तालेवार नेत्यांच्या बरोबरीनं सामाजिक कामांचा अनुभव घेऊ लागले. साहजिकच सामाजिक आणि राजकीय कार्यकर्त्यांच्या जडणघडणीचं महत्त्वाचं केंद्र म्हणूनच `मंडई’चं महत्त्व वाढत गेलं. `मंडई’च्या कार्यकर्त्यांचं वर्तुळ विस्तारत गेलं. हजारो हात एकत्रित आले. समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी ते पुढाकार घेऊ लागले. कार्यकर्त्यांची बावनकशी मूस इथं आकार घेत राहिली. हेच कार्यकर्ते मग शहर, राज्य पातळीवर आणि देश पातळीवरही गेले. मंडईला `विद्यापीठा’चा दर्जा बहाल करताना काकासाहेब गाडगीळ यांना नेमकं हेच अभिप्रेत होतं.
पुणं हे `विद्येचं माहेरघर’ म्हणून ओळखलं जाणारं शहर. तिथल्या विद्यापीठाचा सगळीकडंच मोठा दबदबा. कार्यकर्ते तयार करण्याच्या अनोख्या सामाजिक प्रयोगाचं अभिसरण एखाद्या विद्यापीठासारखंच समाजाच्या सर्व स्तरांत होत होतं. या विद्यापीठानं कार्यकर्त्यांना सामाजिक भान दिलं. त्यांची राजकीय समज वाढविली. राज्यापुढील आणि देशापुढील विविध प्रश्नांच्या जाणिवा त्यांच्या मनात जाग्या होत गेल्या. अनुभवांतून त्यांची मतं पक्की परिपक्व होऊ लागली. कुठल्याही विद्यापीठाचा परिसर विस्तीर्ण आणि झाडांनी वेढलेला असतो. भव्य, सुबक रचनेच्या इमारती, सुसज्ज ग्रंथालयं, प्रयोगशाळा. `मंडई विद्यापीठा’त काय होतं? तिथंही झाडं होती, ती सामाजिक जाणिवांच्या भावनांनी भारावलेल्या माणसांची. तिथंही मोठमोठ्या इमारती होत्या; पण दगडविटांच्या नव्हे; तर माणसांच्या चांगुलपणाची भक्कम बांधणी असलेल्या. ‘मंडई विद्यापीठा’तही प्रयोगशाळा होत्या; पण त्या माणसामाणसांतले संबंध आणि सहकार्य दृढ करणार्या अजब रसायनाचा वापर करून कार्यकर्ते-नेते तयार करणार्या इथं ग्रंथालयंही होती; पण ती माणसांच्या अनुभवांच्या अजोड पुस्तकांनी समृद्ध असलेली.
इतर विद्यापीठांना क्वचितच लाभला असेल असा विद्वानांच्या सहवासाचा, समाजधुरिणांच्या कर्मभूमीचा आणि आध्यात्मिकतेचा अनोखा वारसा `मंडई विद्यापीठा’ला लाभला. न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे, रमाबाई रानडे, `काळ’कर्ते शिवराम महादेव परांजपे, `सत्यशोधक चळवळी’चे पहिले अध्यक्ष आणि महाराष्ट्राच्या सामाजिक इतिहासाचे एक शिल्पकार डॉ. विश्राम रामजी घोले इत्यादींचं वास्तव्य मंडई परिसरात होतं. लोकमान्य टिळक, दादासाहेब खापर्डे, सुभाषबाबू, स्वातंत्र्यवीर सावरकर, महात्मा गांधी, अॅहनी बेझंट अशी मंडळी त्यांच्याकडे येत असत. एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस मंडईतला रानडे वाडा हे राजकीय व सामाजिक चळवळीचं केंद्र होते. वसंत व्याख्यानमाला, साहित्य संमलनं इत्यादींची गंगोत्री हीच वास्तू होती. मंडईत लोकमान्यांची सहा व्याख्यानं झाली होती.
`मंडई विद्यापीठा’त झाला तसा सामाजिक अभिसरणाचा प्रयोग इतर कुठंही झाला नाही! मंडईचा गणेशोत्सव आणि तांबोळी समाजाचा ताबूत सगळे मंडईकर एकत्रित येऊन करीत. गुलाबभाई आत्तार यांचा मंडईत लसणाचा गाळा होता. ते कट्टर वारकरी होते. शेकडो अभंग, ओव्या, गवळणी त्यांना तोंडपाठ होत्या. कबिराचे दोहेही त्यांना मुखोद्गत होते. त्यांचा आवाजही उत्तम होता. मंडईच्या `हरिहर भजनी मंडळा’चे ते विणेकरी होते. त्यांनी पंढरीची वारी अखंडपणे केली. वारीत कोणत्या वेळी कोणता अभंग म्हणायचा याची अगदी अचूक माहिती गुलाबभाईंकडं होती. गुलाबभाईंचं निधन झालं, तेव्हा रमजानचा महिना होता. तो दिवस शुक्रवारचा होता. सौर पंचांगाप्रमाणे द्वादशी होती. गुलाबभाईंचं घर मंडई परिसरात गाडीखान्याजवळ. मंडईच्या कार्यकर्त्यांनी मौलवींना विनंती केली; गुलाबभाई आमच्या भजनी मंडळाचे विणेकरी होते. त्यांच्या अंतयात्रेत आम्हाला भजन म्हणायची परवानगी द्या. मौलवींना होकार दिला. पुढ भजनी मंडळ आणि मागं जनाजा अशी ही अंत्ययात्रा गाडीखान्यापासून मंडई गणपतीपर्यंत आली. तिथं गणपतीची आरती करण्यात आली. आणि नंतर मौलवींनी दफनविधी केले. हे अपवादात्मक उदाहरण `मंडई विद्यापीठा’च्या साक्षीनं घडलं. त्याचं कारण `सर्वधर्मसमभाव’ ही या विद्यापीठाची खरी संस्कृती होती. मंडईनं ती अजूनही जपली आहे.
विरोधाचे सूर ऐकून घेण्याची सहिष्णुता कुठल्याही पेचात व्यवहार्य मार्ग कागढण्याचे प्रयत्न; आणि नंतर या कशाचेही ओरखडेसुद्धा न राहणारं निकोप-निर्मळ आणि कमालीचं समंजस वातावरण हे `मंडई विद्यापीठा’च्या प्रारंभापासून घडत राहिलं आहे. तेव्हाच्या पुण्याच्या मध्यवर्ती ठिकाणी सरदार खासगीवाले यांच्या मालकीची चार एकर जागा पडून होती. लोकांच्या सोयीसाठी तिथं भाजीपाला-फळं यांच्या विक्रीचं मार्वेâट बांधावं, असा ठराव तेव्हाच्या नगरपालिकेनं १८८२मध्ये केला. महात्मा जोतिबा फुले आणि हरी रावजी चिपळूणकर अशा दोघा सभासदांनी या ठरावाला विरोध केला. मंडई उभारण्यासाठी अडीच-तीन लाख रुपये खर्च करण्याऐवजी ही रक्कम शिक्षणकार्यासाठी द्यावी अशी त्यांची भूमिका होती. मात्र हा ठराव मंजूर झाला आणि लवकरच मंडईच्या इमारतीचं काम सुरूही झालं. उंच टॉवर असलेली मंडईची अष्टकोनी इमारत तीन वर्षांत पूर्ण झाली. तेव्हाच्या मुंबई इलाख्याचे गव्हर्नर लॉर्ड रे यांच्या हस्ते पाच ऑक्टोबर १८८६ रोजी इमारतीचं उद्घाटन झालं. या मार्वेâटला तेव्हा रे यांचंच नाव देण्यात आलं.
पुढं नगरपालिकेचे सभासद असलेले आचार्य प्र. के. अत्रे यांनी १९४०मध्ये ठराव देऊन या मार्वेâटला महात्मा फुले यांचं नाव दिलं. आजही तेच कायम आहे. मंडईची दगडी इमारत कमालीची देखणी. ती दुमजली आहे. तळमजल्यावर भाजीपाला विक्रीचे गाळे. आणि वरच्या मजल्यावर संग्रहालय! हेही एक अजबच म्हणायचं! या वेगवेगळ्या गोष्टींची जोडी पुण्यातच आकाराला येऊ शकते. मंडईला तिचं स्वत:चं असं एक व्यक्तिमत्व होतं. पुणेकरांचे काही समज अगदी पक्के असतात. ते कुणीही आणि कधीही सहसा बदलूच शकत नाही! म्हणूनच या बाबतीत कुणी पुणेकरांच्या नादीही लागत नाही. चुकूनसुद्धा. मंडईत नेहमी ताजी व स्वच्छ भाजी मिळते आणि ती चविष्टच असते, हा समजही त्यापैकीच एक. त्याला आजतागायत कधीच तडा गेलेला नाही. मंडईतली सगळीच दुकानं कमालीची देखणी. टोपल्यांत किंवा केळीच्या पानांवर भाज्यांचे ढीग लागलेले. भाज्या निवडून साफ केलेल्या. नावालासुद्धा कुठं डाग आढळायचा नाही. कांदे-बटाटे, केळीची पानं, फुलं, द्रोण-पत्रावळी असे एकेक विभाग. तो तो विभाग सुरू झाला की सदाशिव पेठेतून कॅम्पात आल्यावर वाटावं, तसा अनुभव येई. सगळीकडची मांडणी वेगळी. सजावट वेगळी. अशी देखणी मांडणी करणारे `वस्ताद’ सगळ्याच विभागांत असत. हे सगळे कसबी कारागीर अशा लौकिकानं ओळखले जाणारे. गिर्हाईकांत काही उच्चभ्रू असत. भाज्यांचे भाव करण्याची, त्यांची निवड अतिशय चिकित्सकपणे करण्याची त्यांची सवय अशा गिर्हााईकांशी विक्रेते हसतमुखानं बोलत-वागत. ही गिर्हाइकं एका गाळ्यावरून दुसरीकडं जात, तेव्हा आधीचा गाळेवाला निरोप पाठवी; हे `शिष्टमंडळा’चे सदस्य आहेत, जरा जपून बरं का! गाळ्यागाळ्यांवर अशा नर्मविनोदाचे संवाद सुरू असत.
मंडईतला प्रत्येक कोपरा सतत उद्योगात असे. भाजी विक्रेत्यांच्या मागील बाजूला खराब पानं काढून टाकून जुड्या बांधणारे बसलेले असत. कुणी भाज्या निवडून स्वच्छ करीत. काही जण थोडा दुय्यम दर्जाचा माल बाजूला काढीत. हा मालही गोरगरिबांना दिला जाई. मंडईत गेलेला कुणीही कधी रिकाम्या हातांनी परतत नसे. भाज्या खरेदी करताना काय निकष लावायचे, याचं मार्गदर्शनही गिर्हाईकांना केलं जात असे. यथावकाश मंडईला नवी बहीण मिळाली. जुन्याशेजारीच नवी मंडई उभी राहिली. घाऊक मार्वेâट गुलटेकडीला हललं. मात्र तरीही मंडईतलं चैतन्य अबाधित राहिलं. एकेका गाळ्यावर पिढ्यापिढ्यांची गिर्हाइकं जोडली गेली आहेत. हे विक्रेतेही गिर्हािइकांच्या कुटुंबाशी एवढे परिचित असत, की त्यातूनच पुढं सोयरीक जुळविण्याचेही प्रयत्न सुरू झाले. मंडई प्रत्येक पुणेकराच्या मनात खोलवर जाऊन बसलेली आहे, ती अशा गोष्टीमुळंच!
पुण्यात तेव्हा `कट्टा संस्कृती’ही होती. मंडळींचे गप्पांचे चर्चांचे अड्डे ठरलेले होते. या सगळ्या कट्ट्यांचं वेगळेपण संस्कृतीचं लोण पश्चिमेकडच्या पुण्यातील पसरलं. हॉटेल डिलाईट, रूपाली, वैशाली, वाडेश्वर ही ठिकाणं आजही प्रसिद्ध आहेत. तरीही मंडईतला कट्टा हा आद्य. या कट्ट्याचं भौगोलिक स्थानमहात्म्यही वेगळं होतं. वेगवेगळ्या कामांनिमित्त शहरातल्या मंडळींचे रस्ते मंडईकडंच येऊन मिळतं. वेगवेगळ्या दैनिकांची कार्यालयंही प्रामुख्यानं मंडईच्या आजूबाजूलाच होती. त्यामुळं या परिसरातलं वारंही खास बातम्या, `आतल्या गोटांत’ल्या बातम्या, `विश्वसनीय सूत्रां’नी `पेरलेल्या’ बातम्या; आणि त्यांना अधूनमधून दिल्या जाणार्या, खमंग फोडणीचा वास बरोबर घेऊनच फिरत असे. रोजच्या बातम्यांचं काम संपवून बातमीदार मंडळींची पावलं मंडईतल्या `मार्केट उपहारगृहा’कडं वळू लागत. ही मंडळी काम आटोपून एवढ्या घाईनं जातात तरी कुठं, याची उत्सुकता सुरुवातीच्या काळात सार्या संपादकीय विभागात असे. या उत्सुकतेपोटी `टेबला’वर काम करणारे उपसंपादक, वृत्तसंपादक हमखास तिथं डोकवायचे. ज्यांची नावं-फोटो आपण सातत्यानं प्रसिद्ध करतो, ती मंडळी प्रत्यक्षात असतात कशी? बोलतात कशी? ते काय विचार करतात? राजकारण `शिजतं’ कसं? याचा जिवंत अनुभव त्यांना इथं येत असे. चेष्टामस्करी, हजरजबाबीपणा, अनेकांच्या हुबेहुब नकला, पडद्याआडच्या किंवा बंद खोली’तल्या घडामोडी अशा मालमसाल्यासह गप्पांची खमंग मैफल जमविणारे ज्येष्ठ पत्रकार रामभाऊ जोशी, आपल्या बॅगेत कोनाकोपर्यातली बित्तंबातमी कार्बन कॉपीसह घेऊन लुनावरून सर्वत्र संचार करणारे; आणि कामगार चळवळीची पार्श्वभूमी असणारे, पत्रकारांचे `भीष्म पितामह’ म्हणून सर्वमान्य असणारेगोपाळराव पटवर्धन, `क्राइम न्यूज’मध्ये कायम अनेकांना चकवा देणारे भि. ना. ठाकोर, कामाचा दांडगा उरक असलेले गजानन खोले, गो. बा. बुधकर, `जगन्मित्र’ प्रमोद जोग, विविध विषयांच्या कायम शोधात असलेले आणि उत्सुकतेचा धागा घट्ट पकडून असलेले मधुकर प्रभुदेसाई, परखड आणि चिकित्सक भाष्य निर्भीडपणे करणारे वरूणराज भिडे, उदय गोखले, अविनाश कारखानीस असे सगळे या गप्पाष्टकांतले हुकमी मोहरे होते. वसंतराव काणे, स. आ. जकाते ही प्रकरणं आनखीनच वेगळी. त्यांच्या उपस्थितीशिवाय गप्पाष्टकांना रंगत चढतच नसे.
काँग्रेसचे एकनिष्ठ ज्येष्ठ नेते वसंतराव थोरात आणि मंडई हे अभेद्य समीकरण जवळजवळ तीन-चार दशकं पुण्याच्या राजकारणात दबदबा ठेवून होतं. वसंतरावांचं आदरयुक्त नाव तात्या. पुढं `साहेब’ हे शब्द जोडण्याचीही गरज नाही; `तात्या’ एवढं म्हटलं, तरी ऐकणारा तुमचा शब्द न शब्द कमालीच्या आदबीनं ऐकत असे. मंडईतल्या आणि अर्थातच शहरातल्या सार्या छोट्या-मोठ्या घटनांचे तपशील तात्यांपर्यंत `जसं घडलं तसं’ या स्वरूपातच येत असत. ते मोजकं; पण मार्मिक बोलत. तात्या बोलत असताना बाकी सगळे गप्प बसत. तिथल्या तो अलिखित संकेतच होता. तात्यांचा त्या त्या वेळचा `मूड’ बघून क्वचितच कुणी काही मुद्दा मांडे.
मंडईनं खरोखरच सर्व स्तरांतले राजकीय-सामाजिक कार्यकर्ते घडविले. खुद्द वसंतराव शहर काँग्रेसचे अध्यक्ष होते. पुण्याचं महापौरपद त्यांनी भूषविलं होतं आणि नंतर ते आमदारही झाले. उल्हास पवार आमदार झाले. या परिसरातलेच मोहन जोशीही आमदार झाले. बाबूराव सणस, नामदेवराव मते, इथलेच शांतिलाल सुरतवाला महापौर झाले. चंदूशेठ काळभोर, शिवाजीभाई ढमढेरे, डॉ. सतीश देसाई, रमेश खन्ना उपमहापौर झाले. शंकरराव उरसळ यांनी जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद भूषविलं. बापूसाहेब थिटे, शिवाजीराव कोडे यांनाही हा बहुमान मिळाला. बापूसाहेब नंतर मंत्रीही झालं. नगरसेवक तर अनेक जण झाले. वसंतराव थोरात महापौर असताना त्यांनी राष्ट्रीय पातळीवर कबड्डी स्पर्धा सुरू केल्या. पुढं अनेक महापालिकांनी त्याचं अनुकरण केलं. `एक रुपयात झुणका-भाकर’ या संकल्पनेचे वसंतराव जनक होते. त्यांनी १९७२च्या दुष्काळात हा अभिनव उपक्रम सुरू केला आणि तो अनेक वर्ष चालविला. असं सामाजिक भान `मंडई विद्यापीठा’नं सातत्यानं जपलं.
इथली `पुस्तक पेढी’ची कल्पनाही अशीच. जुनी शालेय पाठ्यपुस्तकं जमा करून ती नीटनेटकी करून विद्यार्थ्यांना वर्षभर अभ्यासासाठी उपलब्ध करून दिली जात. अनेक गरीब मुलांचं शिक्षण त्यामुळं होऊ शकलं. प्रत्येक नैसर्गिक आपत्तीच्या वेळी भरीव मदत घेऊन `मंडई विद्यापीठ’ तिथं धावून गेलं. गरीब पैलवानांच्या खुराकासाठीही `मंडई’नं मदत पुरविली.
निवडणुकांच्या प्रचाराच्या काळात `मंडई विद्यापीठा’चा परिसर कमालीचा सजग झालेला असे. कुठं काय चाललं आहे, त्याची खडानखडा माहिती तिथं पोचत असे. त्यानुसार `स्ट्रॅटेजी’ ठरत जाई. सार्या शहराचं लक्ष या काळात मंडईकडं लागलेलं असे. नंतर विजय साजरा होई, तोही अतिशय संयमितपणानं. एवढंच नव्हे, तर पराभव स्वीकारावा लागला, तरी वसंतराव विजयी उमेदवाराकडं जाऊन पुष्पहार घालून त्याचं अभिनंदन करीत. हा उमदेपणा हा वसंतरावांचा अलंकार होता. तो त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा जणू स्थायीभावच होता.
पुण्याच्या गणेशविसर्जन मिरवणुकीचा दिमाख सर्वांच्याच उत्सुकतेचा विषय असतो. या मिरवणुकीत मंडईच्या गणपतीबरोबर तात्यांची उपस्थिती असण्याची अख्ख्या मिरवणुकीवर छाप असे. तात्यांच्या शब्दाला एवढं वजन होतं.
मंडईतला गप्पांचा कट्टा म्हणजे काही टीकाटिपणी, हेवेदावे, वैर, असूया, मत्सर यांची लक्तरं धुवायला घाट नव्हता. अशा गोष्टींना या गप्पाष्टकांत स्थान नव्हतं. इथं चर्चा होत त्या रचनात्मक कामांच्या, गरुजूंना मदत देण्याच्या, कुणा असंघटित घटकाला न्याय मिळवून देण्यासाठी करायच्या प्रयत्नांच्या. राजकारणातही एक विशिष्ट आब राखणार्या या गप्पांना नर्मविनोदाची फोडणी असे; पण त्यातून कधी कुणाविषयीचा विखार पसरविला गेला नाही. कुणाला संपविण्याची भाषा कधी झाली नाही. या कारणांमुळे मंडईचा हा कट्टा सगळ्यांचा होता. सर्व राजकीय पक्षांची कार्यकर्ते, वेगवेगळ्या मतप्रवाहांचे लोक तिथं येत; पण त्यांच्यात कधी टोकाचं वैर निर्माण झालं नाही. विरोधी मतांचा, वेगळ्या विचारधारांचा आदर या कट्ट्यावर कायम राखला जाई. ही सुसंस्कृत राजकीय समज आणि परिपक्व सामाजिक भान इथं नेहमीच दिसत असे; आजही दिसतं.
मंडईचा चेहरा बदलत गेला; पण तिचं काळीज मात्र तेच राहिलं आहे. सर्वसामान्यांनी जवळ घेणारं. त्यांना आधार देणारं. त्यांना समजून घेणारं आणि त्यांच्याशी पूर्ण एकरुप झालेलं.