कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा वाढू लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. वाढत्या कोरोनाग्रस्तांची संख्या लक्षात घेता दिल्ली सरकार अॅलर्ट झाली आहे. आता पाच राज्यांमधून दिल्लीत येणाऱ्या लोकांना कोरोना निगेटिव्ह रिपोर्ट घेऊन येणं सक्तीचं करण्यात आलं आहे. महाराष्ट्र, केरळ, छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि पंजाब या पाच राज्यातून दिल्लीत येणाऱ्या लोकांना निगेटिव्ह RT-PCR दाखवल्यानंतरच दिल्लीत प्रवेश मिळणार आहे.
गेल्या एका आठवड्यात नव्या कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत, त्यामध्ये 86 टक्के रुग्ण हे याच पाच राज्यातील आहेत, ज्यानंतर दिल्ली सरकारने हा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचे औपचारिक आदेश लवकरच जारी करण्यात येतील असे आजतकच्या वृत्तात म्हटले आहे. या पाच राज्यांच्या नोडल ऑफिसरना सांगितले जाईल की आपल्या राज्यातून दिल्लीत जाणाऱ्या लोकांना 72 तासच्या आतील निगेटिव्ह RT-PCR टेस्ट रिपोर्ट सोबत ठेवणे आवश्यक असल्याचे कळवा.
दिल्ली सरकारचा हा आदेश 26 फेब्रुवारी शुक्रवारी रात्री 12 वाजल्या पासून 15 मार्च दुपारी 12 वाजेपर्यंत लागू असणार आहे. हा आदेश विमान, ट्रेन आणि बसमधून दिल्लीत येणाऱ्या प्रवाशांसाठी बंधनकारक असेल. मात्र कारने दिल्लीत येणाऱ्यांना हा नियम लागू नसेल. म्हणजे आपण या पाच राज्यांमधून दिल्लीस जात असल्यास निगेटिव्ह RT-PCR रिपोर्ट असणे बंधकारक असेल.
या आधी उत्तराखंड सरकारने या पाच राज्यांमधून येणाऱ्या लोकांना कोरोना टेस्ट आवश्यक केली आहे. सरकारने आपल्या निर्णयात म्हटले होते की, महाराष्ट्र, गुजरात, केरळ, मध्य पदेश आणि छत्तीसगड येथून येणाऱ्या प्रवाशांसाठी जिल्ह्याच्या सीमा सील केल्या आहेत. राज्याच्या सीमेवर कोरोनाची चाचणी केली जाईल. यासाठी आशारोडी चेकपोस्ट, रेल्वे स्टेशन आणि विमानतळांवर विशेष व्यवस्था करण्यात येणार आहे.
सौजन्य : दैनिक सामना