गुजरातमधल्या अहमदाबादमध्ये असलेल्या मोटेरातल्या क्रिकेट मैदानाची पुनर्उभारणी करण्यात आली आहे. या मैदानाचं 24 फेब्रुवारी रोजी उद्घाटन करण्यात आलं. उद्घाटनानंतर या मैदानाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव देत असल्याची घोषणा गुजरात क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अमित शहा यांनी केली आहे. उद्घाटनानंतर या मैदानावर हिंदुस्थान आणि इंग्लंड यांच्यात दिवस-रात्र पद्धतीने कसोटी सामना खेळवला जाणार आहे. या सामन्यासाठीची नाणेफेक इंग्लंडने जिंकली असून त्यांनी पहिले फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
हिंदुस्थानचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते या मैदानाचे उद्घाटन करण्यात आले. हे मैदान जगातील सर्वात मोठे क्रिकेट मैदान असून इथली प्रेक्षक संख्या 1.32 लाख इतकी आहे. अमित शहा यांनी उद्घाटन कार्यक्रमात बोलताना म्हटले की येत्या 6 महिन्यांमध्ये या मैदानात ऑलिम्पिक, एशियाड आणि कॉमनवेल्थ सारख्या स्पर्धांचे आयोजनही करता येऊ शकेल. अहमदाबादची ओळख येत्या काळात क्रीडा शहर म्हणून होईल असेही ते म्हणाले.
हे मैदान 63 एकर जागेवर उभे राहिले असून याच्या पुनर्उभारणीसाठी जवळपास 800 कोटींचा खर्च करण्यात आला आहे. या मैदानात 76 कॉर्पोरेट बॉक्स, 3 सरावासाठीची मैदाने आणि 4 ड्रेसिंग रुम तयार करण्यात आल्या आहेत. अशी सुविधा असलेले हे जगातील एकमेव क्रिकेट मैदान आहे असे सांगण्यात आले आहे.
या मैदानामध्ये पावसाच्या पाण्याचा निचरा व्हावा यासाठी अत्याधुनिक व्यवस्था करण्यात आली आहे यामुळे पाऊस पडल्यानंतर अवघ्या अर्धा तासात पुन्हा खेळ सुरू करता येऊ शकतो. दिवस-रात्र पद्धतीच्या सामन्यांसाठी विशिष्ट पद्धतीच्या एलईडी लाईटची व्यवस्था करण्यात आली आहे. या मैदानाचा आकार हा 32 फुटबॉल मैदानांच्या आकाराएवढा असल्याचं सांगण्यात आलं आहे.