‘डार्लिंग तू…’ या शिर्षक गीतापाठोपाठ ‘डार्लिंग’ या चित्रपटाचे ‘ये है प्यार…’ हे रोमँटिक गाणे आले. ते यशस्वी होतानाच आता या चित्रपटाचा धडाकेबाज ट्रेलरही निर्मात्यांनी आज रिलीज केला. २६ जानेवारीला प्रदर्शित होत असलेल्या या सिनेमाचा ट्रेलरही रसिकांना घायाळ करणार हे नक्की. सेव्हन हॉर्स एण्टरटेन्मेंट, व्ही. पतके फिल्म्स आणि कथाकार मोशन पिक्चर्स या तीन बॅनरअंतर्गत या सिनेमाची निर्मिती अमित धुपे, अजय ठाकूर, व्ही. जे. शलाका आणि निखील खजिनदार यांनी केली आहे.
दिग्दर्शक समीर आशा पाटील यांच्या नजरेतून या सिनेमाची प्रेमकथा पहायला मिळणार आहे. उत्सुकता वाढवणार्या कथानकाला अद्ययावत तंत्रज्ञानाची जोड देत, सुरेल गीत-संगीताची पेरणी आणि दर्जेदार निर्मितीमूल्यांचा यथोचित वापर करून त्यांनी हा सिनेमा बनवला आहे. यात प्रथमेश परब आणि रितीका श्रोत्री ही ‘टकाटक’ जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांसमोर येतेय, तर त्यांच्या जोडीला ‘लागिरं झालं जी’फेम निखिल चव्हाण हादेखील प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. नवीन वर्षाची सुरुवात तेजोमय करण्याच्या उद्देशानं ‘डार्लिंग’ हा सिनेमा दाखल होतोय. लॉकडाऊनमुळे या वर्षात आलेली मरगळ झटकून नव्या वर्षात नव्या उमेदीनं भरारी घेण्याचं टॉनिक ही मराठमोळी ‘डार्लिंग’ सर्वांना देईल, असे दिग्दर्शक समीर आशा पाटील म्हणाले.