कोरोना संकट देशभर पसरले असताना रुग्णसंख्येत महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर होता. राज्य सरकारसमोर आव्हानच उभे ठाकले होते. मात्र मोठमोठी आव्हाने पायदळी तुडवणाऱया महाराष्ट्राने या नैसर्गिक आव्हानाचाही प्रभावीपणे सामना केला. कोरोनाग्रस्त बरे होण्याचे प्रमाण वाढले. अकाली होणारे मृत्यू आटोक्यात आले. सुरुवातीला 5 टक्के असणारा मृत्यूदर आता 2.5 टक्क्यांवर आला. शिखरावर पोहोचलेल्या कोरोनाला पायापर्यंत आणण्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यातील सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना परिस्थिती अत्यंत संयमाने पण तितक्याच प्रभावीपणे हाताळली. त्यांनी कोरोना नियंत्रणासाठी वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. तात्याराव लहाने यांच्या नेतृत्वाखाली टास्क फोर्स स्थापन केला. आपात्कालीन परिस्थिती हाताळण्याचा दांडगा अनुभव असलेल्या डॉ. लहाने यांनी राज्यातील सरकारी वैद्यकीय महाविद्यालये आणि रुग्णालयांना कोरोना परिस्थितीसाठी युद्धपातळीवर सुसज्ज केले. वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनीही त्यांना संपूर्ण सहकार्य केले.
‘कोरोना केवळ नागरिकांसाठीच नव्हे तर डॉक्टरांसाठीही नवीन होता. कोरोनाचा सामना करण्यासाठी आम्ही आरोग्य व्यवस्थापन यंत्रणेत आवश्यकतेनुसार सुधारणा केल्या. प्रत्येक क्षण महत्त्वाचा होता. कोरोनाची लागण झालेल्या रुग्णाचा जीव वाचवणे आमचे ध्येय होते. वैद्यकीय महाविद्यालयांना आवश्यक असलेली उपकरणे युद्धपातळीवर उपलब्ध करून देण्यात आली. रुग्णालयातील बेडची संख्या वाढवली गेली. चिंताजनक रुग्णांची आम्ही खूप काळजी घेतली. वेळोवेळी त्यांच्या प्रकृतीचे अपडेट व्हिडीओ काॅन्फरन्सिंगद्वारे घेत होतो. त्याप्रमाणे डॉक्टरांनाही आवश्यक सूचना देत होतो. वैद्यकीय महाविद्यालयांनी कोरोना संकटात केलेल्या कामांमुळेच आज प्रत्येक जिह्यात वैद्यकीय महाविद्यालय असावे अशी मागणी होत आहे.’ असे डॉ. लहाने यांनी सांगितले.
मृत्यूदर लवकरच शून्यावर येईल
कोरोना नियंत्रणात आणण्यास ‘थ्री-टी’ हे धोरण महत्वाचे ठरले. ‘ट्रेसिंग’ म्हणजेच कोरोना रुग्णाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध, ‘टेस्टिंग’ म्हणजेच त्यांची चाचणी आणि ‘ट्रीटिंग’ म्हणजेच त्यांना उपचार देणे असे हे ‘थ्री-टी’ धोरण होते. त्यामुळेच रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले. ‘कोविड-19 वॉर रूम’ आणि त्यातील रॅपिड रिस्पॉन्स टीम्स यांचेही त्यात मोलाचे योगदान आहे. कोरोनामुळे निर्माण होणाऱया कोणत्याही परिस्थितीचा आता आपण सामना करू शकतो. 2.5 वर घसरलेला मृत्यूदर लवकरच शून्यावर येईल. – डॉ. तात्याराव लहाने, वैद्यकीय शिक्षण संचालक
सौजन्य- सामना