संपूर्ण देशाचे लक्ष सध्या कोरोनाच्या लसीकडे लागून राहिले आहे. लस निर्मिती पूर्ण झाल्यास प्रत्येकाला लस मिळेल, ही अपेक्षा व्यक्त केली जात असतानाच देशातील कोरोना रुग्णांची साखळी तुटल्यास प्रत्येकाला लसीकरणाची गरज नसल्याची भूमिका अखिल भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (आयसीएमआर) मंगळवारी जाहीर केली. त्यामुळे कोरोनाची साखळी तुटणे आवश्यक असून त्याकडे विशेष लक्ष देण्याची गरज यावेळी आयसीएमआरने बोलून दाखविली.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची पत्रकार परिषद मंगळवारी नवी दिल्लीत पार पडली. त्यावेळी आयसीएमआरचे अध्यक्ष बलराम भार्गावा यांनी ही भूमिका जाहीर केली आहे. देशातील प्रत्येकाचे लसीकरण कधीपर्यंत पूर्ण होईल, याबद्दलल त्यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी वरील भूमिका जाहीर केली आहे.
संपूर्ण देशभरात लसीकरण करण्यात येईल, असे कधीही केंद्र सरकारतर्फे जाहीर करण्यात आलेले नाही. लसीचा प्रभाव किती आहे यावर लसीकरण करायचे की नाही, हे अवलंबून असल्याचे भार्गव यांनी सांगितले. तर देशातील कोरोनाच्या रुग्णांची साखळी तोडणे हे आमचे प्रमुख उद्दिष्ट आहे. फक्त हायरिस्क असणाऱया रुग्णांपर्यंत लस पोहचवून कोरोनाची साखळी तोडण्यास आम्ही यशस्वी झाल्यास संपूर्ण देशात लसीकरण करण्याची गरज नसल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
ऑक्सफर्डच्या लसीचे काम सुरूच राहणार
ऑक्सफर्डच्या लस चाचणी दरम्यान तामिळनाडू येथील एकाला दुष्पपरिणाम झाल्याचे नुकतेच उजेडात आले होते. त्यामुळे या लसीच्या कामात अडथळा येण्याची शक्यता वर्तविण्यात आली. ही शक्यता आज केंद्राचे आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी फेटाळून लावली आहे. यामुळे लस निर्मितीच्या कामात कोणतीही अडचण निर्माण होणार नाही. कोणतीही व्यक्ती ज्यावेळी चाचणीमध्ये सहभागी होते त्यावेळी त्या व्यक्तीला दुष्परिणामाला सामोरे जावे लागू शकते, याची कल्पना दिलेली असते. त्यानंतरच त्यांची लेखी परवानगी घेऊन चाचणी करण्यात येते, असे त्यांनी यावेळी नमूद केले.
सौजन्य- सामना