‘मराठी ही आपल्या रोमारोमात भिनलेली आहे. केवळ मराठी भाषा दिनी एकच दिवस भाषेबद्दल प्रेम उचंबळून येणे हे चुकीचे आहे. माझी माती, माझी माता, माझी मातृभूमी आणि माझी मातृभाषा हा आपल्यासाठी अभिमानाचा व गौरवाचा विषय असून तो गौरव जपणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. याच भावनेतून पुढच्या एक वर्षात मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देऊ’ असा निर्धार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज व्यक्त केला.
मराठी भाषा गौरव दिनानिमित्ताने विधान भवनातील वि. स. पागे संसदीय प्रशिक्षण केंद्र आणि मंत्रालयातील मराठी भाषा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ऑनलाइन परिसंवादाचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते. ‘पुढच्या मराठी भाषा दिनापर्यंत मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देण्याच्या ध्येयाने एकत्रपणे पुढे जाऊ.’ असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
मराठी नसती तर तुम्ही आज असता का?
उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, ‘मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देण्यासाठी गेली कित्येक वर्षे आपण प्रयत्नशील आहोत. केंद्रीय समितीपुढे तो विषय प्रलंबित आहे. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा नाकारणाऱयांना, ही महाराष्ट्राची, छत्रपती शिवाजी महाराजांची भाषा आहे. ती नसती तर तुम्ही आज असता का? याचा विचार करा, असे खडसावून सांगितले पाहिजे.’ मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी हा एकच पुरावा पुरेसा आहे’, असेही त्यांनी ठणकावले.
भाषेचा अभिमान हवा, दुराभिमान नको!
‘अनेकदा आपण मराठीत बोलताना लाजतो. उच्चभ्रू आहोत हे दाखवण्यासाठी इंग्रजीत बोलतो. समोरची व्यक्ती फाडफाड इंग्रजी बोलली की आपण कमी पडतो. चीन, जपानमध्ये मात्र त्यांची भाषा ते ठामपणे, आत्मविश्वासाने बोलतात. त्यामुळे काही ठिकाणी आपल्याला अडचण येते. जगभरातील पर्यटकांना आपण आकर्षित करत असू तर इंग्रजीत बोलायला हरकत नाही, पण हे करताना भाषेचा अभिमान असावा दुराभिमान नको.’ असे उद्धव ठाकरे म्हणाले.
भाषा जपतो तो संस्कृती जपतो!
‘इतर देशांचे राष्ट्राध्यक्ष दुभाषी घेऊन फिरतात. मातृभाषेत बोलणे त्यांना कमीपणाचे वाटत नाही. आपल्यामधला हा न्यूनगंड जात नाही तोपर्यंत मराठीला अभिजात भाषेचाच नाही, कुठलाच गौरव मिळणार नाही. भाषा जपतो तो संस्पृती जपतो. या गोष्टी जपूनच शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केले. त्यांनी त्या काळात मराठी भाषेत राज्यव्यवहार कोश तयार केला.’ असे सांगतानाच आपल्याला आपल्या कारभारातील मराठी भाषा किती कळते? असा सवालही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी उपस्थित केला.
दुसऱया भाषेचा दुस्वास नाही, पण माझी भाषा कमकुवत नको!
‘कोरोना संकटामुळे आपण थेट न भेटता तंत्रज्ञानाच्या सहाय्याने आभासी भेटतो. पण मराठी भाषेप्रती माझी तळमळ आणि प्रेम अजिबात आभासी नाही, अशी भावना उद्धव ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केली. ‘आम्हाला दुसऱया भाषेचा दुस्वास करायचा नाही. इंग्रजी आली पाहिजे, पण माझी भाषा कमपुवत होणार नाही याकडेही लक्ष देण्याची गरज आहे.’ असे ते म्हणाले. ‘यानिमित्त आपल्याला लोकमान्य टिळकांचे स्मरण होते.‘सरकारचे डोके ठिकाणावर आहे का’ असे विचारून इंग्रजांना हादरवणारा अग्रलेख त्यांनी लिहिला तो मराठी भाषेतच. भाषा म्हणजे संस्कृती आणि संस्कृती म्हणजेच भाषा. दोन्ही गोष्टी एकमेकांना पूरक आहेत.’ असे उद्धव ठाकरे पुढे म्हणाले.
इतर देशांचे राष्ट्राध्यक्ष दुभाषी घेऊन फिरतात. मातृभाषेत बोलणे त्यांना कमीपणाचे वाटत नाही. आपल्यामधला हा न्यूनगंड जात नाही तोपर्यंत मराठीला अभिजात भाषेचाच नाही, कुठलाच गौरव मिळणार नाही. भाषा जपतो तो संस्कृती जपतो.
सौजन्य : दैनिक सामना