यवतमाळ जिह्यातील चैतन्य अवथारे याला नवव्या वर्षी ‘गौचर’ या दुर्धर रोगाची लागण झाली. प्रकाश अवथारे बीएसएनएलमध्ये असल्याने त्यांनी उपचारांवरील खर्चासाठी बीएसएनएलच्या आरोग्य योजनेचे दरवाजे ठोठावले. चैतन्यच्या वयाच्या नवव्या वर्षापासून उपचारांसाठी मदत मिळविण्याचा प्रयत्न करणाऱया अवथारे यांना बीएसएनएलने मात्र आता चैतन्य 21 वर्षांचा झाला सांगत मदतीस नकार दिला.
तरीही हार न मानता प्रकाश यांनी केंद्रीय आरोग्य योजनेतून मदतीचा प्रयत्न केला, मात्र तिथेही त्यांच्या पदरी निराशाच पडली. यासंदर्भात उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावल्यानंतर मदत मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र ही मदतीची प्रक्रिया पार पडेपर्यंत वयाच्या 30व्या वर्षी चैतन्यने उपचाराअभावी प्राण सोडले.
चैतन्यला झालेला आजार हा दुर्मिळ अनुवांशिक आजार म्हणून ओळखला जातो. नवव्या वर्षी याचे निदान झाल्यानंतर यासाठी केईएम रुग्णालयात त्याच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. मात्र बीएसएनएलच्या नोकरीत असले तरी हा उपचारांचा खर्च परवडणारा नसल्याने त्यांनी बीएसएनएलच्या आरोग्य योजने अंतर्गत पाठपुरावा केला.