हिंदुस्थानची ओळख शांतताप्रिय देश म्हणून जितकी आहे, तितकाच हिंदुस्थान अनेक देशांचा सच्चा मित्र आहे. याच मैत्राची जाणीव ठेवून हिंदुस्थानने ब्राझील या देशाला कोरोना लसीचे 20 लाख डोस पाठवले. या मदतीसाठी ब्राझीलने अतिशय हृदयस्पर्शी संदेश लिहून हिंदुस्थानचे आभार मानले आहेत.
कोरोनाच्या विळख्याला सोडवण्यासाठी जगभर युद्धपातळीवर प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. हिंदुस्थानमध्येही लसीकरणाला सुरुवात झाली आहे. दरम्यान, ब्राझील या देशाला हिंदुस्थानने मदत म्हणून 20 लाख कोरोना लसींचा पुरवठा केला आहे. या मदतीसाठी ब्राझीलचे पंतप्रधान जेयर बोलसोनारो यांनी हिंदुस्थानचे आभार मानले आहेत.
त्यांनी एक हृद्य संदेश लिहिलेला फोटो सोशल मीडियावर शेअर केला. बोलसोनारो म्हणाले की, नमस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी, या कोरोनाच्या लढाईत मदत करण्यासाठी ब्राझील हिंदुस्थानाचे आभार मानतो. धन्यवाद! असं या संदेशात लिहिलं आहे. या संदेशासह लक्ष्मणासाठी संजीवनी मिळावी म्हणून द्रोणागिरी पर्वत उचलून आणणाऱ्या भगवान हनुमंतांचं चित्रही शेअर करण्यात आलं आहे.
कोरोनाच्या संकटात हिंदुस्थानने अनेक देशांना मदत केली आहे. त्यात ब्राझीलसह भूतान, मालदीव, बांगलादेश, नेपाळ, म्यानमार आणि सेशेल्स यांचा समावेश आहे. हिंदुस्थानने कोविशिल्ड या लसीचे तब्बल 1.417 डोस या देशांना रवाना केले आहेत.
सौजन्य : दैनिक सामना