ज्येष्ठ अभिनेते-लेखक दिलीप प्रभावळकर यांच्या लेखणीतून अवतरलेली ‘बोक्या सातबंडे’ कादंबरी आणि त्यातील बोक्याच्या करामती सर्वांनाच माहित आहेत. सुरुवातीला गोष्टींच्या माध्यमातून आणि नंतर चित्रपटाद्वारे रसिकांच्या भेटीला आलेला ‘बोक्या सातबंडे’ आता रंगभूमीवर नाटयरुपात अवतरला आहे. अनामिका, भूमिका आणि मिलाप थिएटरची निर्मिती असलेल्या ‘बोक्या सातबंडे’ या नाटकाचं लेखन डॉ. निलेश माने यांनी केलं असून, विक्रम पाटील आणि दीप्ती प्रणव जोशी यांनी दिग्दर्शन केलं आहे. या नाटकाची दृष्य-संकल्पना केली आहे प्रणव जोशी यांनी तर, मिलिंद शिंत्रे या नाटकाचे क्रिएटिव्ह दिग्दर्शक आहेत. आरुष प्रसाद बेडेकर या नाटकात टायटल रोलमध्ये दिसणार आहे. त्याच्या जोडीला इतरही काही कलाकार या नाटकात आपल्या अभिनयाद्वारे रंग भरणार आहेत.
पुस्तकामध्ये वाचलेल्या बोक्याच्या करामती आता रंगमंचावर पाहताना रसिकांना एक वेगळाच थरार अनुभवायला मिळणार आहे. नाटकाची गोष्ट जरी लहान मुलाला केंद्रस्थानी ठेवून लिहिण्यात आली असली तरी पूर्णत: व्यावसायिक असलेलं ‘बोक्या सातबंडे’ हे नाटक सर्व वयोगटांतील प्रेक्षकांसाठी एक अनोखा अनुभव देणारा असल्याचं मत दिग्दर्शक विक्रम पाटील यांनी व्यक्त केलं आहे. दीप्ती जोशी यांच्या म्हणण्यानुसार नाटकातील बोक्या सातबंडेचे कारनामे सर्वांसाठीच प्रेरणादायी ठरावेत असे असून, नेहमीच सावध राहून आजूबाजूला घडणाऱ्या घटनांवर बारकाईने लक्ष ठेवल्यास येणाऱ्या संकटांचा धीरोदात्तपणे सामना करता येऊ शकतो असं काहीसं सांगणारे आहेत. शिवाय या नाटकाचे पोस्टर डिजाइन केले आहे मार्मिक साप्ताहिकाचे मुखपृष्ठकार “गौरव सर्जेराव” यांनी.
गीतकार वैभव जोशी यांनी लिहिलेल्या गीतांना संगीतकार निनाद म्हैसाळकर यांनी संगीत दिलं आहे. नेपथ्यकार संदेश बेंद्रे यांनी सेट बनवला असून, राहुल जोगळेकर यांनी प्रकाशयोजना केली आहे. वेशभूषा महेश शेरला यांनी केली असून, रंगभूषा कमलेश बिचे यांनी केली आहे. संतोष भांगरे यांनी कोरिओग्राफी केली आहे.