भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष समरजीतसिंह घाटगेे यांच्यावर कार्यकर्त्यांकडुन थेट राजीनाम्याच्या मागणीची नामुष्की ओढवली आहे. नुकत्याच झालेल्या पदवीधर आणि शिक्षक मतदार संघ निवडणुकीतील पराभवाची नैतिक जबाबदारी घेऊन या दोघांनी राजीनामा देण्याची मागणी भाजपाचे जिल्हा सरचिटणीस शिवाजी बुवा, हातकणंगलेचे माजी तालुकाध्यक्ष पी. डी. पाटील यांनी पत्रकार परिषदेत केली आहे.
सत्तेत असताना चंद्रकांत पाटील यांनी इतर पक्षात फोडाफोडी करून, अनेकांना भाजपात घेतले. पण जुन्याजाणत्यांना डावलुन नव्याने व इतर पक्षांतुन आलेल्यांनाच अनेक पदे दिली. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून भाजपच्या निष्ठावंत व पदांची अपेक्षा नसलेल्यांकडुनही प्रदेशाध्यक्ष चंंद्रकांत पाटील यांच्याविरोधात नाराजीचे सुरू उमटत आहेत.
त्यात आता पदवीधर व शिक्षक मतदार संघ निवडणुक गांभिर्याने घेतली नसल्याने भाजपचा पराभव झाला. त्यामुळे या पराभवाची जबाबदारी घेऊन प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष समरजीतसिंह घाटगेे यांनी राजीनामा द्यावा, असा घरचा आहेरच भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.
सौजन्य- सामना