कोरोनाचे संकट कायम असताना देशात आता बर्ड फ्लूने थैमान घालायला सुरुवात केली आहे. सात राज्यांत बर्ड फ्लू आढळला असून इन्फ्लुएन्झामुळे विविध राज्यांतील अनेक पक्ष्यांचा झपाटय़ाने मृत्यू होत आहे. त्यातच महाराष्ट्रातही काही मृत पक्षी आढळल्यामुळे राज्यात बर्ड फ्लूचा धोका तर नाही ना हे पाहण्यासाठी मुंबई, ठाणे, दापोली, परभणी आणि बीड जिह्यांतील मृत कावळय़ांचे नमुने भोपाळच्या आयसीएआर-नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ हायसेक्युरिटी ऍनिमल डिजीस या संस्थेकडे पाठवण्यात आले आहेत.
देशातील उत्तर प्रदेश, केरळ, राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात, हिमाचल प्रदेश, हरयाणा या राज्यात बर्ड फ्लूची साथ वेगाने पसरत आहे. तशी माहीती केंद्राच्या पशुसंवर्धन विभागाने दिली असून साथ रोखण्यासाठी खबरदारी घेण्याच्या सूचना केंद्राने दिल्या आहेत. महाराष्ट्र, दिल्ली, छत्तीसगड या राज्यात बर्ड फ्लू आहे की नाही हे तपासण्यासाठी येथील मृत पक्ष्यांचे नमुने भोपाळला पाठवण्यात आले आहेत. याबाबत माहिती देताना केंद्राच्या वतीने सांगण्यात आले की, छत्तीसगडमधील बलोद जिह्यात पोल्ट्रीमधील कोंबडय़ा व जंगलातील रानटी मृत पक्ष्यांची संख्या अधिक आहे. तर दिल्लीतील संजय लेक या तलावातील बदकांचा मृत्यू झाला आहे. या मृत पक्ष्यांचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले असून पक्ष्यांच्या स्थलांतरणामुळे हा आजार पसरला असावा अशी शक्यता वर्तविली जात आहे.
- बर्ड फ्लूच्या तपासणीसाठी केंद्रातील संशोधकांची टीम केरळ, हरयाणा, हिमाचल प्रदेश येथे दाखल
- बर्ड फ्लूची लागण मानवाला होऊ नये यासाठी दक्ष राहण्याच्या राज्याला सूचना
- मृत जनावरांमुळे आजार पसरू नये यासाठी पाण्याची ठिकाणे, पक्ष्यांची विक्री केंद्रे, प्राणिसंग्रहालय, पोल्ट्री फार्म या
ठिकाणी विशेष काळजी घ्यावी
- मृत जनावरांच्या मृतदेहांची योग्य प्रकारे विल्हेवाट लावावी
- मृत पक्ष्यांची तपासणी करताना किंवा त्यांना हाताळताना पीपीई किट परिधान करणे आवश्यक
- मानवाला बर्ड फ्लूचा धोका पोहोचू नये यासाठी संबधित विभागाच्या सचिवांनी पोल्ट्री तसेच अंडी खाण्याबाबत लोकांमध्ये जनजागृती करावी