काही दिवसांपासून ट्विटर या सोशल माध्यमावर ‘बॉयकॉट बिंगो’ हा ट्रेण्ड व्हायरल झालेला दिसतोय. रणवीर सिंहने बिंगोच्या जाहिरातीत सुशांतसिंह राजपूत (एसएसआर) याच्यावर टीका केल्याचा संताप सुशांतचे चाहते बिंगोला बॉयकॉट करून व्यक्त करायला लागले आहेत. त्यामुळे बिंगो जाहिरातीमुळे रणवीर सिंह चांगलाच अडचणीत आल्याचे दिसतेय.
काही दिवसांपूर्वी छोट्या पडद्यावर रणवीर सिंहची बिंगो उत्पादनाची जाहिरात दाखवली जाऊ लागली आहे. रणवीर बिंगोचा ब्रॅण्ड अॅम्बेसेडर आहे. त्यामुळे बिंगो खाताना त्याच्या अनेक जाहिराती दाखवल्या जात आहेत. अशाच एका नुकत्याच आलेल्या जाहिरातीत रणवीर सिंह बिंगो खात आहे. तो एका पार्टी फंक्शनमध्ये उभा आहे. तेथे अनेक लोक त्याला ‘बेटा आगे क्या करने का विचार है’ विचारतात, तेव्हा रणवीर सिंह एक उलटसुलट उत्तर देतो. या उत्तरात मंगळ, अंतराळ जीव, ब्रह्मांड वगैरे उल्लेख येतात. ते उत्तर ऐकून समोरचा व्यक्ती गांगरतो. दुसरा माणूस रणवीरला तोच प्रश्न विचारणार, तेवढ्यात पहिला व्यक्ती दुसर्याला ‘काही विचारू नको’ असे खुणावतो.
आता वास्तविक या जाहिरातीत आक्षेप घेण्यासारखे काही नाही. ही जाहिरात सरळ आणि साधी वाटते, पण तरीही सुशांत सिंह राजपूतचे चाहते रणवीरवर आणि अर्थातच बिंगो उत्पादनावर भडकले. कारण सुशांतसिंह राजपूत एक हुशार विद्यार्थी होता आणि त्याला सायन्स व अंतराळ या विषयांत रुची होती.
म्हटले जाते की त्याने चंद्रावर जमीनही खरेदी केली होती. रणवीरने जाहिरातीत ज्या पद्धतीने सायन्सच्या समीकरणांवर टीका केली ते पाहून चाहते याचा संबंध एसएसआरशी जोडू लागले आहेत. मुळात जाहिरातीत कुठेही सुशांतसिंहचे नावही आलेले नाही.
बिंगोनेही या बॉयकॉट ट्रेण्डवर आपल्याकडून बचावाचे पाऊल उचलले आहे. त्यांनी आपल्या यूट्युब चॅनलवर कमेंट आणि लाइकचे सेक्शनच बंद केले आहे. त्यांनी या प्रकरणी स्पष्टीकरण देत म्हटले की, या जाहिरातीत कुणाच्याही भावना दुखविण्याचा आमचा इरादा नाही. यात कुणाविषयी द्वेषभावना नाही. त्यामुळे या जाहिरातीत दिवंगत अभिनेत्याची खिल्ली उडविलेली नाही, असेही बिंगोने स्पष्ट केले आहे. रणवीरने अजून याबाबत काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही.