पदार्पणातच ‘ख्वाडा’सारख्या बहुचर्चित चित्रपटात मुख्य भूमिका साकारल्यानंतर आणि त्यानंतर ‘बबन’ चित्रपटातील भूमिकेमुळे चर्चेत आलेल्या भाऊसाहेब शिंदे याने ‘रौंदळ’ या आपल्या आगामी मराठी चित्रपटाची घोषणा नुकतीच केली आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असणाऱ्या गुढी पाडव्याच्या शुभमुहूर्तावर पोस्टर रिलीज करून सोशल मीडियाद्वारे ‘रौंदळ’ या चित्रपटाची घोषणा करण्यात आली. ‘रौंदळ’चं मुख्य वैशिष्ट्य म्हणजे भाऊ शिंदे फिल्म्स या बॅनरखाली बाळासाहेब शिंदे यांच्या साथीने स्वतः भाऊसाहेब या चित्रपटाची निर्मिती करीत आहे. अर्थातच या चित्रपटात भाऊसाहेबच मुख्य भूमिकेत आहे.
रिलीज केलेल्या ‘रौंदळ’च्या पोस्टरवर एक रांगडा गडी पहायला मिळतो. पांढऱ्या रंगाचा चेक्स शर्ट, डाव्या हातात कडं, खांद्यावर गाडीचा टायर काढण्यासाठी वापरली जाणारी रक्तानं माखलेली टॉमी, वाढलेली दाढी आणि चेहऱ्यावर जखम झालेल्या अवस्थेतील भाऊसाहेब पोस्टरवर आहे. यावरून या चित्रपटात धडाकेबाज अॅक्शनही पहायला मिळणार हे नक्की. या चित्रपटातील इतर कलाकारांची माहिती जाहीर करण्यात आलेली नाही. गजानन पडोळ हे या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. मनात आवड असेल तर कोणतंही काम कठीण नसल्याचं सिद्ध करणारा भाऊसाहेब ‘रौंदळ’मध्ये पुन्हा काहीतरी दणकेबाज करणार यात शंका नाही. लवकरच ‘रौंदळ’च्या चित्रीकरणाला प्रारंभ करण्यात येणार आहे.