लोहगाव विमानतळाच्या 15 किलोमीटर परिसरात बीम लाईट वापरण्यास मनाई करण्यात आली आहे. विविध कार्यक्रम, समारंभ, लग्न सोहळ्यावेळी आकाशात वापरले जाणारे प्रखर बीम लाइटवर पुढील दोन महिन्यांसाठी बंदी घालण्यात आली आहे. त्याचे पालन न करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा सह पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी दिला आहे.
लोहगाव नागरी विमानतळ व भारतीय वायुदलाची विमानतळ येथे दिवसा व रात्री विविध विमान कंपन्यांची, भारतीय वायुदलाची विमाने व हेलिकॉप्टर उड्डाण करतात. रात्रीच्यावेळी वैमानिकांना दिशा दाखविण्यासाठी रनवेवर व एटीसी टॉवरकडून संकेतासाठी लाईटचा वापर करण्यात येतो. असे असतानाही लोहगाव विमानतळाच्या परिसरात विविध कार्यक्रमांच्यावेळी आकाशामध्ये प्रखर बीम लाईटचा वापर केला जात असल्याचे वायुदलाने निदर्शनास आणून दिले आहे. अशा प्रखर बीम लाईटमुळे वैमानिकाचे डोळे दिपून मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरी विमानतळ व वायदुल विमानतळाच्या 15 किलोमीटर अंतराच्या वायुक्षेत्र परिसरात सायंकाळी सहा ते सकाळी सहा या वेळेत आगामी दोन महिने बीम लाईटचा आकाशात वापर करण्यास मनाई करण्यात आल्याचे डॉ.शिसवे यांनी दिलेल्या आदेशात नमूद केले आहे
सौजन्य- सामना