लग्नाचा विषय निघाला की बस्ता आणि त्यासाठी लागणारी खरेदी स्वाभाविकपणे येतेच. पण बस्त्याची खरेदी करण्यातही वेगळीच गंमत असते. नेमका हाच विषय घेऊन ‘बस्ता’ हा मराठी सिनेमा लवकरच येतोय. यात सायली संजीव नवरीच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे, तर अक्षय टांकसाळे तिचा नायक बनला आहे. मुळात हा सिनेमा गेल्या वर्षी एप्रिलमध्ये प्रदर्शित होणार होता. पण करोना संकट आणि लॉकडाऊनमुळे तो रिलीज होऊ शकला नाही.
आता हा सिनेमा झी फ्लेक्स या ओटीटी माध्यमावर 8 जानेवारीपासून पाहता येणार आहे. श्रीगणेश मार्केटिंग ऍण्ड फिल्मस प्रस्तुत आणि पिकल एन्टरटेन्मेंट ऍण्ड मिडीया लि. यांच्या सहयोगाने प्रदर्शित होत असून तानाजी घाडगे चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. अरविंद जगताप यांनी चित्रपटाचे लेखन केले आहे. मंगेश कांगणे आणि शंकर पवार यांनी गीतलेखन, तर संतोष मुळेकर यांनी संगीत दिग्दर्शन केले आहे. या सिनेमात चित्रपटात सायली संजीव आणि अक्षय टांकसाळे यांच्यासोबतच पार्थ भालेराव याचीही प्रमुख भूमिका पाहायला मिळणार आहे.