‘मार्मिक’ १९६० साली म्हणजे महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आले त्याच वर्षी अत्रे साहेबांच्या वाढदिवशी यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते सुरू झाला. अनेकांना कल्पना नसेल, पण ‘मार्मिक’ हे नाव ही प्रबोधनकारांची देणगी आहे. बाळासाहेब ‘फ्री प्रेस जर्नल’ या इंग्रजी वृत्तपत्रात व्यंगचित्रकार म्हणून काम करीत होते. पण मालकांकडून याच्यावर व्यंगचित्र काढू नको, त्याच्यावर काढू नको, असे वरचेवर व्हायला लागले. बाळासाहेबांमधला कलावंत बंड करून उठला. त्यांनी व्यंगचित्र साप्ताहिक काढायचे ठरवले. दादांनी त्याचे नाव ठेवले ‘मार्मिक.’
संयुक्त महाराष्ट्राला ६० वर्षे झाली, ‘मार्मिक’ला ६० वर्षे झाली, योगायोग आहे, मी त्याच वर्षी जन्माला आलो आणि या वर्षी मलाही ६० वर्षे झाली.
संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये मराठी माणसांनी अन्याय भोगला, सोसला आणि तरीदेखील हे अत्याचार करणार्यांच्या नाकावर टिच्चून छाताडावर हा भगवा झेंडा रोवला. ही आपल्या मराठी माणसाची ख्याती आहे.
मराठी माणसाची एक ओळख आहे. एक तर आम्ही, आपण मराठी माणसं कुणावरती अन्याय करणार नाही. पण आपल्यावर जो अन्याय करेल, त्याला आपण शिल्लक ठेवणार नाही. ही आपली वृत्तीच आहे. ही अशीच असली पाहिजे. लढायचं ते अन्यायाविरुद्ध वार करण्यासाठीच… न्याय्य हक्कासाठी लढायचं… रक्षणासाठी… माता भगिनींच्या, गोरगरीबांच्या, दीनदुबळ्यांच्या रक्षणासाठी लढायचं. तीच शिकवण आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलीय.
छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख आल्यानंतर तोही काळ जरा आठवून बघा. आज ठीक आहे मी मुख्यमंत्री आहे, राज्याचा मुख्यमंत्री आहे. सत्ता आपल्या ताब्यामध्ये आहे. पण तो काळ जो होता त्यावेळेला हाताशी काहीच नव्हतं. मोबाईल कसले, फोन नाही, काही नाही. काही नाही. मोगल किती मातब्बर होते. अशावेळी एक १६-१७ वर्षांचं पोर हे उभं काय राहातं, आणि पहिला तोरणा किल्ला काय जिंकतं… तेव्हा कुणी विचार केला असता की शत्रू एवढा प्रबळ आहे. कसं जिंकायचं? लढायचं कसं? जिंकायचं सोडा… तर स्वराज्य स्थापनच झालं नसतं. म्हणून जे जिंकणार की हरणार हा विचार न करता अन्याय आहे तो मोडून काढणारच, आमच्या मातीत आम्ही अन्याय वाढू देणार नाही, जो कुणी अन्याय करणारा असेल त्याला तिथल्या तेथे ठेचणारच… या एका जिद्दीने त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज आणि मावळे उभे राहिले नसते तर आज आपली अवस्था काय असती आपल्याला कल्पना आहे.
सामर्थ्य हे नेमकं कशात असतं..? सामर्थ्य तलवारीत असतं, सामर्थ्य बंदुका-तोफा-तोफगोळे या सगळ्यात असतं, पण शिवसेनाप्रमुखांनी जे सामर्थ्य दाखवलं ते कुंचल्याच्या फटकार्याचं सामर्थ्य होतं. ब्रश… ब्रश हे कलाकाराचं माध्यम. एखादी आपली भावना, आपला विचार, विचार म्हणण्यापेक्षा जे काही चित्र डोळ्यांसमोर आणतो ते कागदावर उतरविण्याची ताकद, किंबहुना कागदावर उतरविण्याचं माध्यम हे हा कुंचला करत असतो…
आणि सुरुवातीला ‘मार्मिक’ची स्थापना करण्याच्यामागची भावना ही होती की, मराठी माणसाने लढा दिलेला आहे, मुंबई मिळवलेली आहे, आता कुठेतरी एक स्थिरता येतेय मराठी माणसाच्या आयुष्यात… त्याला नाही म्हटलं तरी रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात थोडीशी विरंगुळ्याची एक गरज आहे.
नाहीतर आज आपण बघतोच, टीव्ही लावला की अरे बापरे! कोरोनाचे थैमान, इकडे दरोडा पडला, तिकडे ते झालं… अशा या सगळ्या बातम्या… त्यात कुठेतरी एक विरंगुळा पाहिजे. म्हणून ‘मार्मिक’चं प्रकाशन झालं. त्यात मधल्या पानावर ‘रविवारची जत्रा’ नावाची दोन पानं असायची. त्यातून सुरुवात झाली.
करता करता लक्षात यायला लागलं की मराठी माणसाने मुंबई मिळवली, पण मराठी माणसांनी रक्त सांडून मिळवलेल्या या मुंबईमध्ये परप्रांतीय आपल्या छाताडावर बसताहेत, हैदोस घालताहेत. मग अशावेळी कुणी गप्प बसणं शक्यच नव्हतं आणि खास करून आमचं जे घराणं आहे त्यात आजोबा हे तेव्हा संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत अग्रणी होते. पहिल्या पाचामध्ये होते. त्यांचं घराणं मराठी माणसावर अन्याय होताना गप्प कसं बसेल? मग त्याच ‘मार्मिक’मधून मराठी माणसाच्या अन्यायाला वाचा फोडायला सुरुवात झाली… आणि जो कुंचला मराठी माणसाच्या मनोरंजनासाठी वापरला जाणार होता तोच मराठी माणसाचे शस्त्र बनला. एक अस्त्र बनलं. आणि जो अन्याय करत होता त्याच्यावर तलवारीचे नाहीत, तर कुंचल्याचे फटकारे शिवसेनाप्रमुख करायला लागले. सोबत माझे काका होतेच. द. पा. खांबेटे. तेही होतेच. माझाही जन्म त्याच सालचा म्हटल्यानंतर मीसुद्धा बघत होतो. हळूहळू ‘मार्मिक’सोबत मीही मोठा होत होतो. घरात येणारी जाणारी सगळी वर्दळ पाहात होतो. एक कुंचला काय करू शकतो? आपण असहाय्यपणे जर का बघत राहिलो की, काय करणार, सोबत कोण येणार.. नाही, हातात जे असेल ते माझं शस्त्र… त्या शस्त्रानिशी माझ्या शत्रूला मी नामोहरम करणारच… या एका जिद्दीने शिवसेनाप्रमुख उभे राहिले. ‘मार्मिक’मधून या अन्यायाला वाचा फुटायला लागली. आणि हा हा म्हणता वातावरण ढवळून निघालं. घरामध्ये आजोबा होतेच. जनतेची वर्दळ होत होतीच…
एक दिवस मग असा उजाडला जेव्हा माझ्या आजोबांनी शिवसेनाप्रमुख तेव्हा शिवसेनाप्रमुख नव्हते, मार्मिककार होते. त्यांनी विचारले, काय रे, ही गर्दी सगळी घरी येतेय याचं पुढे काय करणार आहेस की नाही? पक्ष, संघटना वगैरे काही स्थापणार आहेस की नाही? तेव्हा बाळासाहेब म्हणाले, हो विचार आहे. आजोबांनी विचारलं, नाव काय देणार? हे सगळंच बाळासाहेबांना अनपेक्षित होतं. म्हणजे पक्ष काढणार का? संघटन करणार का? याला हो नाही उत्तर देण्याआधीच तेवढ्यात पुढचा प्रश्न आला… नाव काय देणार?
त्याला उत्तर देण्याच्या आत आजोबांनी नाव दिलं ‘शिवसेना’. हे आजोबांनी दिलेलं नाव आहे.
‘मार्मिक’ने थोडीशी जी थंडावलेली मनं होती आणि मनगटं होती त्याच्यात एक आत्मविश्वास जागवला. पेटवला. अहंकार नाही, पण एक आत्मविश्वास त्याच्यामध्ये जागवला… आणि मराठी माणसावरती अन्याय करणारी जी काही इकडची तिकडची लोकं होती त्यांना खणखणीतपणाने सांगितलं की, याद राखा जर महाराष्ट्रामध्ये मराठी माणसावर अन्याय कराल तर गाठ शिवसेनेशी आहे. शिवसैनिकाशी आहे. त्यातून हा सगळा धगधगता ६० वर्षांचा कालखंड आपल्यासमोर हा आपल्या साक्षीने सरून गेलेला आहे. आज हा हा म्हणता ही ६० वर्षे झाली. पुढे वाटचाल चालूच आहे. अन्याय करण्याची तशी कुणाची हिंमत नाही, पण आजसुद्धा जर महाराष्ट्रामध्ये मराठी माणसावर, भूमीपुत्रावर अन्याय करण्याचा प्रयत्न जरी कुणी केला तरीदेखील गाठ शिवसेनेशी आहे, गाठ ‘मार्मिक’शी आहे, गाठ `सामना’शी आहे.
हे जगातील हे एकमेव उदाहरण असेल की एका व्यंगचित्रकाराने हा इतिहास घडवला. इतिहास तलवारीने लढतात, इतिहास बंदुकीने घडतात पण कुंचल्याच्या सामर्थ्याने इतिहास घडविणारं हे एकमेव उदाहरण असेल. आणि तेसुद्धा आपल्या महाराष्ट्रात… अस्सल मराठी मातीतलं असेल. मराठी माणसाने घडवलेलं एक स्वप्नवत वाटणारं दृष्य आहे. ते स्वत: व्यंगचित्रकार होते. सोबत माझे काका श्रीकांतजी हे व्यंगचित्रकार होते. विकास सबनीस यांनी काही काळ येथे व्यंगचित्रे काढलेली आहेत. असे अनेक व्यंगचित्रकार… तेव्हा तो एक संपन्न असा काळ होता. आता थोडे थोडे ते व्यंगचित्रकारही कमी होत चालले आहेत. नुसते व्यंगचित्रकार नाहीत तर राजकीय भाष्य करणारे व्यंगचित्रकार… म्हणजे जसे आर. के. लक्ष्मण होते. त्यांच्या कुंचल्याला तोड नव्हती. तसं एक समर्पक, यथोचित, नुसतं व्यंगचित्र काढणारे नाहीत, तर राजकीय भाष्य आणि त्या व्यंगचित्रातून काहीतरी सांगणारं… म्हणजे असं म्हटलं जातं की, कदाचित दहा किंवा दहापेक्षा जास्त अग्रलेख जे सांगू शकत नाहीत ते एखादं व्यंगचित्र सांगून जातं.
शिवसेनाप्रमुख म्हणायचे, ‘रीड बिटवीन द लाईन्स…’ म्हणजे आपल्याला जे दिसत नाही, पण त्यात जो मतितार्थ असतो तो मतितार्थ दाखवणारं ते व्यंगचित्र असतं. असे हे व्यंगचित्रकार आजसुद्धा आपल्याला हवेत… त्यांच्या सगळ्यांच्या सोबतीने हे जे काही आपलं व्रत आहे… मी व्रत म्हणतो त्याला… हे व्रत अविरत चालणार आहे. असंच आपण चालत ठेवू हाच मी आपल्याला विश्वास देतो.