प्रत्येक व्यंगचित्र ठाशीव रेषांतून लोकांपर्यंत पोहोचविणारे जागतिक दर्जाचे व्यंगचित्रकार हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्री. बाळासाहेब ठाकरे यांचीच चित्रे काढायची झाली तर सर्वच व्यंगचित्रकारांना स्फुरण चढते. नेमकी हीच भावना घेऊन आणि बाळासाहेबांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधत ‘कार्टून्स कट्टा’ या महाराष्ट्र व्यंगचित्रकार ग्रुपने ‘आमचेही फटकारे’ हे प्रदर्शन १७ ते १९ नोव्हेंबर या कालावधीत आयोजित केले आहे.
पुण्यातील बालगंधर्व कलादालनात भरलेल्या या प्रदर्शनात देशातील तब्बल १२० चित्रकार आणि व्यंगचित्रकारांनी बाळासाहेबांविषयीचे आपले प्रेम कुंचल्यातून व्यक्त केले आहे. स्केच असो, अर्कचित्र असो की पेंटिंग… ज्याला जे जे माध्यम योग्य वाटले ते ते त्याने या चित्रांसाठी वापरले आहे.. या सर्वांनी काढलेल्या १६० कलाकृती या प्रदर्शनात ठेवण्यात आल्या आहेत. काळ बदलला तसे विषय, चित्रशैली आणि रंग माध्यमही बदलले, पण या सर्वांचा संगम बाळासाहेबांच्या या चित्रवंदनेत चाहत्यांना दिसून येतो.
महाराष्ट्रातील तब्बल ८० चित्रकार, व्यंगचित्रकारांनी या प्रदर्शनात भाग घेतला आहे.. एवढेच नव्हे तर कर्नाटक, मध्य प्रदेश, गुजरात, नवी दिल्ली, तेलंगना, ओडिसा, कश्मीर, जम्मू, प. बंगाल, तमीळनाडू, उत्तर प्रदेश, छत्तीसगढ, बिहार, राजस्थान आणि केरळमधूनही या प्रदर्शनासाठी उत्साही व्यंगचित्रकारांनी बाळासाहेबांची चित्रे पाठवली आहेत.