गायक, संगीतकार अवधुत गुप्ते वंशवादावर एका नव्या प्रोजेक्टवर सध्या काम करत आहेत. नुकतेच त्यांनी या विषयावरील आपल्या प्रोजेक्टचे पोस्टर इन्स्टाग्रामवर पोस्ट केलंय. लॉकडाऊन असतानाही ते स्वस्थ बसले नव्हते. अनेक प्रोजेक्ट्सद्वारे ते लोकांसमोर येतच होते. त्यामुळे आताही इन्स्टाग्रामवर वंशवादावरील त्यांचे पोस्टर पाहून त्यांचे चाहते चकीत झाले आहेत.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाचे औचित्य साधून त्यांनी आत्ता हे पोस्टर शेयर केले आहे. यात त्यांनी चाहत्यांनाच आपला हा प्रोजेक्ट कोणता असेल ते ओळखण्याचे आवाहन केले आहे. या पोस्टरमध्ये अवधुत गुप्ते निळ्या जॅकेटमध्ये आणि निळ्याच हॅटमध्ये दिसत आहेत. या पोस्टरमध्ये वंशवाद नको, प्रत्येकाचे जीवन महत्त्वाचे, माणुसकी, जय भीम हे शब्दही दिसत आहेत. यावरून ते काहीतरी दमदार आणि कदाचित वादग्रस्त ठरू शकेल असा काहीतरी प्रोजेक्ट करत आहेत. त्यांचे चाहतेही यामुळे उत्सुक झाले आहेत. असो. अलीकडेच अवधुत गुप्तेंनी आपल्या ‘भाग्य उजळले’ या गाण्यातून पोलीस, डॉक्टर आणि इतर कोविड योद्ध्यांना सलामी दिली होती.