कर्नाटकातील कांचीपूरम भागात एका प्राचीन मंदिराच्या नूतनीकरणादरम्यान शनिवारी 500 ग्रॅम सोने सापडले. त्या सोन्याच्या ताब्यावरून गावात चांगलेच नाट्य रंगले आहे. या सोन्यावर जिल्हा प्रशासनाने दावा केला असून गावकऱ्यांनी हे सोने मंदिरात सापडले असल्याने मंदिराची आणि गावाची संपत्ती असल्याचे सांगत हे सोने प्रशासनाला देण्यास नकार दिला आहे.
चेन्नईपासून सुमारे 90 किलोमीटरवर असणाऱ्या कांचीपूरम गावात सुमारे 300 वर्षे जुन्या कुलंबेश्वर मंदिराच्या नूतनीकरणाचे काम सुरू होते. या कामादरम्यान शनिवारी मंदिराच्या गर्भगृहात एका पोत्याने झाकलेली ताब्यांची पेटी आढळली. ती पेटी बाहेर काढून उघडली असता त्यात सोन्याची मोठी नाणी, सोन्याच्या मूर्ती आणि दागिने आढळले. गावकऱ्यांनी त्याचे वजन केले असता एकूण 500 ग्रॅमचे सोने असल्याचे समजले. ही बातमी शेजारच्या गावांमध्ये वाऱ्यासारखी पसरली. त्यानंतर बघ्यांची गर्दी उसळली. तसेच प्रशासनाचे अधिकारीही घटनास्थळी पोहचले. त्यानंतर गावात या सोन्याच्या ताब्यावरून चांगलेच नाट्य रंगले.
या घटनेची माहिती महसूल विभागाला मिळताच त्या विभागाचे अधिकारीही सोने ताब्यात घेण्यासाठी शनिवारी गावात आले. त्यानंतर गावकऱ्यांनी प्रशासनाला आणि महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना विरोध करण्यास सुरुवात केली. त्यानंतर मंदिराजवळ गावकरी मोठ्या संख्येने जमले. हे सोने जप्त करून जिल्हा प्रशासन किंवा महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यास गावकऱ्यांनी विरोध केला.
मंदिर गावात असून ती गावाची संपत्ती आहे. मंदिर नूतनीकरणाच्या कामात सोने सापडल्याने देवानेच या कामासाठी मदत केल्याने हे सोने देवाचा आशिर्वाद आहे, असे त्यांनी सांगितले. त्यामुळे या सोन्यावर मंदिराचा आणि गावाचा अधिकार आहे. हे सोने जिल्हा प्रशासन किंवा महसूल विभाग नेऊ शकत नाही, असे सांगत गावकऱ्यांनी अधिकाऱ्यांशी वाद घातला.
अधिकाऱ्यांनी गावकऱ्यांना सापडणाऱ्या गुप्तधनाबाबतचे नियमही सांगितले. मात्र, गावकरी अधिकाऱ्यांचे काहीही ऐकत नव्हते. हे सोने मंदिराच्या ताब्या द्यावे आणि मंदिर नूतनीकरणासाठी वापरण्यात यावे, अशी मागणी गावकऱ्यांनी केली. वाद वाढल्यानंतर संतप्त गावकऱ्यांनी रस्त्यावरील वाहने अडवण्यास सुरुवात केली. प्रशासन आणि महसूल विभागाचे अधिकाऱ्यांचे वाहनही त्यांनी अडवून धरले.
प्रशासनाकडे हे सोने सूपूर्द करून मंदिराच्या नूतनीकरणासाठी त्याचा वापर करण्याची विनंती करण्यात येईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितल्यानंतर गावकऱ्यांनी अधिकाऱ्यांच्या वाहनाला वाट करून दिली. अधिकाऱ्यांनी सोने जप्त केले असून रविवारी ते राजकोषात जमा करण्यात आले आहे. या घटनेमुळे मंदिरात सापडलेले सोने आणि घडलेल्या नाट्याची चर्चा परिसरात सुरू आहे.
सौजन्य- सामना