बॉलीवूडचे शोमॅन राज कपूर यांचा धाकटा मुलगा आणि ज्येष्ठ अभिनेते-दिग्दर्शक राजीव कपूर यांचे आज हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. ते 58 वर्षांचे होते. चेंबूरच्या इंलॅक्स रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. बॉलीवूडमधील लोकप्रिय कपूर घराण्यावर वर्षभरात दुसऱयांदा दुःखाचा डोंगर कोसळला आहे. गतवर्षी एप्रिलमध्ये राजीव कपूर यांचे थोरले बंधू ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचे कर्करोगामुळे निधन झाले होते.
ज्येष्ठ अभिनेते राजीव कपूर यांना मुंबईत राहत्या घरी दुपारी हृदयविकाराचा तीव्र झटका आला. तत्काळ त्यांना उपचारासाठी चेंबूरच्या रुग्णालयात नेण्यात आले. परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. भावाच्या निधनाबद्दल ज्येष्ठ अभिनेते रणधीर कपूर म्हणाले, आज मी माझा छोटा भाऊ राजीवला गमावले आहे. डॉक्टरांनी त्याला वाचवण्याचे खूप प्रयत्न केले, पण ते त्याला वाचवू शकले नाहीत.’ नीतू कपूर यांनीदेखील इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करत राजीव कपूर यांना श्रद्धांजली वाहिली आहे. राजीव यांच्या निधनामुळे बॉलीवूडचा आणखी एक तारा निखळला आहे.
‘राम तेरी गंगा मैली’ने दिले यश
आपल्या करीअरमध्ये राजीव यांनी मोजक्याच चित्रपटांत काम केले. 1983 साली ‘एक जान है हम’मधून त्यांनी बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. परंतु त्यांना खरी लोकप्रियता मिळाली ती राज कपूर दिग्दर्शित ‘राम तेरी गंगा मैली’ या चित्रपटामुळे. या चित्रपटाच्या आठवणी आजही सिनेप्रेमींच्या मनात जिवंत आहेत. त्यानंतर ‘आसमान’, ‘लव्हर बॉय’, ‘जबरदस्त’, ‘हम तो चले परदेस’ अशा निवडक चित्रपटांत ते झळकले. 1990 मध्ये आलेला ‘जिम्मेदार’ हा अभिनेता म्हणून त्यांचा अखेरचा चित्रपट होता.
निर्मिती–दिग्दर्शनात अजमावले नशीब
राजीव यांनी भाऊ रणधीर कपूरसोबत मिळून ‘हीना’ तसेच अक्षय खन्ना, ऐश्वर्याच्या ‘आ अब लौट चले’ चित्रपटाची निर्मिती केली होती. अभिनय व निर्मितीशिवाय दिग्दर्शनातही त्यांनी आपला हात अजमावला होता. 1996 मध्ये ‘प्रेमग्रंथ’ चित्रपट त्यांनी दिग्दर्शित केला. या चित्रपटात ऋषी कपूर, माधुरी दीक्षित आणि शम्मी कपूर महत्त्वपूर्ण भूमिकेत होते.